Chandrapur News : धान परस्पर राइस मिल मालकांना विकणे, खोटी तूट दाखविणे, बनावट बिलावर पैशांची उचल करणे, नागभीड तालुका खरेदी-विक्री सहकारी संस्थेच्या चांगलेच अंगलट आले आहे. या संस्थेच्या चौकशीचे आदेश राज्याच्या पणन मंत्र्यांनी दिले असून चौकशी सुरू झाली आहे.
जिल्हा मध्यवर्ती बॅंकचे संचालक गजानन पाथोडे यांनी धान खरेदी-विक्री गैरव्यवहाराची तक्रार जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संबंधित मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला.
त्यानंतर पणनमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. सन २०२०-२१ मध्ये नागभीड तालुका खरेदी-विक्री सहकारी संस्थेने कृषी उत्पन्न बाजार समिती नागभीड येथे एक गोदाम भाड्याने घेतले. शेतकऱ्यांकडून आधारभूत किमतीने खरेदी केलेला धान या गोदामात ठेवला. हा धान मार्केटिंग फेडरेशनला विकणे अपेक्षित होते.
मात्र परस्पर राइस मिलमालकांना धान विकण्यात आले. त्यासाठी खोटी तूट दाखविण्यात आली. नागभीड केंद्रावरील धान साठ्यातून बारीक धान छाटून अडत्यामार्फत धान व्यापाऱ्याला विकण्यात आले. खरेदी केंद्रावर धान न आणता काही व्यक्तींच्या नावाने बनावट बिल तयार करण्यात आले.
जवळपास चार ते पाच हजार क्विंटल धान थेट धान उराडे राइस मिल, खरबी यांना पाठविण्यात आले, असे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. याशिवाय सन २०२० ते २०२२ मध्ये नागभीड व पाहार्णी धान खरेदी केंद्रावर धान खरेदी झाल्यानंतर प्रत्येक कट्ट्यातून दोन ते तीन कटोरे धान काढण्यात आले.
या काढलेल्या धानाचे दहा हजार कट्टे तयार करण्यात आले. या सर्वांची खोटी बिले तयार करण्यात आली. जिल्हा मार्कटिंग अधिकाऱ्यांनी संस्थेला एका रुपयासुद्धा कमिशन दिले नाही.
भाड्याच्या गोदामाची नोंद नाही
सन २०२०-२१ मध्ये नागभीड तालुका खरेदी-विक्री सहकारी संस्थेच्या पाहार्णी येथील धान खरेदी केंद्रावर रोशन रामटेके यांचे गोदाम भाड्याने घेतले. त्यात चार ते पाच हजार क्विंटल धान ठेवण्यात आले. त्यात व्यापारी व शेतकरी वर्गांकडून प्रति क्विंटल शंभर रुपये कमिशन घेण्यात आले.
परंतु गोदाम भाड्याने घेतली याची संस्थेकडे नोंदच नाही. जवळपास पन्नास लाख रुपयांचे धान मार्केटिंग फेडरेशनला देण्याऐवजी देवी राइस मिल, सायगाटा, गुप्ता राईस मिल कानपा यांना तालुका खरेदी-विक्री संस्थेने विकला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.