मुसाफिर हूँ यारों...

चे गव्हेरा बंडखोर होता. लोककल्याणासाठी त्याचा जीव तीळतीळ तुटत होता. प्रवासातून घडलेला, बदललेला हा तरुण जगाच्या इतिहासाच्या बदलाचा प्रेरक ठरला. प्रत्येक जण क्रांती करू शकत नाही, मात्र स्वतःचा छोटासा भवताल बदलण्याचं सामर्थ्य प्रत्येकाला अंगीकारता येऊ शकतं. त्यासाठी आत्ममग्नतेच्या कोषाबाहेर पडावं लागतं.
The Motorcycle Diaries
The Motorcycle DiariesAgrowon
Published on
Updated on

शहाणपण उत्तमरीत्या कमाविण्याचे काही प्रभावी मार्ग आहेत. प्रवास त्यापैकी एक! पृथ्वीतलावर अस्तित्व लाभल्यापासून मिळालेल्या दोन पायांचा वापर करून मानव भक्ष्याच्या शोधासाठी स्थलांतर करू लागला. पुढं थोडी प्रगती झाल्यावर, सुसंस्कृतपणा प्राप्त झाल्यावर ही वाटचाल अधिक डोळस बनली. वाहतुकीची साधनं प्रगत होत गेली, तसा प्रवास अधिक सुकर, वेगवान होत गेला. जमिनीबरोबरच पाण्यातून आणि हवेतूनही झेप घेता येणं शक्य झालं.

अनेक दर्यावर्दींनी समुद्रात नौका लोटून प्रगतीचे दरवाजे उघडले. भारत शोधायला निघालेला कोलंबस अमेरिकेत पोहोचला आणि एका संपन्न राष्ट्राचा जन्म झाला. वास्को डी गामानं भारताच्या भूमीवर पाऊल टाकलं, तो क्षण या देशाच्या इतिहास आणि भूगोलाच्या बदलाची नांदी ठरला. मोहनदास करमचंद गांधी या तरुणानं देश समजून घेण्यासाठी भारतभर पदयात्रा केली, त्यातून जन्माला आला एक महात्मा, ज्यानं अहिंसेची अनोखी शिकवण अवघ्या जगाला दिली. याच अमोघ अस्त्राचा वापर करून त्यानं या खंडप्राय देशाला स्वातंत्र्यही मिळवून दिलं.

चिनी आणि युरोपीयन प्रवाशांनी तत्कालीन भारताचं केलेलं वर्णन, दस्तऐवजीकरण आजही इतिहासाचा सज्जड पुरावा म्हणून वापरलं जातं. ब्रिटनमध्ये जन्मलेला रिचर्ड बर्टन एकोणिसाव्या शतकातील गाजलेला धाडसी प्रवासी. तब्बल २९ भाषा अवगत केलेल्या या अवलियानं जिवाची जोखीम पत्करून युरोप, आफ्रिका आणि आशिया खंडांतून उदंड प्रवास केला. अरबांचं ‘अरेबियन नाइट्‍स’ आणि भारताचं ‘कामसूत्र’ आंग्लभाषेत अनुवादित करून त्यानं समस्त जगाला अचंबित केलं. बर्टनसारख्या प्रवाशांनी जग जोडलं. जगाचा नकाशा अशा मुशाफिरांच्या पावलांबरहुकूम तयार होत गेला. त्यातून भूगोल आकाराला आला. आक्रमणाच्या उद्देशानं वाटचाल करणारे अलेक्झांडर दि ग्रेट, नेपोलियनसारखे सत्ताकांक्षीही भूतलावर निपजले. त्यांनी शस्त्राच्या बळावर सीमोल्लंघन करीत भूगोल बदलला. बदललेल्या भूगोलाच्या सीमा अद्यापही जगभर धगधगताहेत.

