Indie Dog : पशुपालक, शेतकरी का करतात पश्मी श्वानांचे संगोपन?

पश्मी श्‍वान मजबूत स्नायूंचे असून सडपातळ असतात. त्यांची मान, पाय आणि पाठ लांब असते. डोके लांब, अरुंद असून, ते नाकाकडे निमुळते असते. हे शिकारी जातीचे श्‍वान आहे, त्यामुळे त्यांचे योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे.
Indie Dog
Indie DogAgrowon

डॉ. जी. आर. चन्ना, डॉ. के. एन. पवनकर, डॉ. व्ही. व्ही. कऱ्हाळ

पश्मी जातीचे श्‍वान (Pashmi dog) हे अतिशय हुशार, दिसायला देखणे असतात. शरीरयष्टीने मजबूत असून चपळ आणि वेगवान असतात. त्यामुळे शेती (Agriculture), जनावरे राखण्यासाठी या श्‍वानांचे संगोपन केले जाते.

या जातीचे श्‍वान मुख्यतः मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात आढळून येतात. या श्‍वानांचे जन्मस्थान जानवळ (जि. लातूर) हे ठिकाण मानले जाते.

इतिहास:

१) पश्मी श्‍वान दख्खनच्या पठारी भागात प्रचलित असलेली प्राचीन जात आहे.

२) ही जात जगप्रसिद्ध सालुकी जातीच्या श्‍वानाची वंशज आहे. या श्‍वानाला पर्शियन लोकांनी खैबर खिंडीतून भारतात आणले. हे श्‍वान भटक्या लोकांसोबत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करायचे. भारतीय वंशाच्या साळुकीला ‘पश्मी’ म्हणतात.

शारीरिक गुणधर्म :

१) उंच, सडपातळ शरीरासह, कमानदार पोट आणि केसाळ कानामुळे सुंदर दिसतात.

२) पश्मी म्हणजे केसाळ. कानावर आणि शेपटीवरील जास्त केस ही त्यांची वेगळी ओळख. यांचा आवाज इतर श्‍वानांपेक्षा मोठा असतो.

३) नराचे सरासरी वजन १६ ते २० किलो आणि उंची २२ ते २५ इंच असते. मादीचे सरासरी वजन १३ ते १७ किलो आणि उंची २१ ते २३ इंच असते.

Indie Dog
Animal Care : नवजात कालवडीचे संगोपन करताना या गोष्टी लक्षात ठेवा

४) श्‍वान मजबूत स्नायूंचे असून सडपातळ असतात. मान, पाय आणि पाठ लांब असतात. डोके लांब आणि अरुंद असून, ते नाकाकडे निमुळते असते.

५) डोळे अंडाकृती आकाराचे असून, त्यांच्यावर तपकिरी आणि तांबूस रंगांच्या छटा असतात. कान मध्यम व्ही आकाराचे असून ते मागे दुमडत नाहीत, परंतु त्यांच्या डोक्याच्या बाजूला खाली लटकलेले असतात.

६) छाती कोपरापर्यंत पोहोचते, ज्यामुळे फुफ्फुस आणि हृदयासाठी चांगली जागा मिळते.

७) शेपटी चाबकासारखी असून, शेवटी नैसर्गिक वळण असते.

८) श्‍वान पांढऱ्या, करड्या, काळ्या व भुरकट रंगाचे असतात.

स्वभाव:

१) अतिशय हुशार, संवेदनशील, मालकाशी एकनिष्ठ, साहसी तसेच ही एक उत्कृष्ट शिकारी जात.

२) अनोळखी माणसांनी केलेला स्पर्श फारसा आवडत नाही, फक्त त्यांच्या मालकांनी स्पर्श करणे आणि हाताळणे आवडते. त्यामुळे त्यांना एकहाती श्‍वान जात म्हणून ओळखले जाते.

३) श्‍वानांना एकटे राहायला आवडते.

४) श्‍वान पाळण्यासाठी मालकाने लहानपणापासून त्यांचे सामाजिकीकरण सुरू करावे. त्यांना हाताळताना मालकांचा स्वभाव शांत व सौम्य असावा.

Indie Dog
Dog Bite : पिसाळलेले कुत्रे चावल्याने बारा गाईंचा मृत्यू

आरोग्य आणि आहार :

१) श्‍वान आपल्याकडील वातावरणात चांगल्या प्रकारे तग धरतात. अत्यंत तुटपुंज्या परिस्थितीत कमी गरजेत ते राहतात. त्यांना कोणत्याही आनुवंशिक आरोग्य समस्या नाहीत.

२) आयुष्य १० ते १५ वर्षे असते. चांगले आरोग्य राहण्यासाठी त्यांना दररोज व्यायाम आवश्यक आहे.

३) नियमित कालावधीत एक वेळेस अंघोळ घालणे, नियमितपणे नखे कापणे आणि वेळेवर लसीकरण आवश्यक आहे. जास्त काळजी घेण्याची आवश्यकता नसते.

४) खाण्यावर जास्त खर्च करावा लागत नाही. विशेष खाद्याची गरज नाही.

बुद्धिमत्ता आणि प्रशिक्षण

१) हुशार श्‍वान जात आहे. परंतु हे श्‍वान थोडे हट्टी आहेत. जर तुम्हाला एक उत्तम कौटुंबिक श्‍वान म्हणून सांभाळ करायचा असेल, तर त्यांचे लहान वयामध्ये सामाजिकीकरण करावे.

२) हे शिकारी जातीचे श्‍वान आहे, त्यामुळे त्यांना धावणे आवडते. श्‍वानास मुक्तपणे धावण्यासाठी मोकळे आवार किंवा घरासमोर अंगण असावे. हे श्‍वान अपार्टमेंट किंवा बंदिस्त जागेमध्ये पाळण्यासाठी चांगला पर्याय नाही.

संपर्क : डॉ. जी. आर. चन्ना, ७७१०८३३३०९, डॉ. व्ही. व्ही. कऱ्हाळे, ८८०६३०२३११, (पशू उत्पादन आणि पशू व्यवस्थापन विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com