Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील ८६० गावे व २८३ वाड्यांना पाणीटंचाईची झळ सहन करावी लागत आहे. या गाववाड्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने १२६६ टँकरच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या असून १७७५ विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आले आहे.
मराठवाड्यात पाणीटंचाई भीषणतेकडे वाटचाल करीत आहे. पाणीसाठ्यांमध्ये केवळ १३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून अनेक प्रकल्प तळाला पोहोचले आहेत. भूजलसाठाही खोल खोल चालला असून दिवसेंदिवस टंचाईग्रस्त गाव व वाड्याची संख्या वाढत चालली आहे. सर्वाधिक पाणीटंचाईच्या झळा छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्याला बसत आहेत. त्यापाठोपाठ धाराशिव, लातूर, परभणी या जिल्ह्यातही पाणीटंचाई जाणवू लागली आहे.
पाऊस चांगला झालेला नांदेड जिल्ह्यातही पाणीटंचाईने डोके वर काढण्यास सुरवात केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३५४ गावे व ५८ वाड्यांना पाणीटंचाई भासत असून त्यासाठी खासगी ५४८ टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातील २४७ गावे व ६१ वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून ही पाणीटंचाई निवारण्यासाठी ३६१ खासगी व ११ शासकीय मिळवून ३७२ टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
परभणी जिल्ह्यातील एका गावात सुरू झालेल्या पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी एका खासगी टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातील दोन गावे व १० वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून त्यासाठी १२ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील १९३ गावे व १५२ वाड्यांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी दोन शासकीय व २३३ खासगी मिळून २३५ टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यातील ८ गावे व २ वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून त्यासाठी ५ शासकीय व ४ खासगी मिळून ९ टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यातील तब्बल ५५ गावांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून त्यासाठी ८९ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
टंचाई स्थिती अशी...
पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गावांना व पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरना पाणीपुरवठा करण्यासाठी १७७५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामध्ये ६२२ विहिरींचे टँकरसाठी तर ११५३ विहिरींचे टँकर व्यतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहण करण्यात आले आहे. अधिग्रहीत विहिरींची सर्वाधिक संख्या धाराशिव जिल्ह्यात ५६७ इतकी आहे. त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यातील ३६६, छत्रपती संभाजीनगरमध्ये २६८, बीडमध्ये २५४, लातूरमध्ये १८८, नांदेडमध्ये ५४, हिंगोलीत ४३, परभणीत ३५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.