अॅग्रोवन वृत्तसेवा
Maharashtra Weather Update : पुणे ः राज्यात केवळ चार जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला आहे. १२ जिल्ह्यांमध्ये बरा पाऊस झाला असून, उर्वरित १८ जिल्ह्यांमधील स्थिती चिंताजनक आहे. पावसाची अवकृपा असलेल्या या १८ जिल्ह्यांमधील पीक पेरण्यांच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
हिंगोली, बुलडाणा आणि अकोला या तीन जिल्ह्यांमध्ये एक जून ते ३ जुलैच्या दरम्यान ३० टक्केदेखील पाऊस झालेला नाही. तसेच जळगाव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर या १५ जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत फक्त ५० टक्क्यांच्या आत पाऊस पडलेला आहे.
या कालावधीत केवळ रायगड व गोंदियात ७५ ते १०० टक्के पाऊस झालेला आहे. तर ठाणे व पालघर या दोनच जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस आहे.
महिनाभरात राज्यात सरासरी पाऊस २३९ मिलिमीटर होत असतो.
परंतु यंदा केवळ १४० मिलिमीटर पाऊस झालेला आहे. हा पाऊस सरासरीच्या अवघा ५८ टक्के आहे. गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत १७९ मिलिमीटर म्हणजेच ७४ टक्के पाऊस झालेला आहे. याचा अर्थ गेल्या हंगामापेक्षाही यंदा खरिपाची सुरुवात चिंताजनक आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार ३५५ तालुक्यांपैकी ४७ तालुक्यांमध्ये ० ते २५ टक्के इतका कमी पाऊस आहे.
१५५ तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांच्या आत पाऊस आहे. तर ९० तालुक्यांमध्ये ७५ टक्क्यांच्या आत पाऊस आहे. सद्यःस्थितीत केवळ ३० तालुके मॉन्सूनने कृपाछत्राखाली घेतले आहे. तेथे आतापर्यंत १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झालेला आहे.
राज्याच्या जवळपास २५० तालुक्यांमध्ये पुरेसा पाऊस नसताना दुसऱ्या बाजूला काही गावांमध्ये मॉन्सून इतका बरसला, की तेथे पहिल्याच पावसाने फळपिकांचे मोठे नुकसान झाले. वादळी वाऱ्यासह पावसामुळे जवळपास १८३२ हेक्टरवरील क्षेत्र बाधित झालेले आहे.
इतर विभागांच्या तुलनेत कोकणात सर्वांत जास्त पाऊस झालेला असला तरी तेथे पेरा मात्र अजूनही समाधानकारक झालेला नाही. कोकणातील चार लाख १४ हजार हेक्टरपैकी सध्या केवळ ११ हजार हेक्टरवर पेरा झालेला आहे. तेथे अजूनही भात व नागलीच्या रोपवाटिकांची कामे सुरू आहेत.
नाशिक विभागात २०.६५ लाख हेक्टरपैकी १३ टक्के क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत. पावसाअभावी तेथील पेरण्या रखडल्या आहेत. पुणे व कोल्हापूर विभागांतील काही तालुक्यांमध्ये पुरेसा पाऊस नसल्यामुळे पेरण्या संथ गतीने सुरू आहेत.
मराठवाडा, विदर्भात चिंताजनक स्थिती
सर्वात चिंताजनक स्थिती मराठवाडा व विदर्भाची आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात १५ ते १६ लाख हेक्टरवर पेरण्या झालेल्या नाहीत. लातूर विभागातदेखील २० लाख हेक्टरवरील पेरण्या रखडल्या आहेत.
अमरावती विभागातील २० ते २५ लाख हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या आहेत. ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय अजिबात पेरण्या करू नका, अशी सल्ला सूचना कृषी विभागाने या विभागातील जिल्ह्यांमध्ये जारी केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.