
डॉ. ए. पी. गरडे, आर. आर. राठोड, डॉ. एस. एस. मिनगिरे
तोंडली (शा. नाव - कोक्सीनिया ग्रँडिस) हे कुकुरबिटासी कुटुंबातील वेलवर्गीय भाजीपाला पीक आहे. या काकडीवर्गीय फळभाजीमध्ये मधूमेह, ब्राँकायटिस, त्वचाविकारांवर नियंत्रण ठेवणारे अनन्यसाधारण औषधी घटक आहेत.
ते तापावर नियंत्रण ठेवतात. तोंडलीमध्ये दाह-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट घटक असून, कॅरोटीन मुबलक प्रमाणात असते. महाराष्ट्रामधील हवामान आणि माती प्रकार हे या पिकासाठी योग्य असून, या पिकाखालील लागवडीमध्ये वाढ होत आहे. त्याची फळधारण क्षमता अधिक असून, वर्षभर नियमित उत्पादन देणारे पीक आहे.
मशागत
तोंडलीच्या लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते भारी प्रकारची जमीन योग्य असते. मातीचा सामू उदासीनच्या जवळपास (६ ते ६.५) असल्यास तोंडलीचे अधिक व दर्जेदार उत्पादन मिळते. माती खूप खोल किंवा हलकी नसावी. जमीन पूर्णपणे स्वच्छ आणि तणमुक्त असावी. त्यासाठी जमीन नांगरणी करून घ्यावी. त्यानंतर कुळवणी करून घ्यावी. शेवटच्या कुळवणीपूर्वी जमिनीत उत्तम कुजलेले शेणखत मिसळून घ्यावे.
लागवडीचा हंगाम
तोंडलीची लागवड वर्षाच्या कोणत्याही कालावधीत करणे शक्य आहे. मात्र आपल्याकडे त्याची लागवड मुख्यतः जून ते जुलैमध्ये किंवा फेब्रुवारी ते मार्च सारख्या वसंत ऋतूमध्ये केली जाते. एकदा लागवड केली की वेल सुमारे चार वर्षांपर्यंत चांगले व नियमित उत्पादन देत राहते. त्यामुळे चार वर्षानंतर त्याच्या पुनर्लागवडीची शिफारस केली जाते. झाडाच्या वेलींना आधारासाठी २ मीटर उंचीच्या बांबूपासून मांडव करून घ्यावा. तोंडलीच्या रोपांची निर्मिती हरितगृहामध्ये केल्यास उत्तम. तोंडली हे पीक उष्ण व दमट हवामानात चांगले वाढते. अति थंड हवामानात या पिकाची वाढ खुंटते.
वाण
तोंडलीचे स्ट्रीप टिंडोरा आणि नॉन-स्ट्रीप टिंडोरा असे मुख्यतः दोन प्रकार आहेत. भारतातील सुलभा, इंदिरा कुंद्रू-५, इंदिरा कुंद्रू-३५, थार सुंदरी, अक्रा नीलाचल साबुजा, व्हीआरके-२० आणि व्हीआरके-३१ सारख्या तोंडलीच्या सुधारित जाती आहेत. थार सुंदरी ही जात प्रामुख्याने वसंत ऋतूमध्ये म्हणजेच उन्हाळा आणि हिवाळा हंगामात लागवडीसाठी योग्य आहे. आपल्याकडे घोलवड स्थानिक, अलिबाग स्थानिक आणि इतर स्थानिक जातींचीसुद्धा लागवड केली जाते.
लागवड
तोंडलीचे पुनरुत्पादन हे १० ते १५ सेंमी लांब आणि ०.५ सेंमी व्यासाच्या काड्यांद्वारे केले जाते. रोपे तयार करण्यासाठी गादीवाफ्यावर २० किलोपर्यंत शेणखत टाकावे. त्यानंतर हलके पाणी देऊन ३० सेंमी खोल आणि ६० सेंमी व्यासाचे छिद्रे तयार करतात. त्यात तोंडलीच्या काड्या सरळ किंवा थोड्या तिरक्या लावल्या जातात.
त्यामुळे बाजूच्या कोंबांच्या विकासास चालना मिळते. बियांद्वारे पुनरुत्पादन टाळले जाते, कारण यात नर आणि मादी वनस्पती वेगवेगळ्या वाढतात. त्यांचे प्रमाण ५० - ५० टक्के राहते. आपल्याला शेतीमध्ये अधिक उत्पादन मिळविण्यासाठी सामान्यतः १० मादी वेलींमागे एक नर वेल परागीकरणासाठी पुरेशी ठरते.
पावसाळा वगळता अन्य कोरड्या कालावधीत प्रत्यक्ष शेतामध्ये रोपांची लागवड करताना पुरेसे पाणी द्यावे. शेतामध्ये लागवड करताना दोन रोपातील अंतर अंदाजे १ मीटर आणि ओळींमधील अंतर १.२ ते १.६ मीटर असावे. वेलीचे तणावे व शेंडे हे वेगाने वाढून १० मीटर किंवा त्याहूनही अधिक लांबीपर्यंत वाढू शकतात. त्यामुळे जास्त रुंद अंतर आवश्यक असते. या रुंद अंतरामुळे कीड, रोग आणि तण नियंत्रण सोपे होते.
