Warehouse Receipt : शेतीमाल विक्रीसाठी गोदाम पावतीचा व्यवहार

Sales Management of Warehouse : राष्ट्रीय स्तरावरील कृषिविषयक गोदाम आधारित शेतीमाल विक्रीच्या प्रक्रियेमध्ये नॅशनल रिपॉझिटरी लिमिटेड (एनईआरएल) या संस्थेमार्फत गोदाम पावती विषयक शेतमाल विक्री व्यवस्थापनाचे व्यवहार करण्यास साह्य केले जाते.
Warehouse
WarehouseAgrowon
Published on
Updated on

Transaction of Warehouse Receipt : शेतीमालास योग्य बाजारभाव मिळावे यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना करताना शेतीमालाच्या मूल्यसाखळ्या निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होताना दिसत आहे. मोठ्या क्षमतेच्या प्रमाणित गोदामांची निर्मिती, नाफेडमार्फत हमीभावाने होणाऱ्या खरेदीमध्ये सहभाग,

खासगी कंपन्यांशी शेतमालविषयक विक्रीचे करार, ऑनलाइन प्लॅटफॉर्मशी जोडणी, खासगी कृषी उत्पन्न बाजार समिती निर्मिती, शेतीमालाची निर्यात, शेतमालावर प्रक्रिया अशा विविध मार्गानी शेतमालाच्या मूल्यसाखळ्याची निर्मिती करण्यात समुदाय आधारित संस्था व्यस्त आहेत.

यामध्ये प्रामुख्याने गोदामविषयक मूल्यसाखळ्या निर्मितीच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत असून गोदाम पावती अथवा वखार पावतीच्या प्रक्रियेबाबत शेतकरी वर्गास माहिती नसल्याने व्यापारी वर्गाप्रमाणे शेतकऱ्यांना शेतीमाल विक्री व्यवस्थापनाच्या माध्यमातून नफा कमविता येत नाही.

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गोदाम पावतीच्या प्रचार, प्रसिद्धीच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न करीत असून शेतकऱ्यांच्याकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे. शेतकरी एकदा वखार पावतीच्या प्रक्रियेत सहभागी झाले तर त्यांना पुढील शेतीमाल विक्री व्यवस्थापन करणे सुद्धा सोईस्कर होऊ शकेल.

परंतु त्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था व महिला बचत गट या समुदाय आधारित संस्थांना त्यांच्या शेतकरी सभासदांनी गोदाम पावती योजनेसारख्या प्रयोगांना उत्तम प्रतिसाद देऊन गोदाम आधारित मूल्यसाखळी बळकट करण्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय स्तरावरील कृषिविषयक गोदाम आधारित शेतीमाल विक्रीच्या प्रक्रियेमध्ये नॅशनल रिपॉझिटरी लिमिटेड (एनईआरएल) या संस्थेमार्फत गोदाम पावती विषयक शेतीमाल विक्री व्यवस्थापनाचे व्यवहार करण्यास साह्य केले जाते.

Warehouse
Warehouse Receipt Scheme : शेतकऱ्यांनी गोदाम पावती योजनेचा लाभ घ्यावा

गोदाम उभारणीनंतर गोदाम व्यवसाय सुरू करण्याच्या प्रक्रियेत रिपॉझिटरीचे खूप महत्त्वाचे कार्य असून, सर्व शेतकरी कंपन्यांनी ते समजून घेणे गरजेचे आहे. याकरिता ज्या शेतकरी कंपनी, सहकारी संस्था व महिला बचत गटांनी गोदाम उभारलेले आहे,

त्यांना गोदाम आधारित शेतीमाल मूल्यसाखळी उभारणीमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी रिपॉझिटरीचे सहभागीदार होणे आवश्यक आहे.

नॅशनल रिपॉझिटरी लिमिटेड (एनईआरएल) या संस्थेमार्फत आवश्यकतेनुसार रिपॉझिटरी सहभागीदाराची नेमणूक केली जाते. एनईआरएल ही संस्था एनसीडीएक्स या भारतातील वायदे बाजार विषयक कमोडिटी एक्स्चेंजची सहयोगी संस्था असून ती रिपॉझिटरी म्हणून शेतीमालाच्या गोदाम आधारित मूल्य साखळी व्यवसायात कार्यरत आहे.

