Pune News : राज्यात शनिवारी (ता.१२) विजयादशमी दिनी चार दसरा मेळावे होत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचा पारंपरिक मेळावा शिवाजी पार्कवर, शिवसेना शिंदे गटाचा मुंबईतील आझाद मैदानावर होत आहे. तर मराठवाड्यातही राजकीय वातावरण तापवणारे दोन मेळावे होत आहेत. येथे भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे एकत्र येणार आहेत. तसेच नारायणगडावर देखील मनोज जरांगे यांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. यादरम्यान सरसंघचालक मोहन भागवत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरे यांचा दसरा मेळावा रविवारी (ता.१३) होणार आहे.
शिवसेनेचे दोन दसरा मेळावे
शिवसेनेत उभी फुट पडल्यापासून दोन दसरा मेळावे होत आहेत. यंदाही ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वेग-वेगळे मेळावे होत आहेत. ठाकरे गटाचा छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर एकाच वेळी दसरा मेळावा होणार आहे. दोन्ही मेळावे सायंकाळी ५ वाजता सुरू होणार आहेत.
मुंडे भाऊ-बहिणी आणि जरांगे यांचा दसरा मेळावा
याचदरम्यान बीडसह मराठवाड्याचे राजकारण ढवळून काढणारे दोन दसरा मेळावेही शनिवारी होत आहेत. मुंडे भाऊ-बहिणींचा भगवानगडावर दसरा मेळावा होणार ११ ते ११.३० दरम्यान होत आहे. तर मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच मराठ्यांचा दसरा मेळावा होत असून तो बीड जवळील नारायण गडावर १ वाजताच्या सुमारास होणार आहे. मुंडे भाऊ-बहिणीच्या मेळाव्यात ओबीसी आंदोलक नेते लक्ष्मण हाके देखील उपस्थित राहणार आहे.
तर नारायण गडावरील तब्बल ९०० एकरवर जरांगेंचा दसरा मेळावा होणार आहे. येथे २०० एकरावर पार्किंगची व्यवस्था असून १० वैद्यकीय कक्ष उभारण्यात आले आहेत. १०० पेक्षा जास्त रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. यावेळी या दसरा मेळाव्यात मुंडे भाऊ-बहिणींसह जरांगे आगामी विधानसभा निवडणुकीवर कोणती भूमिका घेतात? मराठा आरक्षणाबाबत सरकारवर कोणती टीका करतात? याकडे राज्यातील मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.