Tree Agriculture : अलीकडच्या काळात हवामानबदलामुळे (Climate Change) वादळे आणि अकाली पाऊस यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हंगामी पिकांचे (Seasonal Crop) मोठे नुकसान होते. ते टाळण्यासाठी ज्यांना शक्य आहे, त्या शेतकऱ्यांनी हंगामी पिकांऐवजी वृक्षलागवडीचा (Tree Cultivation) पर्याय निवडावा, असे माझे मत आहे.
अर्थात, हंगामी पिकांच्या मानाने वृक्षांच्या नव्या वाणांची पैदास करणे हे काम अवघड आणि वेळखाऊ असते. कारण वृक्षाचे बी पेरल्यापासून त्याला फुले-फळे येऊ लागेपर्यंत ५ ते १० वर्षे थांबावे लागते.
नवी वाणे निर्माण करण्यासाठी वापरला जाणारा एक सर्वमान्य मार्ग म्हणजे दोन भिन्न वाणांचा संकर करून निर्माण झालेल्या संकरित बीजापासून पुढच्या पिढ्या उत्पन्न करावयाच्या आणि त्यांच्यातून आपल्याला हव्या असणाऱ्या गुणधर्माच्या वनस्पतींची निवड करावयाची.
दुसरा एक मार्ग आहे तो उत्परिवर्तनाचा. गामा किरण किंवा एथिल मेथेन सल्फोनेटसारख्या काही विशिष्ट रसायनांमुळे वनस्पतींच्या आनुवांशिक गुणधर्मांमध्ये बदल घडवून आणता येतात.
ज्यांवर उत्परिवर्तनाची प्रक्रिया केलेली आहे अशा वनस्पतींच्या पुढच्या पिढ्या वाढवून त्यांतून आपल्याला हव्या असलेल्या वनस्पतीची निवड करता येते.
या दोन्ही पद्धतींमागला हेतू असा असतो, की वनस्पतींमध्ये नवे गुणधर्म निर्माण करावयाचे, म्हणजे त्यांतून आपल्याला पाहिजे त्या गुणधर्मांची वनस्पती आपण निवडू शकतो.
परंतु नव्या वाणांच्या पैदाशीचे काम हे भारतात मुख्यतः सरकारी स्तरावरच केले जाते. सरकारी नोकरीतील कोणतीच व्यक्ती दीर्घ काळ एका जागी आणि एकाच पदावर ठेवली जात नाही.
तिची दर तीन वर्षांनी बदली किंवा बढती केली जाते. त्यामुळे जरी एखाद्या संशोधकाने एखाद्या वृक्षाचे सुधारित वाण निर्माण करायचे ठरविले, तरी त्यातून काही निष्पन्न होण्याच्या आतच त्याची त्या पदावरून उचलबांगडी होणार.
त्यामुळे हंगामी पिकांचे नवे वाण ज्या संख्येने आणि सातत्याने लागवडीसाठी उपलब्ध केले जातात, त्या मानाने फळझाडांचे नवे वाण फारच कमी संख्येने आणि कमी वारंवारतेने उपलब्ध होतात. नाही म्हणायला आंबा आणि द्राक्षाचे काही चांगले वाण गेल्या काही दशकांत निघाले आहेत.
पण फणस, चिंच, कवठ, सीताफळ, रामफळ, करवंद, कोकम, आडू, चारोळी, लिंबू वर्गीय देशी फळे, ताड, नारळ इ. अनेक फळांच्या बाबतीत आपले पैदासकार अजून उदासीनच दिसतात.
आंब्याच्या जातींची समृद्धी
या समस्येवरचा उपाय आहे तो देशी वृक्षांचा. ते भारतात सर्वत्र आढळतात. त्यामुळे त्यांच्यात निसर्गतःच खूप वैविध्य आढळते.
आपण याबाबतीत आंब्याचे उदाहरण घेऊ शकतो. फळ रसाळ आहे की कापून खाण्यासारखे, बाठ मोठी की लहान, ती रेषाळ आहे की बिनरेषाळ, बाठीत माशी असते का नाही, कैरी आंबट आहे की खोबऱ्यासारखी,
पिकलेला आंबा गोड आहे की आंबट, साल जाड की पातळ, चीक अधिक की कमी, पिकल्यावर फळाचा आणि गराचा रंग कसा, फळाचा आकार लांबट की गोल, फळ किती मोठे, फळे दरवर्षी भरपूर लागतात की एक वर्षाआड,
मोहर वर्षातून एकदा येतो की दोनदा, आंबा पावसाळ्यापूर्वी घरात येतो का, वाहतुकीत फळ टिकते का, रस आटवून ठेवता येतो का, अशा विविध निकषांवर स्थानिक लोकांनी आंब्याच्या वाणांची निवड केली आहे. सर्वेक्षण केल्यास या सर्व गुणधर्मांचे आंबे आपल्याला भारतात सर्वत्र आढळतील.
थोडक्यात, निव्वळ सर्वेक्षण करूनही आपल्याला देशी फळझाडांमध्ये सुधारणा करण्यास भरपूर वाव आहे; कारण अनेक ठिकाणी स्थानिक लोकांनीच विकसित केलेले आपापले वैशिष्ट्यपूर्ण वाण आढळतील.
