Indian Festival : नवरात्री आणि त्यानंतरच्या १० व्या दिवशी येणारा दसरा हा सण विजयादशमी म्हणून ओळखला जातो. निसर्ग, जंगल आणि कृषी या तीनही घटकांना जोडलेला हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला आनंद उत्सव! आता मात्र या तिनही घटकांअभावी विस्कळीत झाला आहे. परतीच्या पावसास आनंदाने निरोप देताना मनसोक्त फुललेला निसर्ग, जंगलामधील आपटा आणि शमी हे दोन छोटे वृक्ष आणि शेतामध्ये सर्वत्र फुललेली खुरासणी (कारळे) हे निसर्गाचे तीन घटक नवरात्रापासूनच दसऱ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र हे चित्र आता हरवले आहे. दसरा येतो पण स्वागताला ना शमी आपटा असतो ना शेतात फुललेली खुरासणी!
साधारण २००० ची गोष्ट. मी मध्य प्रदेशात झाबुवा जिल्ह्यामधील आदिवासींचा अभ्यास करण्यास गेलो होतो. असाच नवरात्रीचा काळ, सर्वत्र खुरासणी म्हणजे कारळे फुललेले, बाजूलाच काढणीस आलेला भात, नागली आणि त्यांना बांधावरून हटकेच निरोप देत असलेली उंच तूर. पिवळ्या धम्म कारळ्याच्या फुलांमधून बाहेर येण्यास माझे मन तयार नव्हते. शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या एका आदिवासी आजींना मी बोलते केले आणि तिने मला खुरासणी म्हणजेच कारळ्याची एक लोककथाच सांगितली.
फार पूर्वी घनदाट जंगलात काटेरी शमी, त्याचा लहान भाऊ आपटा आणि कायम पिवळा झगा घालून जंगलात कुठेही भटकत असणारी खुरासणी आनंदात राहत होते. शमी आणि आपट्यास खुरासणीचे असे कुठेही भटकणे आवडत नव्हते म्हणून ते दोघे तिला रागावले. खुरासणी जंगलातून बाहेर पडली आणि थेट एका आदिवासी शेतकऱ्याच्या शेतात जाऊन विसावली. पाहता पाहता ते रान पिवळ्या फुलांनी भरून गेले. तो नवरात्रीचा काळ होता. आपटा आणि शमी, खुरासणी कुठे गेली या विचाराने बेचैन झाले आणि साधूचा वेष घेऊन तिच्या शोधात जंगलाबाहेर आले. नर्मदा नदीच्या काठावर एक ऋषी त्यांना भेटले आणि भावांनी त्यांना खुरासणीबद्दल विचारले.
ऋषींनी त्यांना दूरवर दिसणारे पिवळे धम्मक रान दाखविले आणि सांगितले, ‘‘जा, पाहा तेथे तुमची खुरासणी आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतात आनंदाने नांदत आहे.’’ हे दोघे त्या शेतात गेले. पिवळ्या धम्मक झबल्यामधील आपल्या लाडक्या बहिणीला पाहून शमी आणि आपटा आनंदले, त्यांनी तिला जंगलात येण्याची विनंती केली, पण आदिवासी शेतकऱ्यांशी लागलेला लळा ती सोडावयास तयार नव्हती. भाऊ सुद्धा तिला घेतल्याशिवाय परत जाण्यास तयार नव्हते. शेवटी त्या दोघांनी बहिणीच्या प्रेमापोटी खुरासणीच्या बांधावरच राहण्याचा निर्णय घेतला. किती सुंदर लोककथा होती ती!
त्या आजी मला सांगत होत्या, नवरात्रीतील नऊ दिवस आम्ही खुरासणीची ओंजळभर फुले, शमी आणि आपट्याच्या खोडाजवळ सकाळीच ठेवतो. ही बहीण-भावांची भेट असते. आमच्याकडे कुणीही शमी आणि आपट्याचे पान सुद्धा तोडत नाहीत. कारण लगेच खुरासणीच्या डोळ्यात पाणी येते. तेथील अनेक आदिवासींच्या शेतात मी फुललेली खुरासणी आणि बांधावर उभे असलेले शमी आणि आपटा हे दोन वृक्ष पाहिले. आजही मला आठवते, आमच्या लहानपणी सकाळी पिवळीची भाकरी कारळे-जवसाची चटणी सोबत कांदा ही आमची कडक थंडीमधील सकाळची न्याहारी असे. दुपारी अनेक वेळा कारळ्याची आमटी आणि ज्वारीची भाकरी आमच्यासाठी पंचपक्वान असे. आज यातील काहीही शिल्लक नाही. विजयादशमी मात्र पूर्वीपेक्षा अधिकच भव्य दिव्य झाली आहे. शेतामधील खुरासणीचे पिवळे सोने हरवले आहे. त्याबरोबर शमी आणि आपटा सुद्धा गेले ते कायमचेच! कारण त्यांना परत जाण्यासाठी आम्ही जंगल सुद्धा शिल्लक ठेवलेले नाही.
