The problem of marriage of peasant children: अलीकडेच एका वर्तमानपत्रात भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील जयपाल प्रकाश भांडारकर याने शेतकऱ्यांच्या मुलांसाठी सरकारने ‘लाडका भाऊ’ योजना राबवावी अशी मागणी करणारा फलक झळकावून जनतेचे लक्ष वेधून घेतल्याची बातमी वाचली. त्यामध्ये शेतकरी कुटुंबातील पाल्यांच्या लग्नाचा विषय गंभीर झाल्याबाबत, शेतकरी कुटुंबातील पालकच शेतकरी मुलांना मुली देण्यास इच्छुक नसल्याबाबत तसेच शासकीय नोकरी आणि शेती असलेल्या मुलांनाच मुलगी देण्यास मुलीचे पालक तयार असल्याबाबत उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे लाखो तरुण मुले अविवाहित राहत असल्याची गंभीर सामाजिक व्यथाही व्यक्त करण्यात आली आहे. अशा अविवाहित तरुणांसाठी सरकारने ‘लाडका भाऊ’ योजना राबवावी, असा जयपालच्या मागणीरूपी बातमीचा सूर आहे.
समस्या शेतीची आणि लग्नाची
मुलीने माहेरी ज्या अडीअडचणी सहन केल्या त्याचे भोग पुन्हा सासरी तिच्या वाट्याला येऊ नये, ही वधूपक्षाची भूमिका बरोबर आहे. तथापि, प्रत्येकाने असा विचार केला तर शेतकऱ्यांना सून आणि जावई मिळणे अवघड होऊन जाईल. पिण्याचे आणि शेतीचे पाणी हा विषय ग्रामीण भागात प्रामुख्याने चर्चिला जातो. शेतीच्या कामांना म्हणजेच संसाराला हातभार लावायला कृषिकन्या कधीच नाही म्हणणार नाही, पण पिण्याच्या पाण्यासाठी वणवण हिंडणे आणि जिरायती शेती करणे या कष्टप्रद कामाला आपली मुलगी जुंपली जावी, असे कोणाही वधूपित्याला न वाटणे स्वाभाविक आहे. आताच्या मुली या शिकल्या सवरलेल्या असतात. तसेच पिण्याचे पाणी मिळवणे आणि फार कष्टाची शेती अशी पूर्वीसारखी कठीण परिस्थिती राहिलेली नाही. तरीही वधूपिता शेतकरी मुलापेक्षा शहरात नोकरी करणाऱ्या मुलाला प्राधान्य देतो, हे वास्तव आहे. म्हणजे शेतीला लग्नाच्या बाजारात प्रतिष्ठा नाही, हे स्पष्ट होते. शेतकरी वराशी सोयरिक करायला कोणी तयार नाही. साटंलोटं करण्याची पद्धतही विविध कारणांमुळे मागे पडली आहे. होतकरू, कष्टाळू शेतकरी मुलांना जर लग्नासाठी मानसन्मान नसेल, कौटुंबिक भवितव्य नसेल तर ते कुटुंब आणि समाज व्यवस्थेसाठी घातक ठरणार आहे.
शिक्षण आणि शहराची आस
ग्रामीण भागात बहुतांशपणे मुलांचे लग्न रखडणे हे दिसून येत आहे. लग्नाचे सामाजिक वास्तव सोपे करण्यास पाण्याची उपलब्धता आणि कठीण करण्यास अनुपलब्धता कारणीभूत ठरत असते. आधीच शेती करून पोट भरणे कठीण झाले असताना दुष्काळ प्रश्न अधिकच बिकट करतो. परिणामी, शेतकरी वधूपिता शेती करणाऱ्या कुटुंबात मुलगी न देण्याचा निर्णय घेतो. माहेरी बघितलेले शेतीतील राबणे किमान सासरी तरी नसावे, ही मुलींची नैसर्गिक अपेक्षा रास्त म्हणायला हवी. पूर्वी मुली वडीलधाऱ्यांच्या निर्णयाला होकार भरत असत. पण आता मुली आपले मत आणि निर्णय व्यक्त करू लागल्या आहेत. गावोगावी शिक्षणाच्या सोयीसुविधा उपलब्ध झाल्या आहेत. संवाद, संपर्क क्रांती आणि माहिती तंत्रज्ञानामुळे जागरूकता आणि आकलन वाढले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणाईही सजग आणि भान असणारी झाली आहे. अधिक चांगल्या जीवनाची अपेक्षा, शहराचे आकर्षण, चांगले राहणीमान, फॅशन या सर्वांची ग्रामीण भागातील तरुणाईला आस आहे. मराठी, हिंदी मालिकांचा आणि चित्रपटांचा प्रभाव सर्वत्र आहे. त्यामुळे शेतकरी नवरा पत्करून मातीत राबण्यापेक्षा नोकरदार मुलगा स्वीकारून शहरात राहिलेले बरे, हे धोरण झाले आहे. कृषी जीवनात आजची ग्रामीण तरुण पिढी संघर्ष करत असली तरी त्यांचे लग्न न होणे याद्वारे तरुणींची साथ लाभत नाही. हे सामाजिक दुखणे वाढत जाणार आहे.
