
डॉ. नागेश टेकाळे
Ganesh Chaturthi 2023 : आज गणेश चतुर्थी. आजपासून अनंत चतुर्दशीपर्यंत राज्यात गणेश उत्सव मोठ्या भावभक्तीत सर्वत्र साजरा केला जातो. निसर्ग संवर्धन, वाहत्या नद्या, शेताच्या बांधावरील २१ पत्री, भूजल वाढवणारा दूर्वा आणि पर्यावरण ऱ्हासात हरवलेली सुगंधी फुले शोधण्याचे कार्य या उत्सवातून आपण या करूया.
सहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान हरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. ही स्व. कविवर्य मंगेश पाडगावकरांची १९७० च्या आसपासची काव्यरचना! आज ही काव्यरचना आठवताना या गाण्यामधील त्या सहा ऋतूंचा मी शोध घेत आहे. परंतु हे प्रयत्न निष्फळ ठरताहेत. कारण पी. सावळाराम हे यांच्या एका कवितेत म्हणतात 'हरवले ते गवसले का? गवसले ते हरवले का?' आज माझी अशीच अवस्था झाली आहे.
लहानपणी शालेय जीवनात या सर्व सहा ऋतूंचे सहा सोहळे पाहिलेला मी आज फक्त ऋतूंचे, नक्षत्रांचे नाव पुटपुटत आहे, सोहळे आणि नक्षत्रांचे देणे केव्हाच हरवले आहे. ‘रिमझिम पाऊस पडे सारखा’ या चार शब्दाभोवती पिंगा घालत आमचे सणवार आणि उत्सवाने समृद्ध असा श्रावण घरोघरी उंबरा ओलांडून येत असे, तेच मुळी भाद्रपद शुद्ध चतुर्थीची गणरायाच्या आगमनाची सूचना देतच. दहा-अकरा दिवसांच्या या उत्सवाची सुरुवात ग्रामीण भागात घरापुरतीच मर्यादित असे.
दोन दिवस आधी ओसरीवरील गणपतीचा कोनाडा सारवून स्वच्छ होत असे. गणपती तयार करण्यासाठी लागणारी शाडू गावाबाहेरच्या वाहत्या नदीकाठी ठरावीक ठिकाणीच मिळत असे. लहान सुबक मूर्ती, थोडेसे रंगकाम आणि बाकी सर्व निसर्ग सजावटीत ती कोनाड्यात छान शोभून दिसत असे.
सायंकाळी आम्ही ८-१० मित्र प्रत्येक घरी जाऊन तेथील गणपतीपुढे खड्या आवाजात आरती करीत, प्रार्थना म्हणत असू. त्यानंतर मिळणारा प्रसाद हे आमच्यासाठी मुख्य आकर्षण होते. आमच्या शालेय जीवनामध्ये या उत्सव काळात घरामधील गणेशासमोर सकाळ-संध्याकाळ अभ्यासास बसणे आम्हाला सक्तीचे होते. वडील म्हणत ही विद्येची देवता आहे. आज आम्ही या देवतेचा अर्थ आपणास जसा हवा त्याप्रमाणे बदलून घेतला आहे.
लहानपणी ग्रामीण भागामधील गणेश उत्सवाचे खरे आकर्षण होते ते संध्याकाळच्या मेळ्यामध्ये. विविध प्रकारची नृत्ये, भाव गीते, समूहगीतांनी समृद्ध असलेला हा कार्यक्रम संपू नये, असे वाटत असतानाही रात्री दहाला संपत असे. सर्व पारंपरिक वाद्येच असत. गणपतीच्या पूजेला लागणाऱ्या सर्व २१ पत्री आम्हाला आमच्या शेतातच मिळत असत.
गणपती विसर्जन नदीच्या वाहत्या पाण्यातच त्यास वाहिलेल्या पत्रीसह होत असे. वडील सांगत, गणेश पूजन म्हणजे ‘शाडू’चे (माती) पूजन, नदीपासून घेतलेली शाडू तिला आपण परत करावयास हवी. मूर्तीस वाहिलेल्या सर्व २१ पत्रीमध्ये औषधी गुणधर्म असतात. त्यांचे विसर्जन करताच ही औषधी गुणधर्म पाण्यात उतरतात.
त्याकाळी नदीचे स्वच्छ पाणी पिण्यासाठी वापरत. त्याकाळी या वाहत्या स्वच्छ पाण्याचे औषधी गुणधर्म त्यामुळेच आरोग्यदायी होते. प्रत्येक गावासाठी हा उत्सव आनंदाचा असे, त्याचे कुठेही अवडंबर नसे. काळ बदलला. खेडी शहरात रूपांतरित होऊ लागली. लाकूड मातीच्या घरांची जागा सिमेंटने घेतली.
वाहत्या नद्या थांबल्या आणि काठाची शाडू कुठे लुप्त झाली समजलेच नाही. शाडूची जागा प्लास्टर ऑफ पॅरीसने घेतली. मूर्तीचा आकार घरांच्या श्रीमंतीप्रमाणे मोठा होऊ लागला, सजावट वाढली त्यात थर्माकोल, प्लॅस्टिक आपोआप आले. एका आरतीची जागा पाच सहा आरत्यांनी घेतली, अर्थापेक्षा गोंगाट वाढू लागला. शेती रासायनिक झाल्यामुळे २१ पत्री तर सोडाच, साधा दूर्वा ही मिळणे कठीण झाले.
