Mumbai News : ‘महाविकास आघाडीत जागा वाटपावरून कोणताही वाद राहिलेला नाही. ज्या मतदार संघात मित्रपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत ते दोन दिवसांत चर्चा करून मागे घेतले जातील. समाजवादी पक्षाशी सुद्धा चर्चा सुरू असून त्यावरही लवकरच निर्णय होईल. महाविकास आघाडीत कोणतीही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, अशी माहिती काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथल्ला यांनी बुधवारी (ता. ३०) पत्रकार परिषदेत दिली.
टिळक भवन येथे पत्रकार परिषद झाली. महायुतीत मात्र जागावाटपावरून प्रचंड गोंधळ आहे. एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या जागांवरही भाजपनेच उमेदवार दिले असून या दोन्ही पक्षांना संपविण्याची भाजपची ही सुरुवात आहे, अशी टीकाही या वेळी त्यांनी केली. ते म्हणाले, ‘महायुतीचे सरकार भ्रष्ट आहे, महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली असून, सरकारने दोन वर्षे महाराष्ट्राला लुटण्याचे काम केले आहे.
राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात गेले, जाता जाता युती सरकारने भरमसाट निर्णय जाहीर केले पण त्याची अंमलबजावणी होणे कठीण आहे. सरकारच्या तिजोरीत पैसे नसल्याने लाडकी बहीण योजना बंद पडली आहे. भ्रष्टाचारी महायुती सरकारला घालवण्याचा निर्धार जनतेने केला आहे. आता महायुतीचे भ्रष्ट सरकार जाऊन जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारे महाविकास आघाडीचे सरकार येईल.’
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, ‘महायुती सरकारने दोन वर्षांचे प्रगती पुस्तक जाहीर केले पण या सरकारने महाराष्ट्राची प्रगती केलेली नाही तर केवळ युती सरकारमधील धोकेबाजांची प्रगती झालेली आहे. आणि महाराष्ट्राची दुर्गती केली आहे. महायुती सरकारच्या काळात महिला अत्याचारात मोठी वाढ झाली आहे, दोन वर्षांत महिला अत्याचारांच्या ६७ हजार ३८१ प्रकरणांची नोंद झालेली आहे. या सरकारच्या काळात २० हजार शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.
देशातील सर्वांत जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत ही चिंतेची बाब आहे. एक रुपयात विमा ही योजना शेतकऱ्यांसाठी नसून विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी आहे. महायुती सरकारच्या काळात विमा कंपन्यांना ४ हजार कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. या वेळी भाजपच्या उपाध्यक्ष डॉ. अर्चना पाटील यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या वेळी खासदार वर्षा गायकवाड, नसीम खान, नाना गावंडे, वजाहत मिर्झा, ब्रीज दत्त उपस्थित होते.
सहा नोव्हेंबरला जाहीरनामा : पटोले
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे ६ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून सकाळी नागपूर येथे संविधान सन्मान संमेलन आयोजित केले आहे. संध्याकाळी मुंबईतील बीकेसीमध्ये महाविकास आघाडीची गॅरेंटी म्हणजे जाहीरनामा जाहीर केला जाणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती नाना पटोले यांनी या वेळी दिली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.