

राज्याच्या विविध भागात काल संध्याकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. नाशिक, नंदुरबार, अहमदनगर, यवतमाळ या जिल्ह्यात गारपीटीनं तडाखा दिला. मॉन्सून हंगामात पावसाने ताणून धरलं होतं. त्यामुळे राज्यावर दुष्काळाचं संकट उभं राहिलं. त्याचा फटका सोसत असताना आता मात्र वादळी वारे आणि गारपीटीनं द्राक्ष, कांदा आणि भाजीपाला पिकांचा चिखल केलाय. पण दुष्काळाचा सामना करावा लागणाऱ्या काही भागात रब्बी पिकांना मात्र आत्ताचा पाऊस दिलासादायक ठरतोय. काही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. पण असं असलं तरी नाशिक जिल्ह्यात या पावसानं द्राक्ष बागा आणि कांदा पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. गारपीटीनं द्राक्ष मणी फुटले आहेत. तर कांदा पीक आडवं झालं आहे. सरकारनं तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
द्राक्ष बागा आडव्या झाल्या आहेत. काढणीला आलेल्या बागेत फवारणी सुरू केली पण ट्रॅक्टर फसत आहे, अशी व्यथा निफाड तालुक्यातील चित्तेगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी लक्ष्मण बोराडे यांनी मांडली आहे
नाशिक पट्ट्यात कांदा पीक गारपीटनं जमीनदोस्त केलं आहे. सरकारच्या धोरणामुळे आधीच कांदा उत्पादकांची कोंडी झालेली आहे. त्यात आता अस्मानी संकटानं नुकसान झालं आहे. काही भागात वादळी वाऱ्याने जनावरांच्या गोठ्यांचं नुकसान केलं. तर काही ठिकाणी पोल्ट्री शेड उखडून पडले होते. पश्चिम विदर्भात वादळी वारा, जोरदार पावसानं खरीपातील पिकं भाजीपाल पिकांचं नुकसान झालं. या भागात हा पाऊस रब्बी पिकांसाठी दिलासा देणारा मानला जातोय. विदर्भातील अनेक मंडळात अतिवृष्टीचीही नोंद झाली आहे. बाळापूर तालुक्यात २० मेंढ्या दगावल्याचा प्रकार समोर आला.
नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिक जिल्ह्यातील कसबे सुकेणे भागात द्राक्ष बागांच्या नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी त्यांच्यासोबत दिलीप बनकर आणि माजी अनिल कदम होते. दादा भुसे यांनी यावेळी पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याची माध्यमांना माहिती दिली. भुसे म्हणाले, "द्राक्ष उत्पादकांचं मोठं नुकसान झालं आहे. पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अधिकारी नुकसानीची पाहणी करत आहेत. ताबडतोब नुकसानग्रस्त भागातील पंचनामे करून अहवाल सादर करू." अशी माहित भुसे यांनी दिली. परंतु भुसे यांच्या माहितीनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं समाधान झालं नाही. शेतकऱ्यांनी आपला आक्रोश भुसे यांच्यासमोर मांडला. यावेळी शेतकरी महिलांनी तर भुसे यांच्यावर परखड टीका केली. भूसेंनी रस्त्यावरूनच नुकसानीची पाहणी केली, असा या शेतकरी महिलांचा आरोप होता.
द्राक्ष उत्पादकांनी सरकारच्या कारभारावर प्रश्न चिन्हं निर्माण केलंय. सरकारने गेल्यावर्षीचीच नुकसान भरपाई दिली नाही, असं शेतकरी सांगत आहेत. "काढणीला आलेल्या द्राक्ष बागा हातून गेल्या आहेत. नुकसान झालं की, आमदार, मंत्री येतात. पाहणी करतात पण भरपाई काही मिळत नाही. दरवर्षी शेतकऱ्यांचा असाच अनुभव आहे," असं नाशिक जिल्ह्यातील शेतकरी सनी देशमुख सांगतात.
शेतकऱ्यांची सरकारच्या घोषणांबद्दल नाराजी आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेत फळबागांचा समावेश नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. राज्य सरकारने आणलेल्या १ रुपयांत पीक विमा योजनेचाही शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही, त्यामुळे सरकारनं फळबागांचा पीकविमा योजनेत सहभाग करून घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी केली आहे.
अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील कापूस आणि तूर पिकाला तडाखा बसला आहे. मराठवाड्यातील सगळ्याच जिल्ह्यातील वेचणीला आलेला कापूस भिजला. मक्का आणि रब्बी ज्वारीचं पीक आडवा झालंय. काढणी करून ठेवलेलं सोयाबीन काही वाहून गेल्याचेही प्रकार घडलेत. काही ठिकाणी झालेल्या तुरळक गारपीटीमुळे पिकांना तडाखा बसला. वादळी वाऱ्यानं फळ पिकांचंही नुकसान झालंय.
पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. हा पाऊस रब्बीसाठी फायदेशीर ठरणार आहे. यंदा परतीचा पाऊस झाला नाही. त्यामुळे रब्बी लागवड रखडत चालली होती. पाण्याची सोय असलेल्या भागात पेरणी झाली होती. तर ज्यांनी थोड्या ओलीच्या आधारे पेरणी केली, अशा शेतातील उगवण झालेल्या हरभऱ्याला हा पाऊस फायदेशीर ठरेल. काही प्रमाणात कोरडवाहू कपाशी पिकालाही याचा फायदा सुरु आहे.
दुपारी ३ वाजेपर्यंत तरी मुख्यमंत्री किंवा कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीची माहिती समोर आलेली नव्हती. एरव्ही शेतकऱ्यांचं सरकार आहे असं सांगणारे मुख्यमंत्री शिंदे यांना मात्र शेतकऱ्यांवरच्या संकटापेक्षाही धर्मवीर २ या सिनेमाच्या मुहूर्त कार्यक्रमला हजेरी लावणं महत्त्वाचं वाटतं. आणि शेतकरी पुत्र म्हणवून घेणारे कृषिमंत्री धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या व्यथांवर मौन बाळगतात यावरून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार किती गांभीर्य आहे, तेच दिसून येतं.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.