Cactus Processing Industry : ऊर्जा, प्रक्रिया उद्योगासाठी काटे विरहित निवडुंग

Article by Dr. Vitthal Kauthale and Kunal Punde : पडीक जमीन, शेती बांध, वन शेतीमध्ये अत्यल्प लागवड खर्च आणि व्यवस्थापनामध्ये काटेविरहित निवडुंगाचे उत्पादन घेणे शक्य आहे. गुणधर्म आणि पौष्टिक मूल्यांचा विचार करता अन्न, चारा, इंधन, खते आणि बायो लेदर निर्मितीसाठी निवडुंग हे महत्त्वाचे पीक आहे.
Cactus
CactusAgrowon

डॉ. विठ्ठल कौठाळे, कुणाल पुंडे

Cactus Crop : काटेविरहित निवडुंग हे पीक मेक्सिको देशातील आहे. जगभरात या पिकाच्या दीड हजाराहून अधिक प्रजाती आहेत. यामधील अनेक जाती बहुपयोगी असून यांचा वापर चारा, औषधी, सौंदर्य प्रसाधने, ऊर्जा, बायो लेदर निर्मितीमध्ये होतो. फळांचा वापर प्रक्रिया पदार्थांच्या निर्मितीमध्ये केला जातो. काटे विरहित निवडुंगामधील Opuntia ficus-indica ही प्रजाती कॅक्टस पिअर नावाने ओळखली जाते. ही आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची प्रजाती आहे. कोरडवाहू प्रदेशात तग धरून राहण्याची क्षमता या वनस्पतीमध्ये आहे. मृद्‌ आणि जलसंधारण, पडीक जमीन तसेच कृषी वनीकरणासाठी निवडुंग हे फायदेशीर पीक आहे.

जगभरात प्रकर्षाने जाणवणारे हवामान बदल, वाढणारा दुष्काळ, जमिनीचा ऱ्हास आणि वाळवंटीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर निवडुंग हे पीक सामाजिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या फायदेशीर आहे. हे पीक दुष्काळ तसेच उच्च तापमान, धुके असणाऱ्या प्रदेशासाठी सहनशील असून ७०० मिमीपर्यंत वार्षिक पर्जन्यमान असलेल्या भागात चांगल्या प्रकारे वाढते. कमीत कमी पाण्याचा वापर करून वर्षभर चांगले बायोमास तयार करण्याची क्षमता आहे. ही वनस्पती वातावरण बदलासाठी एक उत्तम पीक प्रजाती म्हणून प्रचलित होत आहे.

निवडुंगाचे महत्त्व :

पाण्याचे प्रमाण जास्त (८५ ते ९० टक्के) असल्याने जनावरांना याची पाने चारा म्हणून खाऊ घातल्यास त्यांची पाण्याची गरज ३० टक्क्यांनी कमी होऊ शकते.

कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, सोडिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम यांसारखी खनिजे, प्रथिने ५ ते ७ टक्के, तसेच तंतुमय पदार्थ ११ ते १५ टक्क्यांपर्यंत आहेत.

कर्ब जतन करून ठेवण्याची चांगली क्षमता (३० टन कर्ब/हेक्टर/वर्ष).

शुष्क आणि कोरडवाहू प्रदेशात कृषी अर्थव्यवस्थेचा एक अविभाज्य भाग.

प्रक्रिया उद्योगातील संधी :

फळांचा मुरंबा, रस, कॅण्डी, फ्रोझन पल्प, अल्कोहोलिक पेये, लोणचे, सॉस, शाम्पू, साबण आणि लोशन निर्मितीमध्ये वापर.

वनस्पतीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. याचा उपयोग अँटासिड, आर्टिरियल स्क्लेरोसिस, अँटी कोलेस्टेरोलिक, प्रोस्टेटिस आणि हायपरग्लाइसेमियामध्ये केला जातो.

Cactus
Cactus Cultivation : निवडुंग लागवडीतून पशुखाद्य, बायोगॅस, ज्यूस निर्मितीची संधी

‘बाएफ’मधील निवडुंग संशोधन :

उरुळी कांचन येथील संस्थेच्या प्रक्षेत्रावर २०१५ मध्ये काटेविरहित निवडुंगावरील संशोधनास सुरुवात झाली. चाऱ्यासाठी निवडुंगाचा वापर करण्यासाठी रोपवाटिका तयार करून उत्पादन तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. यातील प्रयोगांमध्ये लागवडीसाठी पानांची उपलब्धता कमी असल्यास रोपवाटिकेच्या माध्यमातून रोपनिर्मिती, प्रत्यक्ष शेतात लागवड, आहारशास्त्रीयदृष्ट्या वेगवेगळ्या प्रजातीचे मूल्यांकन, शेळ्या आणि दुभत्या गायींना पाने खाऊ घालून त्यांच्या वाढीचे निरीक्षण करणे इत्यादी बाबींचा समावेश आहे.