गोदाम पावती व्यवसायात भौतिक स्वरूपात देण्यात येणारी वखार पावती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात देण्याचे कामकाज करणारी एनईआरएल ही एक रिपॉझिटरी म्हणून कार्यरत आहे. गोदाम व्यवसायात उतरल्यानंतर त्यातील यंत्रणा आणि व्यवहाराची कामकाजविषयक संपूर्ण माहिती समुदाय आधारित संस्थांनी म्हणजेच शेतकरी कंपनी, सहकारी संस्था व महिला बचत गटांचे फेडरेशन यांनी घेणे आवश्यक आहे.

एनईआरएलमार्फत गोदामविषयक व्यवहारात कामकाज करण्यासाठी एजंटची नेमणूक करण्यात येत असून, रिपॉझिटरी सहभागीदार हे एनईआरएलच्या रिपॉझिटरीचे एजंट म्हणून कार्य करतात. त्यांनी रिपॉझिटरीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सेवा प्रदान करणे अपेक्षित असते.

या क्षेत्रात व्यवसायाच्या दृष्टीने समुदाय आधारित संस्थांनी म्हणजेच शेतकरी कंपनी, सहकारी संस्था व महिला बचत गटांचे फेडरेशन यांनी व्यवसाय म्हणून कामकाज करण्याच्या दृष्टीने विचार करणे अपेक्षित आहे, परंतु रिपॉझिटरी सहभागीदार म्हणून कामकाज करणे ही तांत्रिक बाब असल्याने या व्यवसायात काम करण्यासाठी संस्थांनी स्वत:ची क्षमता बांधणी करणे गरजेचे आहे.

रिपॉझिटरी सहभागीदारांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या

वखार विकास व नियामक प्राधिकरणाच्या (WDRA) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रिपॉझिटरी एक किंवा अधिक संस्थांना रिपॉझिटरी सहभागीदार म्हणून नियुक्त करू शकते. वखार विकास व नियामक प्राधिकरणाच्या (WDRA) रिपॉझिटरीज आणि इलेक्ट्रॉनिक वेअरहाउस रिसिट्सच्या निर्मिती आणि व्यवस्थापनावरील मार्गदर्शक तत्त्वांच्या कलम १६(४) नुसार नेमणूक केलेले व्यक्ती अथवा संस्था खालील उद्देशांपैकी एक किंवा सर्व उद्देश पूर्ण करणे अपेक्षित आहे.

रिपॉझिटरीच्या वतीने, ठेवीदाराची ओळख आणि पत्ता ज्याच्या नावे गोदामधारक इलेक्ट्रॉनिक वेअरहाउस पावती जारी करू इच्छितो, अशा ठेवीदाराची ओळख व माहिती भौतिक पडताळणीद्वारे तपासणे.

रिपॉझिटरीवरील वापरकर्त्यांची खाती उघडणे, त्या खात्यांचे व्यवस्थापन करणे आणि चालू नसलेली खाती बंद करणे.

इलेक्ट्रॉनिक वेअरहाउस पावत्या जारी करणे, त्यात आवश्यकतेनुसार बदल करणे, पावत्यांचे हस्तांतर करणे, गोदाम पावती तारण ठेवणे आणि ई-लिलाव करणे.

रिपॉझिटरीद्वारे वेळोवेळी निर्देशित केल्यानुसार आवश्यकतेप्रमाणे प्रासंगिक कामकाज करणे.

Warehouse
Agriculture Warehouse : शेतकऱ्यांसाठी मंचरला एक हजार टन क्षमतेचे गोदाम

रिपॉझिटरी सहभागीदार होण्यासाठी पात्रतेच्या अटी

वखार विकास आणि नियामक प्राधिकरणाच्या (WDRA) रिपॉझिटरीज आणि इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल वेअरहाऊस रिसिप्ट्सची निर्मिती व व्यवस्थापनाबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या नियम क्र. १६ (४) नुसार आणि रिपॉझिटरी व्यवसाय नियम ९(१) च्या मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे, खालील संस्था रिपॉझिटरीमध्ये रिपॉझिटरी सहभागीदार म्हणून सहभागी होण्यासाठी पात्र आहेत:

बँक, किंवा बँकिंग नियमन कायदा, १९४९ आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा, १९३४ अंतर्गत परवानाकृत वित्तीय संस्था.

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया, पीएफआरडीए किंवा आयआरडीएमध्ये नोंदणीकृत कोणताही मध्यस्थ.

