Cotton Cultivation : ठिबक सिंचनावर कपाशीच्या लागवडीकडे कल

Cotton Update : यंदा मोसमी पावसाच्या आगमनास उशीर झाला आहे. परिणामी जिरायती क्षेत्रातील कपाशीची लागवड तसेच अन्य खरीप पिकांच्या पेरण्या रखडल्या आहेत.
Cotton Cultivation
Cotton CultivationAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : यंदा मोसमी पावसाच्या आगमनास उशीर झाला आहे. परिणामी जिरायती क्षेत्रातील कपाशीची लागवड तसेच अन्य खरीप पिकांच्या पेरण्या रखडल्या आहेत. परंतु परभणी जिल्ह्यातील सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यातच कपाशीची लागवड केली.

उत्पादकता वाढीसाठी वेळेवर लागवड व्हावी तसेच पावसाच्या खंड काळात संरक्षित पाणी देता यावे या उद्देशाने यंदा ठिबक सिंचन पद्धतीने कपाशीची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कपाशीचे खरीप हंगामातील महत्त्वाचे नगदी पीक आहे. यंदा जिल्ह्यात १ लाख ९५ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड प्रस्तावित आहे. कपाशीचे जिरायती क्षेत्र अधिक आहे. पूर्वी सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी २५ मे नंतर कपाशीची लागवड करत असत.

परंतु आता १ जूनपासून कपाशीच्या बियाण्याची विक्री सुरू होत आहे. त्यामुळे जूनच्या प्रारंभी कपाशीची लागवड केली जात आहे. वेळेवर लागवड झाली तर चांगली उत्पादकता मिळत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. परंतु यंदा जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात अत्यंत कमी पाऊस झाला. त्यामुळे कपाशीच्या लागवड रखडली आहे.

Cotton Cultivation
Cotton Market : सेलू बाजार समितीत कापूस प्रतिक्विंटल ६००० ते ७२८० रुपये

परंतु विहिरी, बोअर, शेततळे, कालवे आदी सिंचन स्रोतांना पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी सरी पद्धतीने तसेच ठिबक सिंचनावर कपाशीची लागवड केली आहे. परभणी तालुक्यातील मांडाखळी, सोन्ना, जांब, बाभूळगाव आदी गावांसह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतील शेतकऱ्यांनी ठिंबक सिंचनावर कपाशीची लागवड केली आहे.

बियाण्याची उगवण व्यवस्थित झालेले कपाशीचे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. काही भागांत कपाशीमध्ये आंतरमशागतीची कामे सुरू आहेत.

धूळ पेरणीची जोखीम...

वेळेवर पाऊस येईल या अपेक्षेने अनेक मंडलांतील जिरायती क्षेत्रातील शेतकऱ्यांनी धूळ पेरणीद्वारे कपाशीची लागवड केली. त्यानंतर काही मंडलांत पाऊस झाल्यानंतर बियाण्याची काही प्रमाणात उगवण झाली. परंतु त्यानंतर पावसाने दडी मारली आहे. उगवण व्यवस्थित न झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार लागवड करावी लागणार आहे.

दरवर्षी चांगल्या उत्पादकतेसाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात कपाशीची लागवड करत असतो. यंदा ८ जून रोजी १० एकर ठिबक सिंचनावर कपाशीची लागवड केली आहे.
कल्याण सिराळ, मांडाखळी, जि. परभणी
यंदा आजवर पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे जमिनीत पुरेसा ओलावा नाही. येत्या काळात पावसाची अनिश्चितता विचारात घेऊन यंदा तीन एकरावर ठिबक सिंचन पद्धतीने कपाशीची लागवड केली आहे.
गणेशराव खरवडे, किन्होळा, ता. परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com