आशावाद आणि नैराश्य
लग्न ही एक संधी वाटते ग्रामीण भागातील मुलींना आयुष्याचा डाव बदलून पाहण्याची. शहरात गेले तर जगणे सुसह्य होईल, ही आशा त्यापाठीमागे असते. दुष्काळी भागात पाण्यासाठी दाही दिशा पालथ्या घालाव्या लागतात. अविकसित ग्रामीण भागात इच्छा आकांक्षांना मुरड घालून जगावे लागते. या सगळ्यांशी केलेली तडजोड कुठेतरी थांबवता येईल आणि मनमोकळे जगता येईल, हा ग्रामीण मुलींचा आशावाद शहराचे आकर्षण आणि लग्नाकडून असलेल्या सामाजिक अपेक्षांचे वास्तव उघड करतो. आपल्या नात्यात, कुटुंबात, शेजारी-पाजारी महिलांचे जगणे मुलींनी पाहिलेले असते. मुलीचे आईबापही, आपल्या मुलीचे हाल व्हायला नको हे पाहतात. पण त्यांनाही सून मिळेल का नाही ही चिंता असतेच. आता काळ शिक्षणाच्या सार्वत्रीकरणाचा आहे. ग्रामीण भागात आता शेती करणारी तरुणाई शिकली सवरलेली असते. नोकरीच्या मागे न लागता ते आपली शेतीवाडी सांभाळतात. सोबत शेतीवर आधारित काही व्यवसाय करतात. पण त्यांचं लग्न काही केल्या जुळत नाही. लग्न रखडण्याचे प्रमाण अल्पभूधारक शेतकऱ्यांचे जास्त आहे. जिरायती भागात हा प्रश्न खूप गंभीर होतो. यातून शेतीबद्दल निराशा वाढीस लागते. तरुण फळी व्यसनाकडे वळण्याचा धोका असतो. गाव सोडून शहराकडे स्थलांतर करण्याची मानसिकता बळावते. लग्नाचा आणि पुढे कुटुंब स्थिर करण्याचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे काही गावात पहिली आणि दुसरीच्या वर्गात नाव दाखल करायला लहान मुलंच नाहीत, अशी परिस्थिती आहे.
‘शेतकरी नवरा हवा’ मोहीम हवी
सामाजिक कार्यकर्ते या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करताहेत. काही ज्येष्ठ, अनुभवी शेतकरी गाव ते गाव अशी सोयरिक जुळवून देण्यासाठी प्रयत्नरत आहेत. आज हा गंभीर प्रश्न आणि त्यावर उपाययोजना शोधण्याचे प्रयत्न सुरू असले तरी काळ बदलला आहे. शेती कनिष्ठ आणि धाकटी ठरली आहे. हे आपण लक्षात घ्यायला हवे. आज नव चातुर्वर्ण्य व्यवस्थेत शेतकरी सगळ्यांचा पोशिंदा असुनही दुर्लक्षित ठरला आहे. इंडिया हा अधिकाधिक भौतिक सुखात मश्गूल होत असताना आपण सारे अपार कष्ट असलेल्या शेतीतून शेतकऱ्याचे दारिद्र्य नष्ट करायला आणि पर्यायाने त्याची घरगृहस्थी स्थापित करायला कुचकामी आणि कमजोर ठरलो आहोत. हे दुःखद आहे. इंडिया संपन्न व्हायला हवा, आणि भारतही सुखी व्हायला हवा. शेती व्यवस्थेशी संलग्न असलेल्या उपवर वधूवरांचे लग्न जुळणे आणि ते होणे ही केवळ कृषी क्षेत्राच्या स्थिरतेशी संबंधित बाब नव्हे तर ती ग्रामीण कुटुंब व्यवस्था, सामाजिक स्थिरता, ग्राम संस्कृती आणि सामाजिक परंपरा याच्याशी संबंधित महत्त्वपूर्ण बाब आहे. सुदैवाने शेतीशी संबंधित मराठी मालिकांमधून शेतीला आणि शेतीपुत्रांना प्रतिष्ठा असल्याचे चित्र यथोचितपणे रेखाटण्यात आले आहे. त्याचाही प्रभाव पडून जवान, पैलवान आणि किसान असलेले ग्रामीण तरुण चतुर्भुज होतील, अशी आशा करूया.
(लेखक ग्रामजीवनाचे अभ्यासक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.