मागील २५ वर्षांपासून मी ठाणे, पालघरच्या आदिवासी भागांत कृषी, अन्न आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. आदिवासी बांधवाच्या शेतात फारसा बदल झाला नाही, भात, नागली कायम आहे. मात्र पूर्वी प्रत्येक आदिवासीच्या शेतात काही गुंठे तरी फुलणारी खुरासणी आता तुरळक कुठेतरी दिसते. खुरासणीचे बी लोह, जीवनसत्त्व के, तेल आणि तंतुमय पदार्थाने पुरेपूर असते. संशोधन सांगते की जेवणाच्या ताटात एक चमचा कारळ्याची चटणी, त्यातील तेल आणि जीवनसत्त्व ‘के’ हृदयविकारास तुमच्या जवळ सुद्धा येऊ देत नाही. कारळे आणि मधुमेह यांचा तर छत्तीसचा आकडा आहे. लहानपणी आमची आजी कारळाच्या चटणीत दोन लसणाच्या पाकळ्या कुटून आम्हाला खोकला कायमचा घालविण्यास देत असे. खुरासणीमधील लोह स्त्रियांच्या लोह कमतरतेवर प्रभावी उपाय आहे. पूर्वी नागलीच्या कोरड्या भाकरीवर पसरलेली खुरासणीची चटणी कुपोषण रूपी राक्षसास बालकाजवळ येऊ सुद्धा देत नसे. आज नागली आहे मात्र खुरासणी नाही.
कारळे हे जरी आदिवासी बांधवांचे खरिपाचे पीक असले तरी मराठवाडा, विदर्भात पूर्वी अनेक शेतकरी ते नियमित घेत असत. नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवीसमोर कारळाच्या फुलांचे माळेनिमित्त महत्त्व असे. नवरात्रीचा घरोघर जागर करणारे अनेक माहीतगार लोक कारळाच्या फुले मिळविण्यासाठी धडपडत असतात. शेवटी ही कारळाची फुले मिळाली नाही तर विड्याची पाने, झेंडूची फुले वापरतात. नवरात्री, दसऱ्याच्या सुमारास देवीला प्रिय असणारी कारळाची फुले एखाद्या फुल उत्पादक शेतकऱ्याने नव-उद्यमीच्या (Start-up) प्रयोगातून बाजारात आणली तर तो का मालामाल होणार नाही? पूर्वी कारळ्याच्या शेताला लागून अनेक मधमाश्यांची लहान छोटी मोहळे असत. रब्बीला कारळ्यांच्या रानावर सूर्यफुलाचे उत्पादन घेतले असता कधीही नुकसान होत नाही आणि येथे मधमाश्या या दोनही पिकांची सेवा करण्यास उपलब्ध असतात. वातावरण बदल आणि दुष्काळाशी दोन हात करणारे, कमी पावसातही डोंगराळ भागात छान उत्पादन देणारे कारळे आज नामशेष होत आहे.
कारळाचा आहारातील उपयोगी गुणधर्म माहीत असूनही अनेक आदिवासी हे पीक थोड्या प्रमाणात घेतात. सर्व उत्पादन व्यापारी लोकांना विकून टाकतात. यातून मिळणारे तेल सौंदर्य प्रसाधनामध्ये वापरले जाते. कृषी विभागाने या पिकासाठी आदिवासी शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करून त्यांचे उत्पादन शहरी बाजारपेठेत अन्नाबरोबरच आरोग्य सुरक्षा देण्यासाठी कसे उपयोगी आणता येईल यासाठी प्रयत्न करावयास हवेत. या पिकाच्या सुधारित जाती आदिवासी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. इथोपिया या देशात हे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. तेथील दुष्काळावर हे अतिशय प्रभावी ठरले आहे.
आज आपण दसरा सण साजरा करीत आहोत. या सणाला मान असलेल्या आपटा, शमी आणि रानामध्ये फुललेले कारळे यांची ओळख मात्र आम्ही विसरून चाललो आहोत. चला तर, विजयादशमी साजरी करताना या बहीण-भावांना आपण शेतात, बांधावर आणण्याचा प्रयत्न करूया. विजयादशमीच्या मुहूर्तावर शमी, आपटा आणि काऱ्हाळ शेतात, बांधावर आणण्याचा संकल्प करूया.
(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.