
Nagpur News : आधी डिमांड भरूनही वीज जोडणी मिळत नव्हती. आता देखील मागेल त्याला सौरपंपांचा दावा केला जात असताना शेतकऱ्यांना मात्र प्रत्यक्षात ते उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. दुर्गम मेळघाटातील ३९ शेतकऱ्यांची यासाठी प्रतीक्षा कायम आहे.
पारंपरिक ऊर्जेवरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने शासनाकडून अपारंपरिक ऊर्जा वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. त्या अंतर्गत सिंचनकामी असलेल्या पंपासाठी देखील सौरचा पर्याय उपलब्ध करून दिला जात आहे. मागेल त्याला सौरपंप असाही दावा शासनस्तरावरून करण्यात आला आहे.
परंतु प्रत्यक्षात परिस्थिती काही वेगळीच असल्याचे सागितले जाते. मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात विजेची उपलब्धता औट घटकेची राहते. त्यामुळे या भागात सौर वापरावर भर दिला जात आहे. कुसूम सौर योजनेअंतर्गत अनुदानाचेही धोरण आहे. त्याकरिता काही हिस्सा लाभार्थी शेतकऱ्यांना भरावा लागतो.
त्यानुसार चिखलदरा तालुक्याच्या काटकुंठ, चुरणी परिसरातील ३९ आदिवासी शेतकऱ्यांनी आपला हिस्सा भरला. आर्थिक परिस्थिती नसताना ऊसनवारी करून, घरातील दागदागिने गहाण ठेवत या रकमेचा भरणा करण्यात आला.
त्यानंतर मेडाच्या वतीने संबंधित कंपनीला शेतकऱ्यांच्या नावाच्या यादी पाठवित सौर पंप बसविण्यासाठी सांगण्यात आले. याला तब्बल १८ महिन्यांचा कालावधी लोटूनही हे काम तसूभरही पुढे सरकले नाही. इतकेच नाही तर यासाठी जबाबदार असलेले अधिकारी शेतकऱ्यांचा फोन देखील उचलत नसल्याचा आरोप आहे.
ओलित करणार कसे?
रबी हंगामात गहू, हरभरा यासारखी पिके शेतकरी घेतात. ओलिताची सोय झाल्यास उत्पादकता वाढेल असा त्यांना विश्वास आहे. परंतु शासनस्तरावरून सौरपंप उपलब्धतेसाठी टाळाटाळ होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांनी उसनवारी करून लाभार्थी हिश्शाचा भरणा करण्यासाठी पैशाची जुळवाजुळव केली. पंप बसल्यास उत्पादकता आणि उत्पन्न वाढेल, अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र तसे न झाल्याने आता देणीदारांची देणी कशी चुकवावी, अशा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.