खते
खते देण्यापूर्वी माती परीक्षण करणे आवश्यक आहे. शेणखत जमीन तयार करताना टाकावे. रासायनिक खतांचा शिफारशीपेक्षा जास्त प्रमाणात वापर करू नये. त्यामुळे माती कोरडी व नापीक होते. प्रत्येक वेळी खत टाकल्यानंतर हलके पाणी द्यावे. नत्र, स्फुरद आणि पालाश यांचे प्रमाण शिफारशी प्रमाणे संतुलित ठेवावे. या पिकासाठी N:P:K शिफारस ६० ते८० : ४० ते ६० : ४० किलो प्रति हेक्टर आहे. खते दरवर्षी फुलांच्या, फळाच्या अवस्थेत वापरावेत. पिकांवरील कमतरतेच्या लक्षणानुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा.
सिंचन
तोंडलीच्या झाडांना लहान असतानाच जास्त पाणी लागते. लागवड झाल्यानंतर लगेचच झाडांना पाणी द्यावे. कडक उन्हाळ्यात या पिकाला दर आठवड्याला हलक्या सिंचनाची आवश्यकता असते. पावसाळ्यात पावसाच्या प्रमाणानुसार सिंचनाचे नियोजन करावे. फुलांच्या अवस्थेत पुरेशी आर्द्रता राखण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर फायदेशीर ठरतो. हिवाळ्यात जमिनीतील ओलाव्यावर आधारीत सिंचनाचे नियोजन करावे. ही झाडे पाणी साचण्यास संवेदनशील आहेत. त्यामुळे शेतात पाणी साचणार नाही, याकडे लक्ष द्यावे. फुले लागत असताना आणि फळे तयार होण्याच्या काळात झाडांना पुरेसे पाणी द्यावे.
आंतरपीक
तोंडली हे पीक वेगाने वाढणारे आहे. मात्र आपण दोन ओळीमध्ये अधिक अंतर ठेवत असल्याने त्या दरम्यान अन्य तणांची वाढ होऊ शकते. त्यामुळे तणांच्या वेळीच नियंत्रणासाठी आंतरमशागत व यांत्रिकीकरण उपयोगी ठरते.
पीक संरक्षण
तोंडलीच्या पिकावर फळमाशी ही कीड आणि भुरी व अन्य इतर रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्याचा नियंत्रणासाठी शिफारशीप्रमाणे कीडनाशकांचा वेळीच वापर करावा.
कापणी
तोंडली प्रामुख्याने फळे आणि वेलींसाठी काढली जाते. वेलींसाठी, पाने पूर्णपणे परिपक्व झाल्यावर झाडे उचलली पाहिजेत. फळे अपरिपक्व अवस्थेतच खाल्ली जातात. किंवा भाजीसाठी वापरली जातात. फळे परिपक्व (आतून लाल) होण्याआधी काढणे आवश्यक असते. प्रत्येक फळ वेलींमधून वेगळेवेगळे कापावे लागते. कापताना वेलीला किंवा फळांना इजा होणार नाही, याकडे लक्ष द्यावे.
तोंडली काढल्यानंतर ताजीच बाजारात पोचवण्याची व्यवस्था करावी. कापणीनंतर स्वच्छ व कोरडे करून आकार आणि गुणवत्तेनुसार फळांची वर्गवारी आणि प्रतवारी करावी. लांब पल्ल्याच्या बाजारपेठेसाठी किंवा निर्यातीच्या उद्देशाने तोंडली फळांचे बॉक्स किंवा कर्टनमध्ये पॅकिंग करणे गरजेचे असते. साधारण तोंडली रोप लागवडीनंतर २ महिन्यांनी फुलण्यास सुरवात होते. चांगल्या शेती व्यवस्थापनामध्ये हेक्टरी सरासरी १२ ते १५ टनापर्यंत उत्पादन मिळू शकते.
तोंडलीचे पौष्टिक आणि वैद्यकीय मूल्य
शरीरातील चरबी कमी करण्यासाठी आहारात तोंडलीचा समावेश करावा. त्यामुळे शरीरातील चयापचय क्रिया वाढून चरबीचे प्रमाण कमी होते.
श्वासोच्छ्वासाच्या समस्या असलेल्या लोकांसाठी तोंडली फायदेशीर ठरतात.
तोंडली रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवत असल्याने मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात.
पोटॅशिअम भरपूर असून, पोटॅशिअममुळे रक्ताचा नियमित प्रवाह राखला जातो. हृदय निरोगी राहण्यास मदत करते.
तोंड आल्यावर कोवळी तोंडली खावी.
तोंडलीमध्ये रेचक गुणधर्म असतात.
तोंडली हा व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे.
दमा, कावीळ, ब्राँकायटिस आणि कुष्ठरोग, खरूज आणि सोरायसिस यासारख्या त्वचेच्या समस्यांसाठी उपयोगी.
डॉ. ए. पी. गरडे, ८८०८८३८४५०
साहाय्यक प्राध्यापक, उद्यान विद्या विभाग, छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था, कृषी महाविद्यालय, कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.