Dharashiv News : कळंब तालुक्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. तालुक्यात पावसाने दोन दिवस विश्रांती घेतल्यामुळे खरीप हंगामातील विविध पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. प्रथमच जूनच्या प्रारंभी सर्वदूर झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून खरीप हंगामातील पेरण्या ७५ हजार हेक्टरवर होणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.
तालुक्यातील सहाही महसूल मंडळांतील गावात दमदार पाऊस झाला. कळंब महसूल मंडळ वगळता पावसाने दोन दिवस विश्रांती घेतली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील विविध पिकांच्या पेरण्यांना वेग आला आहे. गेली तीन-चार वर्षांत प्रथमच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेरणीयोग्य पाऊस झाला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मागील वर्षी सोयाबीन बियाण्याची ३० किलोची गोणी दोन हजार आठशे ते साडेतीन हजार रुपयांना मिळत होती. मात्र, यावर्षी त्याची किंमत पाचशे रुपयांनी उतरली आहे. सध्या बाजारात सोयाबीनचे दर घसरले आहेत. त्यामुळे बियाणावर केली जाणारी प्रक्रिया, मजुरी, कंपनी, व्यापाऱ्यांचा नफा या सर्व बाबी विचारात घेतल्या तर बियाणाचा दर जास्त असल्याचे सोयाबीन उत्पादकांचे म्हणणे आहे.
तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस झाला आहे. दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. ज्यांच्याकडे बैल बारदाना नाही असे शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करत असून बैल बारदाना उपलब्ध असलेले शेतकरी बैलांद्वारे पेरणी करीत असल्याचे दिसून येत आहे.
उडीद, मूग, तूर पेरा वाढणार
बाजरी, मूग, मका, उडीद या खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांच्या बियाणांच्या किमतीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाढ झाली नाही. सोयाबीनचे पेरणीयोग्य क्षेत्र जसेच तसे राहून यंदा उडीद, मूग, तूर या पिकांचा पेरा वाढण्याची शक्यता आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.