Lok Sabha Election 2024 : बारामतीकरांचा कौल मतपेटीत बंद

Baramati Lok Sabha Election : सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४५.६८ टक्के मतदान
Baramati Lok Sabha Election
Baramati Lok Sabha Election Agrowon
Published on
Updated on

अॅग्रोवन वृत्तसेवा
Baramati News : पुणे : राज्यासह संपूर्ण देशभराचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी (ता. ७) मतदान झाले. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सध्या उन्हाचा तडाखा बसत असला तरी सकाळपासूनच मतदार हे मतदानासाठी बाहेर पडल्याचे दिसून आले. सुरुवातीला मतदानाची टक्केवारी कमी असली तरी नऊ वाजेनंतर मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४५.६८ टक्के मतदान झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, खडकवासला आणि दौंड अशा सहा विधानसभा मतदारसंघ आणि २,५६१ मतदान केंद्रांचा समावेश होता. या मतदारसंघात २३ लाख ७२ हजार नोंदणीकृत मतदार आहेत. यंदा मतदार संघात एकूण ३८ उमेदवार उभे होते. मंगळवारी सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सकाळी सात वाजून ४० मिनिटांनी बारामती येथील मतदान केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावला. तसेच आमदार रोहित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मतदान केले.
सुरुवातीच्या दोन तासांत ५.७७ टक्के मतदान झाले होते.

Baramati Lok Sabha Election
Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

त्यानंतर नागरिकांनी बाहेर पडून अनेकांनी मतदान केले. त्यामुळे सकाळी ११ वाजेपर्यंत या मतदारसंघात १४.६४ टक्के मतदान झाले. सर्वाधिक १८.६३ टक्के मतदान बारामती विधानसभा मतदारसंघात झाले आहे. त्या खालोखाल इंदापूर विधानसभा मतदारसंघात १४.६८ टक्के मतदान झाले आहे. पुरंदर विधानसभा मतदारसंघात १४.८ टक्के, खडकवासला विधानसभा मतदारसंघात १४ टक्के, भोर १३.८ टक्के, तर दौंडमध्ये १२ टक्के मतदान झाले.
मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत जवळपास २७.५५ टक्के एवढे मतदान झाले. यात भोरमध्ये सर्वाधिक ३३.४१ टक्के झाले होते. त्यानंतर बारामतीमध्ये ३२.११, दौंडमध्ये २६, इंदापूर २५.११, खडकवासला २५.१ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी पुन्हा अनेक मतदार केंद्रावर बऱ्यापैकी गर्दी झाली होती. जिल्ह्यात एकूण दोन हजार ६२५ कॅमेऱ्याद्वारे वेबकास्टिंग झाले असून, जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, तर पुण्यातील विधान भवन येथील बारामती निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी या मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून होत्या.

सुप्रिया सुळे-अजित पवार भेटीची चर्चा
बारामती लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्या भेटीसाठी काटेवाडी येथे दाखल झाल्या असल्याची चर्चा वेगाने पसरली. या भेटीबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्यापुढे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे आव्हान आहे. नणंद- भावजय अशी ही लढत आहे. निवडणूक प्रचारावेळी सुळे आणि पवार यांनी एकमेकांवर जोरदार प्रहार केला होता. बारामतीची लढत कौटुंबिक नाही, तर ती वैचारिक आहे असा दावाही करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची काटेवाडीमधील भेटीची चर्चा सुरू होती.


कांद्याची माळ घालून केले मतदान
बारामती मतदार संघातील दौंड तालुक्यातील भारतीय जवान किसान पार्टीचे उमेदवार शिवाजी नांदखिले यांनी सपत्नीसह कांद्याची माळ घालत जुनी गार येथे सकाळी साडे सात वाजता मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. या वेळी शिवाजी नांदखिले म्हणाले, की १९९१ साली शेतीमालाचे खुलीकरण झाले आहे. परंतु आजपर्यंत या खुलीकरणाची हवा लागून दिलेली नाही. त्यामुळे आत्महत्या कर्जापायी होत आहे. त्यामुळे मतदारांनी शेतीमालाचे खुलीकरण होण्यासाठी मतदान केले पाहिजे. हे लक्ष वेधण्यासाठी मी व पत्नीने कांद्याची माळ घालून मतदान केले आहे. त्यानंतर दिवसभरात १५० बुथला भेट दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com