ते आपण जसेच्या तसे घेऊन त्यांचा प्रसार करू शकू. पृथ्वीतलावर वनस्पती निर्माण झाल्याला अडीच अब्ज वर्षे झाली असे मानले जाते. या दीर्घ काळात वनस्पतींची अगदी वेगवेगळ्या दिशांनी उत्क्रांती झाली आणि त्यामुळे जगात वेगवेगळ्या गुणधर्मांच्या वनस्पती निर्माण झाल्या.
प्राचीन मानवाने त्यांपेकी केवळ खाद्य वनस्पतींवरच भर दिला आणि त्यातही हंगामी वनस्पतींना प्राधान्य दिले. पण आधुनिक काळात आपण अनेक नवनव्या गुणधर्मांच्या वनस्पतींचा शोध लावू शकलेलो आहोत.
स्टार्च, प्रोटिनसाठी फणस
खाद्यतेलासाठी आज आपण जैतून (ऑलिव्ह), तेलताड आणि नारळ या वृक्षांचा उपयोग करीतच आहोत. हंगामी तेलपिकांच्या मानाने या तिन्ही वृक्षांद्वारे प्रति हेक्टर अधिक तेल मिळते.
त्याचप्रमाणे आपण स्टार्च आणि प्रोटीन (प्रथिने) यांचे उत्पादन करणारे वृक्ष शोधून काढले, तर आपले स्टार्च आणि प्रोटीनचे उत्पादन तर वाढेलच, पण हंगामी पिकांसाठी दरवर्षी करावी लागणारी नांगरट, पेरणी आणि जमीन मशागत या कामांनाही आपण सुट्टी देऊ शकू.
सध्या स्टार्चचा स्रोत म्हणून चिंचोक्यांचा वापर केला जात आहे; पण चिंचोक्यांपासून तयार केलेल्या स्टार्चचा वापर खाण्यासाठी केला जात नाही. कापड उद्योगात खळ म्हणून त्याचा उपयोग होतो. याउलट फणसाची आठळी आपण खातो.
धान्यांच्या मानाने द्विदल वनस्पतींच्या बियांमध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे फणसाच्या आठळ्यांमधील स्टार्च आणि प्रोटीनचा आहारशास्त्रानुसार अभ्यास होणे गरजेचे आहे.
फणसामध्येही आंब्याप्रमाणेच विविध गुणधर्म आढळतात. आजवर आपण मुख्यतः फणसातल्या गऱ्यांचाच विचार केला, पण निसर्गात शोध घेतल्यास आपल्याला नक्कीच मोठी आठळी आणि पापुदऱ्यासारखा पातळ गर असणारे फणसाचे वाण सापडेल.
आंबा आणि फणस या दोन्ही झांडांचे लाकूडही स्थानिक पातळीवर घरातले पाट, पोळपाट-लाटणी, ताक घुसळण्याची रवी अशा विविध वस्तू बनविण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे लाकडाच्या गुणधर्मांचाही आपण विचार केला पाहिजे.
पारिजातक रंगद्रव्यांसाठी उपयुक्त
आपल्या देशांतर्गत उपलब्ध असणाऱ्या विविध जातींचा वापर करून जशी आपण फळझाडांचे नवे वाण निर्माण करू शकतो, त्याचप्रमाणे फळांव्यतिरिक्त अन्य वनस्पतींचाही आपण विचार करू शकतो. याचे एक उदाहरण आहे पारिजातकाचे.
पारिजातकाच्या पांढऱ्या पाकळ्यांच्या खाली एक भडक केशरी रंगाचे देठ असते. हे देठ कापून वाळवून ठेवले, तर आपल्याला त्यांचा जिलेबी किंवा श्रीखंडात खाद्यरंग म्हणून वापर करता येतो. या देठांचा उत्तर भारतात वापर केला जातो.
तिथल्या वैज्ञानिकांनी या रंगाचा अभ्यास करून असे शोधून काढले आहे, की हे देठ आपण खाद्यरंग म्हणून सुरक्षितपणे वापरू शकतो. त्या देठात आढळणाऱ्या रंगद्रव्यांपेकी दोन रंगद्रव्ये ही केशरातलीच आहेत.
हल्ली विकतचे खाद्यपदार्थ घेण्याचा लोकांचा कल खूपच वाढला आहे आणि त्यामुळे पिवळ्या आणि केशरी खाद्यरंगांची मागणीही बऱ्याच प्रमाणात वाढली आहे.
काही खाद्यनिर्माते सरकारने परवानगी दिलेले रासायनिक रंग वापरतात, पण हल्लीचे गिऱ्हाईक सेंद्रिय पदार्थांचा वापर करण्यावर अधिक भर देतात.
या संधीचा वापर करून आपण जर योग्य त्या रंगद्रव्यांचे अधिक प्रमाण असणारे पारिजातकाचे नवे वाण निर्माण केले, तर त्यावर आधारित असा सेंद्रिय खाद्यरंगाचा एक नवा उद्योगही उदयाला येऊ शकेल.
रंगद्रव्यांप्रमाणेच सुवासिक, मसाल्याच्या आणि औषधी द्रव्यांचेही वृक्ष उपलब्ध आहेत आणि त्यांवर आधारित उद्योगही ग्रामीण भागात चालविता येतील.
: ९८८१३०९६२३,
(लेखक ‘आरती’चे (अॅप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट-ARTI) संस्थापक अध्यक्ष आणि विश्वस्त आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.