Farmers Story : शेतीच्या शोषणावरच दुनियेची चंगळ चाललीय!

Agriculture News : अहमदपुर तालुक्यात एकूण सहा मंडळ आहेत.कालच्या पावसाची आज सकाळपर्यंतची आकडेवारी बघितली तर पावसाचं प्रमाण किती व्यस्त आहे ते लक्षात येईल अहमदपुर ०४, शिरुर ता.१७, हाडोळती ०९, किनगाव ०५, खंडाळी ०१ आणि अंदोरी ०५ .हा सर्कलवाईज पाऊस मी नोंदवत असलो तरी,गावाच्या पश्चिमेला जेवढा पाऊस आहे,तेवढा पूर्वेला नाही. दर चार-पाच कि.मी.वर हा पाऊस कमी- जास्त आहे.
Farmer
FarmerAgrowon

Farmer News Maharashtra : अहमदपुर तालुक्यात एकूण सहा मंडळ आहेत.कालच्या पावसाची आज सकाळपर्यंतची आकडेवारी बघितली तर पावसाचं प्रमाण किती व्यस्त आहे ते लक्षात येईल अहमदपुर  ०४,  शिरुर ता.१७, हाडोळती ०९, किनगाव  ०५, खंडाळी ०१ आणि अंदोरी ०५ .हा सर्कलवाईज पाऊस मी नोंदवत असलो तरी,गावाच्या पश्चिमेला जेवढा पाऊस आहे,तेवढा पूर्वेला नाही. दर चार-पाच कि.मी.वर हा पाऊस कमी- जास्त आहे. त्यामुळे सर्कलची आकडेवारी ही प्रत्येक गावची आकडेवारी असत नाही. तालुक्याची  पावसाची सरासरी बघून तर काहीच अंदाज बांधता येत नाही. जोपर्यंत प्रत्येक गावात पर्जन्यमापक बसवून ती आकडेवारी संकलीत केली जात नाही, तोपर्यंत पावसाचं वास्तव लक्षात येणं कठिण आहे.गेल्या ४० वर्षांत किमान शंभरवेळा मी हा मुद्दा मांडला असेल.पण भिकरचोट मनोवृत्तीच्या राजकीय नेत्यांना व प्रशासकीय अधिकाऱ्यांना यात रस नाही. शेतीच्या शोषणावरच यांची चंगळ चाललीय!

अहमदपूर तालुक्यातील आजपर्यंतच्या सरासरी पावसामध्येही शिरूर ताजबंद सर्कल आघाडीवर आहे.तसं ते नेहमी एक- दोनवरच असते.कालच्या पावसाने माहोल अधिक प्रसन्नदायी झालाय.अनेक दिवसांनंतर भल्या सकाळी बेडकांनी डरावं डरावंचा गजर सूरू केला होता.पिकही उत्साहाने नाचताहेत....हा पाऊस जादू करतो सगळ्या निसर्गावर.

Farmer
International Dog Day 2023 : लाखो फॉलोवर्स आणि करोड संपत्तीचे मालक आहेत ही कुत्री!!!

पावसाबाबतचे भारतीय हवामान विभागाचे बहुतांश अंदाज खरे ठरतात,हा माझा अनुभव आहे.त्यासोबतच गुगलवरचे अंदाजही मी वेळोवेळी बघतो.त्याचवेळी रडारवर जाऊन ढगांची स्थिती बघितली तर,आपल्या अनुमानाला बळकटी येते.तरीही पाऊस अनेकदा चकवा देतो.हवामानाची सगळी संकेतस्थळ शंभर टक्के पाऊस दाखवत असतानाही, पावसाचा थेंब पडत नाही... आणि पावसाचा अजिबात अंदाज नसतानाही पाऊस पडून जातो. मात्र असं क्वचित घडतं.

काल सायंकाळी पावसाचा ५० टक्के अंदाज होता.या अंदाजात पाऊस फवारा मारतो किंवा काही थेंब पडून जातात.मात्र  काल दणकून पाऊस पडला.पंधरा- वीस मिनीटात १७ मि.मी. म्हणजे एकदम चांगला. हाच पाऊस दहा कि.मी.वरील अहमदपूरला ४ तर तेवढ्याच अंतरावरील हडोळतीला ९ मि.मी.पडलाय.म्हणजेच पाऊस व्यापक नाही.मर्यादित भागावर पडतोय.हे लक्षात घेतलं तर,पावसाबाबतचा अंदाज पूर्णपणे खोटा किंवा खरा क्वचितच ठरतो.

माझं गेल्या पाच- सहा वर्षांतील निरीक्षण असं आहे की, गावातल्यापेक्षा रुद्रा हटवर (गावाच्या पश्चिमेला)थोडासा जास्त पाऊस पडतो. एक मित्र म्हणाला,डोंगरामुळे तो जास्त पडतोय.पण हे म्हणणं मला योग्य वाटत नाही. कारण ढग अडतील असा कोणता डोंगर या बाजूला नाही.दुसरी शक्यता झाडांची आहे. एकट्या आमच्या २४एकर क्षेत्रात १५००झाडं आहेत.पण शास्त्रियदृष्ट्या हे म्हणणंही अचूक नाही. झाडं अधिक असलेल्या भागात जास्त पाऊस पडतो,हे खरं आहे. पण  आपण हेही  पाहातो की,समुद्रावरही मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.तिथं तर झाडं नाहीतच!

