Nanded News update : नांदेड जिल्ह्यात यंदाही सोयाबीन सर्वाधीक क्षेत्रावर लागवड होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. पावसाचे आगमन अद्याप झाले नसले तरी शेतकरी मात्र उपलब्ध पाण्याच्या भरवश्यावर सोयाबीन लागवड करत आहेत. यात सर्वाधीक शेतकऱ्यांनी रुंद गादी वाफा पद्धतीचा अवलंब करून टोकण यंत्राद्वारे सोयाबीनची लागवड करीत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसत आहे.
नांदेड जिल्ह्यात दरवर्षी चार लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होते. यात दरवर्षी वाढ होत आहे. क्षेत्र वाढीसोबतच लागवड पद्धतीतही मागील काही वर्षांपासून शेतकरी बदल करीत आहेत.
कृषी विभागाने बीबीएफ पद्धतीने सोयाबीनची लागवड करण्याचे आवाहन मागील काही वर्षापासून शेतकऱ्यांना केले आहे. यातही आता सुधारणा होऊन बेडवर सोयाबीनची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
या पद्धतील सोयाबीन बियाण्यांची ५० टक्क्यांपर्यंत बचत होत आहे. तसेच अतिवृष्टीच्या काळात पिकाला बाधा पोचत नसल्याने शेतकरी या पद्धतीचा अवलंब करण्याकडे वळले आहेत. मागील काही वर्षांपासून ज्या शेतकऱ्यांनी बेडवर सोयाबीनची लागवड केली आहे, त्यांच्या उत्पादनात वाढ झाल्याचे लक्षात आले आहे.
यानंतर यंदा नांदेड जिल्ह्यात टोकण पद्धतीने सोयाबीन लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. पावसापूर्वी अनेक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या साह्याने बेडची आखणी करून घेतली. यानंतर सध्या झालेल्या हलक्या पावसावर शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड सुरू केली आहे.
टोकण यंत्र खरेदीला झुंबड
सोयाबीनची लागवड मजूराद्वारे टोकण पद्धतीने करणे वेळखाऊ व खर्चिक असल्याने शेतकरी टोकण यंत्र खरेदी करीत आहेत. या यंत्राद्वारे ठरावीक अंतरावर बियाणे टोकण करता येते. तसेच योग्य खोलीवर बियाणे पडत असल्याने त्याची उगवणही चांगली होत असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. यामुळे सध्या बाजारात या यंत्राच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.