Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील ९२ लघु व तीन मध्यम प्रकल्प मिळून ९५ प्रकल्प कोरडे पडले आहेत. दुसरीकडे २५ मध्यम व २६४ लघु प्रकल्प मिळून २८९ प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. झपाट्याने खालावत झालेल्या पाणीसाठा चिंता वाढवतो आहे.
उन्हाची तीव्रता वाढण्यासोबतच मराठवाड्यातील पाणीसाठ्याची स्थितीही चिंताजनक होत चालली आहे. मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांपैकी तीन प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यामध्ये जालना बीड व धाराशिव मधील प्रत्येकी एका मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे. उर्वरित मध्यम प्रकल्पांपैकी २९ प्रकल्पात २५% पेक्षा कमी १० प्रकल्पात २५ ते ५० टक्के दरम्यान सात प्रकल्पात ५० ते ७५ टक्के दरम्यान तर नांदेड मधील एका मध्यम प्रकल्पात ७५ टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक आहे.
लघु ७५० प्रकल्पांपैकी तब्बल ९२ प्रकल्पात पाण्याचा थेंबही शिल्लक नाही. कोरड्याठाक पडलेल्या या ९२ लघु प्रकल्पांमध्ये सर्वाधिक ४६ प्रकल्प धाराशिव जिल्ह्यातील आहेत. त्यापाठोपाठ बीडमधील २५, छत्रपती संभाजीनगरमधील १२ व लातूरमधील ९ लघु प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे. उर्वरित लघुप्रकल्पांपैकी २२३ लघु प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी, ९९ प्रकल्पात २५ ते ५० टक्के, ६३ प्रकल्पात ५० ते ७५ टक्के तर नऊ प्रकल्पात ७५ टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.
उपयुक्त पाणीसाठा २६ टक्क्यांवर
मराठवाड्यातील ८७७ लघु, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह गोदावरी, तेरणा, मांजरा रेना या नदीवरील बंधाऱ्यांमधील उपयुक्त पाणीसाठा २६ टक्क्यांवर आला आहे. त्यामध्ये ११ मोठ्या प्रकल्पात ३२ टक्के, ७५ माध्यम प्रकल्पात केवळ १४ टक्के, ७५० लघु प्रकल्पातही केवळ १४ टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यात २९ टक्के तर तेरणा, मांजरा, रेना नदीवरील २७ बंधाऱ्यांमधील २१ टक्के उपयुक्त पाणी साठ्याचा समावेश आहे.
माजलगाव, सीना कोळेगाव मृतसाठ्यात
मोठ्या अकरा प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा ३२ टक्क्यांवर आला असताना या प्रकल्पांपैकी माजलगाव व सीनाकोळेगाव हे दोन मोठे प्रकल्प मृतसाठ्यात गेले आहेत. सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात केवळ २५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. येलदरी प्रकल्पात ४१ टक्के, सिद्धेश्वर मध्ये ७५ टक्के, मांजरामध्ये केवळ ११ टक्के, निम्न मनारमध्ये ३५ टक्के, निम्न तेरणा मध्ये ६ टक्के, विष्णुपुरीत ५४ टक्के तर निम्न दुधनामध्ये केवळ ११ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे.
परभणी, जालना, धाराशिवमधील मध्यम प्रकल्प दयनीय
मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांपैकी धाराशिव, परभणी व जालन्यातील प्रकल्पांची स्थिती दयनीय झाली आहे. धाराशिव मधील १७ व परभणीतील दोन मध्यम प्रकल्पात प्रत्येकी पाच टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. दुसरीकडे जालन्यातील ७ मध्यम प्रकल्पात केवळ आठ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे. छत्रपती संभाजीनगरमधील १६ व लातूरमधील ८ मध्यम प्रकल्पात प्रत्येकी सरासरी ११ टक्के, बीडमधील १६ मध्यम प्रकल्पात २३ टक्के तर नांदेडमधील ९ मध्यम प्रकल्पात ३३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
जिल्हानिहाय पाणीसाठा
जालना मधील ५७ लघु प्रकल्पात केवळ १ टक्का उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. दुसरीकडे परभणीमधील २२ प्रकल्पात आठ टक्के, धाराशिवमधील २०६ प्रकल्पात १० टक्के, बीडमधील १२६ प्रकल्पात १२ टक्के, लातूरमधील १३४ प्रकल्पात १४ टक्के, छत्रपती संभाजीनगरमधील ९८ प्रकल्पात १५ टक्के, हिंगोलीतील २७ प्रकल्पात २७ टक्के तर नांदेडमधील ८० प्रकल्पात ४१ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गत तीन वर्षाच्या तुलनेत आताचा उपयुक्त पाणीसाठा हा सर्वात कमी आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.