Sugarcane Research : साखर उद्योग ऊस संशोधन विसरला

Sugar Industry : श्रीमंत झालेल्या साखर उद्योगाचा मुख्य कच्चा माल ऊस आहे. उसाच्या १७ जाती कष्टपूर्वक संशोधनातून कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनीच दिल्या आहेत.
Sugarcane Research
Sugarcane ResearchAgrowon
Published on
Updated on

Pune News : ‘‘श्रीमंत झालेल्या साखर उद्योगाचा मुख्य कच्चा माल ऊस आहे. उसाच्या १७ जाती कष्टपूर्वक संशोधनातून कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनीच दिल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आली. मात्र, आता साखर कारखान्यांना विद्यापीठाच्या योगदानाचा विसर पडला आहे,’’ अशी खंत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी व्यक्त केली.

पुणे कृषी महाविद्यालयात गुरुवारपासून (ता.८) आयोजित केलेल्या दोन दिवसीय ‘साखर व संलग्न उद्योग परिषद -२०२४’ चे उद्घाटन करताना डॉ. पाटील बोलत होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मिटकॉन, साखर आयुक्तालय व महाराष्ट्र पर्यावरण संघटनेच्या वतीने ही परिषद आयोजित केली आहे.

साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, ‘मिटकॉन’चे कार्यकारी संचालक आनंद चलवादे, ‘विस्मा’चे कार्यकारी संचालक अजित चौगुले, विद्यापीठाचे संशोधन संचालक विठ्ठल शिर्के, सद्गुरू श्री श्री साखर कारखान्याचे अध्यक्ष एन. शेषगिरीराव नारा, जकराया शुगर्सचे अध्यक्ष अॅड. बी. बी.जाधव, शास्त्रज्ञ डॉ. एस. व्ही. पाटील आदी उपस्थित होते.

Sugarcane Research
Sugarcane Research Center : कोईमतूरच्या धर्तीवर कोल्हापूर जिल्ह्यातही ऊस संशोधन केंद्र

कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, ‘‘उसाचे उत्पादन, साखर उतारा कमी आहे. मजूर व निविष्ठा खर्च वाढला आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सतत वाढत आहेत. तसेच, साखर उद्योगावरील आव्हानेदेखील वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर या परिषदेतील मंथन उपयुक्त ठरेल. मात्र, राज्यात साखर परिषदा घेताना कारखान्यांना कृषी विद्यापीठांचा विसर पडतो. कच्चा माल असलेल्या ऊस संशोधनाच्या उगमाला कारखाने विसरले आहेत.

विद्यापीठाच्या पाडेगाव संशोधन केंद्राने १९३२ पासून साखर उद्योगाला उसाच्या जाती दिल्या. त्यातून समृध्द झालेल्या शेतकऱ्यांनी बांधलेल्या नव्या घरांना उसाच्या जातींची नावे दिली. साखर कारखाने हे श्रीमंत असले तरी त्यांनी विद्यापीठाच्या संशोधन कार्याला विसरू नये. संशोधनातून एक वाण न मिळाल्यास कारखाने व शेतकऱ्यांचीही हानी होते हे विसरता येणार नाही.’’

पाडेगावच्या ऊस संशोधन कार्याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल कुलगुरूंनी खंत व्यक्त केली. ‘‘देशातील ५८ टक्के ऊस क्षेत्र केवळ पाडेगावच्या जातींमुळे विस्तारले. कारखान्यांची धुराडी या ऊस जातींवर चालतात. देशाचा साखर उद्योग आता २५ लाख कोटी रुपयांचा झाला आहे.

मात्र, उसाचा सर्वाधिक उत्कृष्ट वाणसंग्रह (जर्मप्लाझ्म) असलेल्या पाडेगावची दुरवस्था झाली आहे. तेथे शेतकरी निवास नाही, संशोधनाला प्रयोगशाळा नाही. रस्ते नाहीत. कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या साखर कारखान्यांना माझी विनंती आहे की त्यांनी साखरेच्या प्रत्येक पोत्यामागे थोडी मदत या संशोधन केंद्राला करावी. साखर उद्योगाला चांगल्या जाती देण्यासाठी विद्यापीठ सदैव तत्पर राहील,’’ अशी ग्वाही कुलगुरूंनी दिली.

Sugarcane Research
Sugarcane Research : ऊस संशोधनासाठी ‘वनामकृवि’,‘व्हीएसआय’ यांच्यात करार

डॉ. खेमनार म्हणाले, ‘‘राज्याच्या ग्रामीण विकासात साखर उद्योगाची भूमिका मोलाची आहे. मात्र, आता साखर कारखान्यांनी मोठ्या प्रमाणात उपपदार्थ निर्मितीकडे वळावे. शून्य प्रदूषण साध्य करावे. मातीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा. ऊर्जा क्षेत्राकडे वळावे. साखर आयुक्तालयदेखील साखर उद्योगासाठी नव्या वाटा तयार करण्यासाठी अभ्यास करत आहे.’’

साखर आयुक्त पुढाकार घेणार

पाडेगाव ऊस संशोधन केंद्राची दुरवस्था झाल्याचे लक्षात येताच साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी पाडेगावला भेट देण्याचा निर्णय घेतला. ९३ वर्षांची परंपरा असलेल्या या केंद्राला शताब्दी वर्षापूर्वी सुविधा देण्यासाठी साखर आयुक्त पुढाकार घेणार आहेत, असे परिषदेत सांगण्यात आले.

‘पांढरा हत्ती म्हणणारे अल्पबुध्दीचे’

कृषी विद्यापीठांवर होणाऱ्या टीकेबद्दल कुलगुरू डॉ. पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘कृषी शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळेच देशाला नव्या जाती व तंत्रज्ञान मिळाले. फळे, भाजीपाला तसेच अन्नधान्य उत्पादन वाढले. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली. हे योगदान कधीही विसरता येणार नाही. तरीही काही जण विद्यापीठाला पांढरा हत्ती म्हणतात; मला त्यांच्या अल्पबुध्दीची किव येते.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com