विमान किंवा रेल्वे, बस, मोटारीतून प्रवास करणाऱ्यांची आपल्याकडं कमतरता नाही. सायकल किंवा मोटरसायकलवरून दीर्घ प्रवास करणारे तसे कमीच. एकेकाळी अटकेपार झेंडा फडकावणारे, पानिपतात समशेर गाजवणारे मराठे आता झाडासारखी मूळं मातीत गाडून घरकोंबडे झाले आहेत. पर्यटनाचं ठीक आहे, पण पोटापाण्यासाठी अगदीच अपरिहार्य ठरलं तरच जागा सोडायची हा आपला नवा मराठी बाणा! हे साचलेपण माणूस म्हणूनही आपली मोजमापं कमी करणारं आहे आणि त्याचं भानही आपल्याला नाही. पाणी साचलं की त्याचं डबकं बनतं, वाहिलं की ते पवित्र नदी म्हणून ओळखलं जातं.

अनेक भटक्या जमाती आजही जगाच्या पाठीवर एका ठिकाणी बूड न टेकवता सतत भटकत राहतात. त्यांची अनुभवांची शिदोरी अधिक संपन्न असते. कोणत्याही कठीण परिस्थितीला तोंड देण्याची, अल्प साधनसंपत्तीत जगण्याची अचाट क्षमता त्यांच्याकडं असते. भौतिक संपत्ती कमी असेल, पण जीवनानुभवात त्यांची बरोबरी कोणी करू शकत नाही. लेखकांनाही हे लागू पडतं. म्हणूनच जगण्याला भिडणारा, फिरता लेखक अधिक सकस साहित्य निर्मिती करू शकतो.

अर्नेस्टो चे गव्हेरा या पुढं क्युबासह काही देशांच्या स्वातंत्र्य चळवळींचं नेतृत्व करणाऱ्या हीरोच्या अनोख्या प्रवासाची कहाणीही अशीच इतिहास बदलवणारी ठरली. नुकतंच मिसरूड फुटलेला वैद्यकीय शाखेचं शिक्षण घेणारा हा २३ वर्षांचा हुशार तरुण आपला २९ वर्षांचा मित्र अल्बर्टो ग्रानाडो याच्याबरोबर मोटारसायकलवरून सन १९५२ च्या जानेवारीत लॅटिन अमेरिकेच्या चित्तथरारक प्रवासाला निघतो, त्याचं हे वर्णन, त्याच्याच शब्दातलं. पुढं ते ‘द मोटारसायकल डायरीज’ या नावानं स्पॅनिश भाषेत प्रसिद्ध झालं. यथावकाश चे गव्हेरा क्युबाच्या स्वातंत्र्य लढ्यातील पराक्रमामुळं जगाच्या नजरेत भरला.

प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात एल्गार करू पाहणाऱ्या जगभरातील तरुणाईचं तो प्रतीक ठरला, त्यांच्या गळ्यातील ताईतच जणू! त्यामुळं त्याची ही अनोखी डायरी जगभरातील विविध भाषांत पोहोचली. अर्जेंटिनातून ते चिलीला पोहोचले. ॲण्डीजच्या बर्फाच्छादित पर्वतरांगा, अटाकामाचं सहनशीलतोचा कस पाहणारं वाळवंट, पेरूमधील ॲमेझॉन नदी आणि तिच्या काठावरील आदिवासी जीवन हे सारं त्यांनी भरभरून अनुभवलं. तब्बल आठ हजार किलोमीटरचा हा थकवणारा दीर्घ प्रवास त्यांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारा ठरला. दोघांचंही अवघं आयुष्य बदलून गेलं.

आदिवासींचं दारिद्र्य, त्यांची होणारी पिळवणूक, शोषण चे गव्हेराच्या मनात क्रांतीची बीजं पेरणारी ठरली. तो साम्यवादाकडं झुकला. पुढं फिडेल कॅस्ट्रोच्या क्यूबालाही त्यानं या मार्गावरच नेलं. अमेरिकेच्या कुशीतला हा चिमुकला देश आजही या बलाढ्य देशाला वाकुल्या दाखवत साम्यवाद मिरवतो आहे. कॅस्ट्रो हयात असताना त्याच्या हत्येचे अनेक प्रयत्न झाले. त्याची राजवट उलथवून टाकण्यासाठी अमेरिकेनं अनेक खेळ्या केल्या. पण त्या साऱ्या निष्फळ ठरवण्यात क्यूबाला यश आलं.

