
Pandharpur News : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना जलद व सुलभ दर्शन व्हावे, यासाठी मंदिर समितीमार्फत टोकन दर्शन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीचा प्रथम चाचणी प्रारंभ रविवारी (ता. १५) मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
टोकन दर्शन प्रणालीच्या प्रारंभादरम्यान टोकन घेऊन आलेल्या वारकरी भाविकांचे मंदिर समितीच्या वतीने स्वागत व सन्मान करण्यात आला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, या जयघोषात भाविकांनी दर्शनरांगेत प्रवेश केला.
या वेळी मंदिर समितीचे सदस्य शकुंतला नडगिरे, भास्करगिरी बाबा, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ॲड. माधवी निगडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, तहसीलदार सचिन लंगुटे उपस्थित होते.
या वेळी गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, की मंदिर समिती वारकरी भाविकांना केंद्रबिंदू मानून आवश्यक सोई उपलब्ध करून देत आहे. या प्रणालीमुळे सुलभ व जलद दर्शन मिळणार आहे, या चाचणीमध्ये काही त्रूटी व नव्याने काही सुविधा निर्माण करण्याची गरज भासल्यास, त्याची पूर्तता करण्यात येईल. याशिवाय मूळ दर्शनरांगेतील
भाविकांना दर्शनासाठी विलंब होणार नाही, याची देखील दक्षता घेण्यात आली आहे. टोकन दर्शनासाठी सध्या ऑनलाइन पद्धतीने बुकिंग उपलब्ध आहे. परंतु, कालांतराने ऑफलाइन पद्धतीनेदेखील बुकिंग सुविधा उपलब्ध होणार आहे. तथापि, टोकन दर्शन प्रणालीसाठी आवश्यक सुविधा म्हणजेच दर्शनहॉल व स्कायवॉक लवकरच शासनाच्या माध्यमांतून निर्माण होणार आहे. त्याबाबत मंदिर समितीचा पाठपुरावा सुरू आहे, असेही ते म्हणाले.
दररोज १२०० भाविकांना लाभ
या प्रणालीसाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांनी मोफत संगणक प्रणाली विकसित करून दिली आहे. टोकन दर्शन प्रणालीच्या बुकिंगची सुविधा मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर आहे. त्यासाठी सकाळी १०.०० ते रात्री ८.०० च्या दरम्यान सहा स्लॉट निश्चित करून प्रती स्लॉटमध्ये २०० प्रमाणे दररोज १२०० भाविकांना याचा लाभ मिळणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.