आज सकाळी एका मित्राशी ,रुद्रा हटवर थोडा जास्त पाऊस पडण्याच्या या मुद्यावर बराच खल घातला. माझा युक्तिवाद ऐकून तो बोलला,डोंगर,झाडं ही दोन्ही कारणं नाहीत , असं म्हणतोस तर,मग कोणतं कारण आहे ते सांग.मी म्हटलं, याचं खरं कारण पाऊस माझा दोस्त आहे हे आहे. तो लहरी आहे,माझंही सगळंच ऐकतो असं नाही पण कधी कधी परिस्थिती गळ्यापर्यंत आली की ऐकतो! मित्र म्हणू लागला,ही तर तुझी बुवाबाजी झाली. पाऊस कुठं माणसाचा मित्र होऊ शकतो का? काही पण सांगू लागलास तू! मी म्हटलं, मी पावसाला मित्र मानतो.त्याच्याशी शेतीतील सुख-दु:खांबाबत बोलतो.तो ते ऐकतो. रात्रीच तो माझ्या स्वप्नात आला होता...माणसासारखाच दिसत होता...पण केवळ पाणी.जवळ गेलो तर नखशिखांत भिजून गेलो.पाणी एवढं गार होतं की मी ओरडत पळालो..आणि चिखलात पडलो...तो लगेच जवळ आला आणि त्यानं  धूऊन काढलं मला..मित्र मला थांबवत बोलला,तुझ्या डोक्यावर परिणाम तर झाला नाही ना?मी म्हटलं,मी तुला पडलेलं स्वप्न सांगतोय तर तुला तसं वाटतयं...तुला पण कसली कसली स्वप्नं पडतच असतील ना? तो बोलला, हो..स्वप्नं कसलीही पडतात पण पाऊस मित्र असल्याचं स्वप्न विचित्र वाटतं.मी म्हटलं, पावसाला मी स्वप्नात नाही तर वास्तवात मित्र मानतो.त्याच्याशी जागेपणी बोलतो...स्वप्न ही एक वेगळी गोष्ट आहे. मित्र बोलला,तु काय म्हणतोयस ते मला कळंना....सकाळी सकाळी डोक्याला ताप नको...तूझं हे असं ऐकून माझ्या डोक्यावर परिणाम व्हायचा....मी म्हटलं, घाबरू नकोस.मला होणारे भ्रम(साक्षात्कार) तुला  होणार नाहीत...ये कुठंतरी निवांत बसून चर्चा करूत...तो घाबरून म्हणाला,सध्या नको..बघू पुन्हा कधीतरी. मी हसत हसत फोन ठेवला तेव्हा डोडो कान उभे करून विचित्र नजरेने बघत होता.मी मनोमन म्हटलं,यानंही ऐकलं की काय,माझं बोलणं! एकंदरीत रुद्रा बाबा बनावं लागेल असं दिसतयं!

आजचा म्हशी राखण्याचा वेळ मित्रांशी फोनवर बोलण्यात मजेत गेला.तरीही वेड्यासारखा दिसतोय का,याची खात्री करण्यासाठी एक सेल्फी काढली.बगिरा आणि डोडो शेजारच्या कुत्रीला घेरून  घोळसत होते.ती कुत्री केविलवाणी ओरडत होती.मी कितीही हाका मारल्या तरी ऐकेनात.शेवटी मलाच पळत जाऊन तिची सुटका करावी लागली.दोघांनाही तीन- चार बुक्के लगावले.सध्या या दोघांनी परिसरात बरचं टेरर निर्माण केलयं.एकाने आवाज दिला की,दुसरा पळत येतोच.सुदैवाने दोघेही चावत नाहीत. भुंकत अंगावर जातात.

म्हशींना बांधून हटवर येऊन आंघोळ केली.लिंब आणि करंजचा पाला टाकून उकळलेल्या पाण्यानं आंघोळ करण्याचा फील वेगळाच येतो .अधूनमधून ही चैन सुरू असते. बीटचा पराठा ,दही खाल्लं.तेव्हापासून हटमधील माझ्या आवडत्या खिडकीजवळच्या जागेवर वाचत बसलोय.खिडकीतून रस्त्यावरचं काहीच दिसत नाही. समोर दिसतात ती चिंचेची,सीताफळाची, चाफ्याची झाडं.विविध रंगाच्या चिमण्या, त्यांचा चिवचिवाट. विटांच्या भिंतीपेक्षा झाडांची ही भिंत सुखद आहे.काही वेळापूर्वी पश्चिमेला भरपूर आभाळ आलं होतं.चार थेंबही येऊन गेले.बदल म्हणून दुधाची स्ट्राँग कॉफी बनवून पिली.पुन्हा बसलो हे टायपत...आज इथून उठायची इच्छाच होत नाही...

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com