Heat Wave : गेल्या दहा महिन्यांनी मोडला उष्णतेचा उच्चांक

Summer Heat Update : जागतिक तापमान वाढीचे स्वरूप सध्या जाणवत आहे. जून २०२३ ते मार्च २०२४ पर्यंतच्या दहा महिन्यांनी सरासरीपेक्षा अधिक तापमानाचा उच्चांक मोडला आहे.
Heat Update
Heat UpdateAgrowon

Pune News : जागतिक तापमान वाढीचे स्वरूप सध्या जाणवत आहे. जून २०२३ ते मार्च २०२४ पर्यंतच्या दहा महिन्यांनी सरासरीपेक्षा अधिक तापमानाचा उच्चांक मोडला आहे. आतापर्यंतच्या मार्चमधील नोंदीनुसार यंदाचा मार्च सर्वांत उष्ण ठरला आहे.

मार्च महिन्यातील जागतिक पृष्ठभागाचे तापमान २० व्या शतकातील सरासरी ५४.९ अंश फॅरनहाइट (१२.७ अंश सेल्सिअस) पेक्षा २.४३ अंश फॅरनहाइटने (१.३५ अंश सेल्सिअस) जास्त होते. त्यामुळे मार्च हा महिना विक्रमी तापमानाचा ठरला आहे. तसेच जून २०२३ पासून विक्रमी-उच्च जागतिक तापमानाचा सलग १० वा महिना ठरला.

अमेरिकेतील नॅशनल ओशनिक अॅण्ड एटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन (नोआ) या संस्थेच्या राष्ट्रीय पर्यावरणीय माहिती केंद्राने (एनसीईआय) प्रसिद्ध केलेल्या जागतिक मासिक तापमान अहवालानुसार २०२४ हे विक्रमी सर्वांत उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता ५५ टक्के आहे. तर हे वर्ष पहिल्या पाच उष्ण वर्षांत स्थान मिळण्याची शक्यता ९९ टक्के आहे.

आफ्रिका, युरोप आणि दक्षिण अमेरिका, तसेच पूर्व-उत्तर अमेरिका, पूर्व आशिया आणि पूर्व ऑस्ट्रेलियात मार्चचे तापमान सरासरीपेक्षा जास्त होते. याउलट, पश्चिम उत्तर अमेरिका, मध्य आशिया आणि पश्चिम ऑस्ट्रेलियाचा पृष्ठभाग सरासरीपेक्षा थंड होता. आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेचा मार्च सर्वांत उष्ण होता, तर युरोपचा दुसरा सर्वांत उष्ण मार्च होता.

Heat Update
Heat Wave : राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमानात मोठी वाढ

समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान बऱ्याच भागात सरासरीपेक्षा जास्त होते. उष्णकटिबंधीय अटलांटिक महासागरात पृष्ठभागाचे तापमान विक्रमी उष्ण ठरले आहे. तर दक्षिण महासागराचा बराचसा भाग आणि आग्नेय पॅसिफिक आणि दक्षिण हिंद महासागराच्या काही भागात तापमान सरासरीपेक्षा कमी होते. एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या वर्षभरात जागतिक महासागराचा पृष्ठभाग आतापर्यंतचा विक्रमी उष्ण नोंदला गेला.

मध्य तपांबरात तापमानाचा विक्रम

‘नोआ’च्या राष्ट्रीय पर्यावरणीय उपग्रह व माहिती सेवेच्या (एनईएसडीआयएस) उपग्रह माहितीनुसार, मार्चमध्ये मध्य तपांबराच्या (ट्रोपोस्फियर) (पृथ्वीच्या पृष्ठभागापासून अंदाजे २ ते ६ मैल अंतरावर) तापमान विक्रमी पातळीवर होते. गेल्या नऊ महिन्यांत सातत्याने मध्य-तपांबरासाठी तापमानाने जागतिक विक्रम प्रस्थापित केले आहेत.