काटे विरहित निवडुंगामध्ये संशोधन करणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक कृषी संस्थांकडून विविध प्रजाती गोळा करून त्यांची लागवड संस्थेच्या प्रक्षेत्रामध्ये करण्यात आली आहे. वैयक्तिक स्तरावर शोध घेऊन गोळा केलेल्या काही प्रजातींचाही यात समावेश आहे. आत्तापर्यंत सुमारे १०० हून अधिक

जातींची लागवड प्रक्षेत्रावर असून, त्याची समाधानकारक वाढ आहे. बाएफमधील संशोधनाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. पाच राज्यातील सुमारे आठशेहून अधिक शेतकऱ्यांकडे संस्थेच्या माध्यमातून काटेविरहित निवडुंगाची लागवड करण्यात आली आहे. निवडुंगाचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी विविध संस्था, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ आणि शेतकऱ्यांना दोन लाखांहून अधिक पानांचा पुरवठा करण्यात आला आहे.

Cactus
Animal Fodder : चाऱ्यासाठी काटेविरहित निवडुंग

चारा म्हणून वापर :

निवडुंगाची पक्व पाने कापून त्याचे कोयत्याच्या साह्याने ८ ते १० बारीक तुकडे करून सुक्या चाऱ्याबरोबर जनावरांना खाऊ घालता येतात. बाएफ संस्थेच्या प्रक्षेत्रावर शेळ्या आणि दुभत्या गाईंच्या आहारात निवडुंग पानांचा समावेश करून आहार चाचण्या घेण्यात आल्या.

या प्रयोगाच्या निष्कर्षानुसार एका शेळीस दिवसाला ३ ते ४ किलो आणि एका दुभत्या गाईस ७ ते ८ किलोपर्यंत निवडुंगाची पाने इतर चाऱ्यासोबत खाऊ घालता येतात. या चाऱ्यामुळे जनावरांच्या शरीरास कोणत्याही प्रकारची हानी होत नाही; उलट वजनवाढ आणि शरीर पोषणामध्ये वृद्धी होते.

निवडुंगामध्ये सुमारे ८५ टक्के पाण्याचे प्रमाण असल्याने उन्हाळी हंगामात चारा म्हणून वापर केला असता जनावरांना पिण्यासाठी लागणाऱ्या एकूण पाण्याची २५ ते ३० टक्के गरज भागते. हिरव्या चाऱ्याच्या टंचाई काळात निवडुंगाची पाने पशुखाद्यात वापरली असता ३० टक्क्यांपर्यंत हिरव्या चाऱ्याची गरज भागवू शकतो.

बहुपयोगी वनस्पती :

गुणधर्म आणि पौष्टिक मूल्यांचा विचार करता ही वनस्पती जागतिक स्तरावर ‘५- एफ’ या नावाने ओळखली जाते. ही वनस्पती अन्न, चारा, इंधन, खते आणि बायो लेदर निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण आहे.

अन्न : पौष्टिक मुल्यांमुळे पाने, फळांचा मोठ्या प्रमाणात मानवी आहारात समावेश शक्य. पानांपासून विविध पाककृती तसेच फळांपासून सरबत निर्मिती शक्य.

चारा : पानांमध्ये असणारे पाणी आणि खनिजांमुळे उन्हाळी हंगामात जनावरांसाठी चारा म्हणून उपयोग.

जैव इंधन : या वनस्पतीमध्ये मिथेन ५५ ते ५८ टक्के आणि कार्बन डायऑक्साइड ३० ते ३५ टक्के उपलब्ध असल्याने यापासून ०.३६ घन मीटर प्रति १ किलो शुष्क पदार्थ याप्रमाणे जैव इंधन निर्मिती शक्य.

जैविक खत : जैव इंधन निर्मिती प्रक्रियेदरम्यान तयार होणारे द्रवरूप अवशेष पिकांसाठी जैविक खत.

बायो लेदर : पानांवर ठरावीक प्रक्रिया करून बायो लेदर निर्मिती. याचा वापर बॅग, पर्स, चप्पल, पाकिटे तसेच गाडी कुशन निर्मितीमध्ये करणे शक्य.

संपर्क : डॉ. विठ्ठल कौठाळे, ९९६०५३६६३१

(बाएफ विकास अनुसंधान प्रतिष्ठान, उरुळीकांचन, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com