
Raigad News : डणाऱ्या पावसाने नदीनाले वाहू लागलेले असल्याची संधी साधून काही रासायनिक कंपन्या दूषित पाणी नदी, नाल्यात सोडत असल्याचे प्रकार रायगड जिल्ह्यात आढळून येत आहेत. जमिनीतून दूषित पाण्याचे झरे सुरू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अशा प्रदूषणकारी कंपन्यांवर प्रदूषण नियंत्रण महामंडळाने धडक कारवाई सुरू केली आहे.
काही दिवसांपासून धाटाव एमआयडीसी येथील दीपक नायट्राइट कंपनीच्या मोकळ्या जागेतून दूषित सांडपाणी येत असल्याने परिसरात जल व वायू प्रदूषण होत असल्याने याविषयी ठाकरे गटाचे शाखाप्रमुख नीलेश वारंगे यांनी तक्रार केली होती.
या तक्रारीची दखल घेत धाटाव एमआयडीसी व प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दीपक नायट्राइट कंपनी प्रशासनाने जेसीबीद्वारे खोदकाम केल्यानंतर पाण्याच्या झऱ्याशेजारी असलेल्या फाइनसॅक फूड इंग्रेडिन्ट अँड कलर्स प्रा. लि. या कंपनीच्या प्लॉटमधील जमिनीखालून दूषित पाणी येत असल्याचे स्पष्ट झाले.
फाइनसॅक कंपनी रोह्यातील एका बड्या उद्योगपतीचा कारखाना असून, या कंपनीविरोधात धाटाव एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळ प्रशासन काय कारवाई करते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. यासंदर्भात धाटाव एमआयडीसी व प्रदूषण नियंत्रण महामंडळ प्रशासनाकडे लेखी तक्रार देत भूगर्भातून वाहणाऱ्या दूषित पाणी कोणत्या कंपनीचे आहे. याचा शोध घेऊन संबंधित दोषी कंपनीवर कडक कारवाई करण्याची मागणी नीलेश वारंगे यांनी पत्राद्वारे केली आहे.
तक्रारीची दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी राजेश आवटी, उपअभियंता डॉ. गजानंद, धाटाव एमआयडीसीचे उपअभियंता शशिकांत गीते, दीपक नायट्रेड कंपनीचे अभियंता अन्वर शेख, अधिकारी प्रशांत पोरे, तरुण उद्योजक आकाश केडिया, शाखाप्रमुख नीलेश वारंगे, उपशाखा प्रमुख महेश खांडेकर, भारत वाकचौरे तसेच धाटाव एमआयडीसीतील संबंधित अधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. १०) सायंकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या दरम्यान दीपक नायट्राइट कंपनीच्या ५३/अ नंबरच्या प्लॉटमधून येणाऱ्या रसायनमिश्रित पाण्याचे नमुने लॅबमध्ये तपासणीकरिता ताब्यात घेतले आहेत. त्यानंतर पाहणी करून घटनेचा पंचनामा केला. अशीच परिस्थिती पाताळगंगा, महाड, नागोठणे परिसरातील औद्योगिक वसाहतींमध्ये आहे. पावसाळ्यात येथील रासायनिक कारखाने संधी साधून रासायनिक सांडपाणी नद्यांमध्ये सोडून देतात. यामुळे कुंडलिका, सावित्री, पाताळगंगा या नद्यांच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
शेतकरी, कोळीबांधवांचे आर्थिक नुकसान
दूषित सांडपाण्यामुळे मोठ्या प्रमाणात जल व वायू प्रदूषण होत आहे. दूषित सांडपाणी कुठल्या जागेतून बाहेर पडत आहे. याचा शोध घेणे गरजेचे असताना सांडपाणी तातडीने बंद होण्याबाबत उपाययोजना करणेदेखील गरजेचे आहे; मात्र कंपनीने याकडे दुर्लक्ष केल्याचे म्हणणे येथील ग्रामस्थांचे आहे.
नीलेश वारंगे यांनी आक्रमक भूमिका घेत उपस्थित अधिकाऱ्यांना दूषित पाणी पिऊन दाखवावे, असे सांगत या पाण्यामुळे मासे मृत्युमुखी पडत असल्याने कोळीबांधवांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. शेती नापीक झाल्याने शेतकऱ्यांचेदेखील नुकसान होत आहे.
धाटावमध्ये वाढते प्रदूषण
धाटाव औद्योगिक क्षेत्रातील रसायननिर्मिती करणाऱ्या दीपक नायट्रेड प्रा.लि. या कंपनीच्या मोकळ्या प्लॉट नंबर ५३/अ या रिकाम्या जागेतून मागील आठ ते दहा दिवसांपासून मोठ्या प्रमाणात लाल व काळ्या रंगाचे रसायनमिश्रित सांडपाणी येत असून, हे दूषित सांडपाणी सार्वजनिक नाल्याद्वारे नदीत जात असल्याने या दूषित सांडपाण्यामुळे कुंडलिका नदी प्रदूषित झाली. परिसरात जल व वायू प्रदूषण झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या दूषित पाण्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.