जमिनीवरील बर्फाचे आच्छादन घटले

मार्चमध्ये उत्तर गोलार्धातील बर्फाचे आच्छादन १९९१-२०२० च्या सरासरीपेक्षा कमी होते आणि रेकॉर्डवरील आठव्या क्रमांकाचे सर्वांत कमी आच्छादन होते. युरेशियामध्ये २ लाख २० हजार चौरस मैल आणि उत्तर अमेरिकेत ३ लाख २० हजार चौरस मैल आच्छादन आढळून आले असून, ते सरासरीपेक्षा कमी होते. सर्वसाधारणपणे, युरोप आणि पूर्व अमेरिकेत बराचसा भाग सरासरीपेक्षा कमी होता तर पश्चिम अमेरिकेत मात्र बर्फाचे आच्छादन सरासरीपेक्षा जास्त होते.

समुद्रातील बर्फाचे प्रमाणही कमी

४६ वर्षांच्या नोंदींचा विचार करता जागतिक समुद्रातील बर्फाचा विस्तार ६.९७ दशलक्ष चौरस मैल म्हणजेच आठव्या क्रमांकाचा सर्वात लहान राहिला. १९९१-२०२० च्या सरासरीपेक्षा ४ लाख १० हजार चौरस मैल कमी होते. आर्क्टिक समुद्रातील बर्फाचा विस्तार सरासरीपेक्षा किंचित म्हणजेच ६० हजार चौरस मैलांनी कमी होता, तर अंटार्क्टिक समुद्रातील बर्फाचा विस्तार सरासरीपेक्षा खूपच कमी म्हणजेच तब्बल ३ लाख ५० हजार चौरस मैलांनी कमी होता.

Heat Update
Summer Heat : ग्रामीण भागात उन्हाचा पारा वाढला

मार्चमध्ये चार चक्रीवादळे

मार्चमध्ये जगभरात चार चक्रीवादळे आली, जी १९९१-२०२० च्या सरासरीपेक्षा (सहा) कमी होती. ‘नेव्हिल’ हे सर्वांत मोठे उष्णकटिबंधीय चक्रीवादळ ठरले. त्यामुळे वायव्य ऑस्ट्रेलियात गंभीर परिस्थिती निर्माण झाली. दक्षिण हिंद महासागरात ‘फिलिपो’ चक्रीवादळाने मोझांबिकमध्ये, तर ‘गमाने’ चक्रीवादळाने मादागास्करमध्ये जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस झाला. उत्तर ऑस्ट्रेलियातील ‘मेगन’ चक्रीवादळाने तडाखा दिला. ही तिन्ही वादळे जमिनीवर आली.

थोडक्यात महत्त्वाचे...

जगातील बऱ्याच ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा जास्त होते. तर पश्चिम उत्तर अमेरिका, मध्य आशिया आणि पश्चिम ऑस्ट्रेलियाचे काही भाग सरासरीपेक्षा थंड होते.

उत्तर गोलार्धातील बर्फाचे आच्छादन आणि अंटार्क्टिक समुद्रातील बर्फाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी होते. ते आतापर्यंतचे पाचव्या क्रमांकाचे कमी प्रमाण ठरले आहे.

जागतिक उष्णकटिबंधीय चक्रीवादळाची संख्या देखील सरासरीपेक्षा कमी होती, यात मोझांबिकमधील ‘फिलिपो’, मादागास्करमधील ‘गामाने’ आणि उत्तर ऑस्ट्रेलियातील ‘मेगन’ तीन वादळे जमिनीवर आली.

जानेवारी ते मार्च सर्वांत उष्ण काळ

जानेवारी ते मार्च २०२४ या तिमाहीत जागतिक पृष्ठभागाचे तापमान २० व्या शतकातील सरासरीपेक्षा २.४३ अंश फॅरनहाइट (१.३५ अंश सेल्सिअस) जास्त होते. हा विक्रमी असा सर्वांत उष्ण काळ ठरला. दक्षिण अमेरिकेत सर्वांत उष्ण तिमाही काळ आहे. आफ्रिका, युरोप, ओशनियात दुसऱ्या क्रमांकाचा उष्ण कालावधी राहिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com