नकोच ते निसर्गावर अवलंबून राहणे म्हणून दूर्वा, जास्वंद सोन्याचांदीचे झाले आणि गरिबांच्या घरची ही देवता श्रीमंताची कधी झाली समजलेच नाही. गावागावांमधील कलाकारांना वाव देणारे सार्वजनिक मेळे बंद होणे ही या सुरेख सुंदर उत्सवाची प्रगती की पीछेहाट? याचे उत्तर शोधावे लागेल. आज अनेक लहान-मोठया गावात कुठेतरी ‘एक गाव एक गणपती’चा अपवाद वगळता प्रत्येक लहान मोठ्या गल्लीत सार्वजनिक गणेश उत्सव, त्यास जोडून मोठमोठ्या आरत्या, ध्वनिप्रदूषण सुरू झाले.
लोक प्रबोधन आणि जागृती हा खरेतर लोकमान्य टिळकांचा गणेश उत्सव सुरु करण्यामागचा मुख्य उद्देश होता. म्हणूनच विविध व्याख्यानमाला, पारंपरिक वाद्यांचे कार्यक्रम, कीर्तन, प्रवचने, मेळे वैयक्तिक कलागुणांना वाव देणे हे त्यांना अपेक्षित होते आणि त्यांच्या हयातीत व नंतरही स्वातंत्र्य प्राप्तीनंतर तब्बल तीन दशकापर्यंत या उत्साहाची अशीच वाटचाल होती.
आज चित्र पूर्णपणे बदललेले आहे. प्रत्येक ठिकाणी मूर्तीची उंची आणि सजावटीची स्पर्धा दिसून येते. वाद्यांच्या सुरेख संगीतमय स्वरांची जागा गडगडाटाने घेतली आहे. प्रकाश योजना सुसह्य होण्यापेक्षा असह्य होते. या प्रकाश झोतात उद्बोधक व्याख्यान माला, अभ्यासू प्रवचने, युवा पिढीला मार्गदर्शन, स्थानिक कला गुणांना वाव असे काहीच दिसत नाही, दिसते ते फक्त लांब रांगा, प्रचंड मोठा जनसमुदाय आणि शिस्तीसाठी शिट्ट्यांचे आवाज.
आजचा गणेश उत्सव खरच पर्यावरण स्नेही आहे काय? याचे उत्तर नकारार्थी आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस हे जल प्रदूषणाचा मुख्य घटक आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस वापरू नका, शाडू वापरा, असे आवाहन केले जाते. गणेश भक्तांकडून शाडूच्या मुर्त्यांचा वापरही वाढला आहे पण विसर्जन केल्यावर या शाडूचे पुढे काय होते, एवढ्या मोठ्या प्रचंड निर्माल्याचे आम्ही काय करतो, श्रद्धेने साजरा होणाऱ्या या उत्सवापासून आम्ही काय शिकलो, आमच्या लहान मुला-मुलीवर आम्ही काय संस्कार केले का, यांचे अवलोकन फार महत्त्वाचे आहे.
गणेश उत्सव एक फार मोठी संस्कार शाळा आहे, अनेक देखाव्यामधून आपण काहीतरी चांगला संदेश देत असतो पण त्यांचे त्यानंतर कुठे अनुकरण होते का? हे पाहायला हवे. मुळात आपल्याकडे हे पाहण्यासाठी तेवढी सक्षम यंत्रणा नाही. अनेक गणेश मंडळे सामाजिक हिताची विविध कामे करतात, आरोग्य शिबिरे घेतात, शाळांना मदत करतात. परंतु श्रींचे वाहत्या पाण्यातच विसर्जन करावे म्हणून कुणाला थांबलेल्या नदीला वाहते करण्याची इच्छा होत नाही.
शेतकरी आत्महत्येचे देखावे उभे केले जातात पण या आत्महत्या थांबवण्यासाठी शाश्वत उपाय योजना या माध्यमातून होत नाही याची खंत वाटते. परिस्थितीनुसार आपण बदलावयास हवे. गोव्यामधील गणेश उत्सव आजही निसर्गास जोडलेला आहे. श्रीगणेश उत्सवाबरोबरच इतर साजरे होणारे सण, वार, उत्सव हे जास्तीत जास्त पर्यावरण स्नेही कसे होतील, यासाठी प्रयत्न करावयास हवे.
बाली बेटावर मी श्री गणेशाचे पूजन निसर्गाच्या पंचतत्वामधून होताना पाहिजे. अर्थात हे सर्व आपल्याकडे शक्य नसेल तर जल, ध्वनी आणि प्रकाश प्रदूषणास मर्यादित ठेवून हा उत्सव आपण निश्चितच साजरा करू शकतो.
निसर्ग संवर्धन, वाहत्या नद्या, शेताच्या बांधावरील गणेशास प्रिय अशी २१ पत्री, भूजल वाढवणारा दूर्वा आणि पर्यावरण ऱ्हासात हरवलेली सुगंधी फुले शोधण्याचे कार्य या उत्सवातून होऊ शकते, फक्त यासाठी या उत्सवाचा अर्थ त्यामागील लोकमान्यांना अपेक्षित असलेले लोक प्रबोधन प्रथम आपण समजून घेणे आवश्यक आहे. स्व. लतादीदींचे सुमधुर आवाजात गायलेले भावगीत ‘हरवले ते गवसले का?’ हे फक्त ऐकण्यासाठी नसून त्यामागील अर्थ समजून घेण्यासाठी आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.