
Agricultural Water Planning : बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पातून होणाऱ्या सिंचन व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी ‘पेनटाकळी प्रकल्प पाणी वापर संस्थांचा महासंघ’ गेल्या १८ वर्षांपासून काटेकोरपणे सांभाळत आहे. त्यांच्या या कार्याची दखल नुकतीच देशपातळीवर घेतली गेली असून, २२ नोव्हेंबर २०२४ रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते महासंघाला पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांनी दिलेली ही कौतुकाची थाप व गौरव महासंघाच्या कार्याची प्रचिती देतो.
प्रकल्प आधारित सिंचन व्यवस्था सक्षमपणे चालण्यासाठी पाणीवापर संस्था महत्त्वाच्या असतात. विदर्भात प्रकल्प आधारित सिंचन व्यवस्थापन फारसे होत नाही. मात्र बुलडाणा जिल्ह्यात २००३ मध्ये पेनटाकळी प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले. या प्रकल्पांतर्गत कालवा व साखळी पद्धतीने तयार केलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यांद्वारे सुमारे साडेचौदा हजार हेक्टरपर्यंत सिंचन क्षमता तयार झाली.
सिंचन व्यवस्थापन सांभाळण्यासाठी २४ फेब्रुवारी २००५ रोजी या प्रकल्पावर पाणी वापर संस्था व त्यांचा महासंघ उदयाला आला. आजपर्यंत या महासंघामार्फत सुमारे ९८९४ हेक्टर क्षेत्रावरील सिंचनाची कामे आज पाहिली जातात. यातून साडेसहा हजारांवर सभासद शेतकऱ्यांचे अर्थकारण सुधारले आहे.
पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर पिकांसाठी काटेकोरपणे केला जात असल्यामुळे सन २०१४-१५ मध्ये प्रकल्पावर विक्रमी १० हजार १५३ हेक्टर एवढे सिंचन करण्यात यश आले होते. या महासंघाने प्रति दशलक्ष घनमीटर ४५० हेक्टरपर्यंत सिंचन करण्याची कामगिरी बजावली असून, हे प्रमाण शासकीय मानकापेक्षा तब्बल २०० हेक्टर प्रति दलघमी अधिक आहे. स्थापनेपासून महासंघाचे नेतृत्व राजेंद्र गाडेकर करत असून, पाटबंधारे खात्यातून सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता र. मा. गट्टाणी हे मार्गदर्शक म्हणून खंबीरपणे पाठीशी उभे आहेत. शिवाय विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे मार्गदर्शन व शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग यांचा मोलाचा वाटा आहे.
महत्त्वाचे...
पेनटाकळीमुळे ९८९४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली.
४० गावशिवारात १२ पाणीवापर संस्थांद्वारे साडेनऊ हजार हेक्टरपेक्षा अधिक शेतीचे सिंचन.
काटेकोर नियोजनामुळे शासकीय मानकापेक्षा प्रतिदलघमीला २०० हेक्टर अधिक सिंचनाची झेप.
महासंघाचा वेळोवेळी गौरव
महासंघाला सन २०१४-१५ मध्ये विमलताई स्मृती जल पुरस्कार मिळाला.
सन २०१७-१८ मध्ये महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार जाहीर झाला होता.
२२ नोव्हेंबर २०२४ रोजी महासंघाला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
- राजेंद्र गाडेकर, ९०२८११५७७७
(अध्यक्ष, पेनटाकळी प्रकल्प पाणी वापर संस्थांचा महासंघ, मेहकर, जि. बुलडाणा)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.