गोदामधारक रिपॉझिटरीद्वारे निर्दिष्ट केलेल्या आणि वेळोवेळी प्राधिकरणाने मंजूर केलेल्या पात्रतेच्या अटी पूर्ण करीत असल्यास तो रिपॉझिटरी सहभागीदार होण्यासाठी पात्र आहे. परंतु उपरोक्त अटींव्यतिरिक्त, गोदामधारकाने खालील अटींचे पालन केले पाहिजे.

वेअरहाउसमनने किंवा गोदामधारकाने रिपॉझिटरी पार्टिसिपंट किंवा रिपॉझिटरी सहभागीदार म्हणून कामकाज करताना त्याची तांत्रिक आणि कामकाज अशा दोन्ही स्तरांचा समावेश असणारी कार्ये त्याच्या गोदामातील कामकाजामधून पूर्णपणे विभक्त करणे आवश्यक आहे.

जर रिपॉझिटरी सहभागीदाराने आधारची बायोमेट्रिक किंवा ओटीपी आधारित पडताळणी केली तर गोदामधारक शेतकऱ्यांसाठी क्लायंट खाते उघडण्याची सुविधा देऊ शकतात.

रिपॉझिटरी पार्टिसिपंटच्या अधिकृत कर्मचाऱ्यांद्वारे शेतीमाल ठेवीदाराची वैयक्तिक पडताळणी अधिक सक्षम करण्यासाठी वेअरहाउसमनकडे आवश्यक पायाभूत सुविधा जसे की वेब-कॅमेरा इत्यादीची तरतूद अथवा सुविधा असणे आवश्यक आहे.

रिपॉझिटरी सहभागीदार संस्था

प्राधिकरणाने वेळोवेळी रिपॉझिटरी सहभागीदार म्हणून काम करण्याची परवानगी दिलेल्या इतर कोणत्याही वर्गातील व्यक्तींचा यात समावेश करता येऊ शकतो. वर नमूद केलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या संस्था ज्यांना रिपॉझिटरी सहभागीदार म्हणून प्रवेश दिला जाऊ शकतो अशा संस्था खालील प्रमाणे आहेत:

कॉर्पोरेट्‌स

एलएलपी (लिमिटेड लायाबिलिटी पार्टनरशिप)

भागीदारी

बँका/नॉन बँकिंग फायनांशियल कंपनी

रिपॉझिटरी सहभागीदार होण्यासाठीची प्रक्रिया

अर्जदार साइनअप प्रक्रियेद्वारे ऑनलाइन नोंदणी करू शकतात. तसेच अधिक माहितीसाठी एनइआरएल च्या संकेतस्थळावर भेट देऊ शकता.

रिपॉझिटरी सहभागीदार होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि शुल्क

अर्ज.

५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर रिपॉझिटरी सहभागदार करारनामा किंवा फ्रँकिंग (जोडलेले)

कंपनीचे/भागीदारी फर्म/एलएलपी पॅन कार्डची रीतसर साक्षांकित प्रत.

संचालक/भागीदार/नियुक्त संचालक तपशील उदा. नाव, पात्रता, संपर्क तपशील, अनुभव कंपनीचे योग्य प्रमाणित जीएसटी प्रमाणपत्र.

बँक खाते क्रमांक आणि ज्या तारखेपासून कार्यरत आहे त्या बाबी प्रमाणित करणारे बँकेचे पत्र.

संचालक/प्रवर्तक भागधारक/भागीदार यांच्या पॅन कार्डची प्रत.

निव्वळ मूल्य प्रमाणपत्र(नेट वर्थ प्रमाणपत्र).

नियुक्त संचालक/भागीदार यांच्या कामाच्या अनुभवाचा पुरावा.

बँकेने सत्यापित केलेल्या अधिकृत स्वाक्षरींच्या यादीसह मंडळाचा ठराव/भागीदाराचा ठराव.

ताळेबंद आणि खात्यांतील नोट्ससह चालू आर्थिक वर्षासाठी वार्षिक अहवाल.

असोसिएशनचे लेख (AoA) आणि मेमोरँडम ऑफ असोसिएशन (MoA)/ भागीदारी करार.

संलग्न नमुन्यानुसार भागधारकांचे तपशील.

फिट आणि योग्य उपक्रमाबाबत घोषणापत्र.

टीप : नोंदणी शुल्काबाबत एनईआरएलच्या संकेतस्थळावरून हेल्प डेस्कला संपर्क करावा.

- प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०

(शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, एमसीडीसी, स्मार्ट

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या.पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com