Bitter Gourd Farming: कारले लागवडीत अन्नद्रव्य, कीड-रोग व्यवस्थापनाला प्राधान्य

Bitter Gourd Cultivation: नाशिक जिल्ह्यातील संसारी येथील काशिनाथ त्र्यंबक गोडसे पोलिस खात्यात नोकरी कार्यरत होते. नोकरी करत असतानाच मिळणाऱ्या वेळेत शेती कामे करण्यावर त्यांचा भर असायचा.
Bitter Gourd Farming
Bitter Gourd FarmingAgrowon
Published on
Updated on

Bitter Gourd Farming Management:

शेतकरी नियोजन । पीक : कारले

शेतकरी : काशिनाथ गोडसे

गाव : संसारी, ता. जि. नाशिक

एकूण क्षेत्र : १५ एकर

कारले लागवड : १ एकर

नाशिक जिल्ह्यातील संसारी येथील काशिनाथ त्र्यंबक गोडसे पोलिस खात्यात नोकरी कार्यरत होते. नोकरी करत असतानाच मिळणाऱ्या वेळेत शेती कामे करण्यावर त्यांचा भर असायचा. आता काशिनाथ गोडसे सेवानिवृत्त झाले असून मुलगा रोहन याच्या सोबतीने शेती करत आहेत. गेल्या २० वर्षांपासून ते द्राक्ष शेती करत आहे.

या वर्षी त्यांनी एक एकरावरील द्राक्ष लागवड काढून पारंपरिक पिकांच्या लागवडीचा पर्याय निवडला. बाजारातील मागणीचा अभ्यास करून भाजीपाला लागवडीचा निर्णय घेतला. त्यातूनच द्राक्ष बागेच्या उपलब्ध स्ट्रक्चरचा वापर करून कारले लागवड केली आहे. कारले पिकामध्ये लागवडीपासून पीक नियोजन, अन्नद्रव्य व कीड-रोग व्यवस्थापनाला प्राधान्य दिले. नियोजनबद्ध व्यवस्थापनातून दर्जेदार कारले उत्पादन घेण्यात काशिनाथ गोडसे यशस्वी झाले आहेत.

Bitter Gourd Farming
Bitter Gourd Farming : दारू झाली कडू, कारले झाले गोड !

अन्नद्रव्य व्यवस्थापन

कारले पिकाची जोमदार वाढ होण्याच्या अनुषंगाने पीक व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात आला. जेणेकरून वेलींना ताण बसू नाही. तसेच उत्पादकता व गुणवत्ता राखून कारल्यास चांगली दर मिळावेत.

लागवड झाल्यानंतर वाढीच्या अवस्थेत रासायनिक खतांचे योग्य नियोजन करण्यात आले. वेलींची जोमदार वाढ होण्यासह उत्पादन वाढीसाठी ठिबक सिंचनातून विद्राव्य खते दिली.

पीक वाढीच्या काळात कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच वेली सशक्त राहण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आळवणी करण्यात आली.

रासायनिक खतांमध्ये १२:६१ः०, १२:३२:१६, १२:६:२२, ०:५२:३४, ०ः६०:२०, ५५:१८:० या खतांचा वापर करण्यात आला. यासह कुक्कुटखत पाण्यात भिजवून त्याचे गाळण करून ते विद्राव्य पद्धतीने देण्यात आले. वेलीची वाढ, फुलधारणा, फुगवण व फळ वाढीसाठी टप्प्याटप्प्याने खतांचे नियोजन करण्यात आले. त्यामुळे वेलींच्या वाढीसह दर्जेदार उत्पादन मिळविणे शक्य झाले.

जोमदार वाढ, फुलधारणा व फळधारणेसाठी कॅल्शिअम, मॅग्नेशिअम बोरॉन व झिंक युक्त खतांचा देखील वेळोवेळी वापर करण्यात आला.

लागवड नियोजन

द्राक्ष बागेतील उपलब्ध स्ट्रक्चर मंडप पद्धतीचे होते. त्यावर ४ बाय ९ फूट या अंतरावर कारले लागवड केली. लागवडीसाठी वाण निवडीविषयी भरपूर अभ्यास केला. आकर्षक, रंग व लांबी आदी बाबींना प्राधान्य देत योग्य कारले वाणाच्या रोपांची उपलब्धता केली.

लागवड करण्यापूर्वी शेतात एकरी ३ ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत मिसळून घेतले. त्यानंतर एकरी १ ट्रॉली प्रमाणे कुक्कुटखत सरीवर पसरून घेतले.

त्यानंतर २४ नोव्हेंबर २०२४ रोजी सफेद रंगाच्या २५ मायक्रॉन जाडीच्या मल्चिंग पेपरवर कारले लागवड केली.

Bitter Gourd Farming
Bitter Gourd Disease: कारले पिकातील भुरी रोगावरील प्रतिबंधात्मक उपाय

लागवडीसाठी एकरी सुमारे १०२७ रोपे वापरण्यात आली.

रोपांची लागवड केल्यानंतर वाढीच्या अवस्थेत वेल मंडपावर चढत असताना वेलीला आधार देणे अत्यंत आवश्यक असते. त्यानुसार नवीन फुटीच्या माध्यमातून उत्पादन व फळधारणा होण्यासाठी मंडपाचे नियोजन केले. वेल वर चढण्यासाठी व वेलीचे फुटवे पसरण्यासाठी क्रॉप नेटचा वापर केला.

वाढीच्या अवस्थेतील वेली क्रॉप नेटवर चढवून देण्यात आल्या. लागवडीनंतर साधारण पंधरा दिवसांनी जाळी पसरून तसे नियोजन करण्यात आले. या वेळी वेली तुटणार नाहीत तसेच फुलकळी घासून ती गळून पडणार नाही याकडे विशेष लक्ष देण्यात आले, असे काशिनाथ गोडसे सांगतात.

विक्री नियोजन

मागील चार दिवसांपासून काढणीस सुरुवात केली आहे. सध्या कमी प्रमाणात उत्पादन मिळत आहे. मात्र पुढील आठवड्यापासून टप्प्याटप्प्याने उत्पादनात वाढ होत जाईल. त्यानुसार काढणीचे नियोजन केले जाईल. कारल्याची काढणी केल्यानंतर हाताळणी, प्रतवारी करण्यावर भर दिला जाईल. त्यानंतर दर्जेदार माल क्रेटमध्ये भरून विक्रीसाठी पाठविला जाईल.

रोग, कीड व्यवस्थापन

कारले लागवडीत प्रामुख्याने मावा, तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. कीड नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे कारले लागवडीत लावण्यात आले. एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केल्याने त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. तसेच पांढरी माशी, तुडतुडे, नागअळी यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिफारशीत कीटकनाशकांचा वापर केला. पिकाचे वेळोवेळी निरीक्षण करून निरीक्षणे नोंदविण्यात आली. घेतलेल्या निरीक्षणावरून आवश्यकतेनुसार रासायनिक फवारणीचे नियोजन केल्यामुळे पीक संरक्षणावरील खर्च मर्यादित राहून त्याचे चांगले परिणाम दिसून आल्याचे काशिनाथ गोडसे सांगतात.

- रोहन गोडसे ७०६६९०५६४७

(शब्दांकन : मुकुंद पिंगळे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com