चे गव्हेरा आणि ग्रानाडो ज्या खंडात राहतात त्या खंडाबद्दल त्यांनी फक्त पुस्तकांमध्ये वाचलेल्या गोष्टी प्रत्यक्षात पाहणं, अनुभवणं हा या प्रवासाचा मूळ हेतू. मोडकळीस आलेली मोटारसायकल, सतत पैशांची चणचण, वेगवेगळ्या ठिकाणी राहण्यासाठी निवारा आणि अन्न मिळवण्यासाठी लोकांपुढं वारंवार पसरावे लागणारे हात आणि त्यातून तगून जाण्याची अनोखी जिद्द याचं मनोज्ञ दर्शन या डायरीतून होतं. त्यातच अर्नेस्टोचा अधेमधे बळावणारा दम्याचा आजार त्यांचा कस पाहत राहतो. या दोघांचा साराच प्रवास तसा कठीण आणि आव्हानात्मक. लॅटिन अमेरिकेतील इंडियन्सची गरिबी त्यांना जगाचं वेगळंच भान आणून देत होती. या आदिवासींचं शोषण त्यांना अस्वस्थ करीत होतं. मोटारसायकल बंद पडल्यावर ती तिथंच सोडून मिळेल त्या वाहनानं, म्हणजे बहुतेक वेळा ट्रकनं त्यांचा प्रवास सुरू राहिला. वाटेतील निसर्गरम्य ठिकाणं हाच त्यातल्या त्यात विरंगुळा. पेरू या देशातील एका निसर्गरम्य ठिकाणाचं अर्नेस्टोनं केलेलं वर्णन त्याच्याच शब्दांत...

The Motorcycle Diaries
Indian Agriculture : या तरुणांनो, परत फिरा रे!

त्या पवित्र तळ्याच्या अथांगतेचा फक्त काही भागच इथूनच दिसत होता. चहूबाजूंनी पाण्यानं वेढलेल्या जमिनीच्या एका लहानशा सुळक्यावर पुनोची खाडी बांधली आहे. तलावातल्या प्रशांत पाण्यात कुठे कुठे वेळूचे माचवे बांधलेले दिसताहेत आणि तलावाच्या मुखातून काही मासेमारीच्या बोटी पुढे जात आहेत. खूपच थंड वारं सुटलं होतं. त्यामुळे धड श्‍वासही घेता येत नव्हता आणि वरचं सुस्तावलेलं आकाश आमच्या मनाची प्रतिकृतीच दाखवत होतं. आम्ही जरी इलाव्हेपाशी न थांबता परस्पर पुनोला आलो असलो आणि आम्हाला तात्पुरतं लॉज आणि चांगलं जेवण मिळालं असलं, तरी आमच्या नशिबानं इथून आमच्यापासून पळच काढलेला दिसतोय.

तिथल्या ऑफिसरनं परदेशी नागरिकांना इथे रात्री अजिबात मुक्काम करता येणार नाही, हे स्पष्टपणे सांगून आम्हाला बाहेरचा रस्ता दाखवला. पण तो तलाव पाहिल्याशिवाय आम्हाला इथून जायची इच्छा नव्हती. म्हणून आम्हाला कोणी बोटीतून घेऊन जाऊन संपूर्ण तलावाचं दर्शन करवून आणेल का हे पाहण्यासाठी घाटावर गेलो. तिथल्या कर्मठ आयमारा मच्छीमारांपैकी कुणालाच स्पॅनिश भाषा अजिबात येत नव्हती, त्यामुळे आम्ही दुभाष्या घेतला. व्यवस्थित पाच सोल्स देऊन आम्हा दोघांना संपूर्ण तलावाची सैर करवून आणण्याचं ठरवून घेतलं.

तलावात पोहावं असंही आम्हाला वाटलं होतं. परंतु करंगळीच्या टोकानं पाण्याला स्पर्श करून पाण्याचं तापमान पाहिल्यावर आम्ही पोहणं रद्द केलं. (पण अल्बर्टोनं आधीच कपडे आणि बूट काढले आणि त्याला काहीही न करता ते परत घालावे लागले, यात त्यानं स्वत:चं फारच गमतीशीर प्रदर्शन करून हसं करून घेतलं.) तलावाच्या हिरव्या-करड्या पृष्ठभागावरून हळूहळू छोटे ढीग दुरून आमच्याकडे सरकत यावेत तसा काही बेटांचा एक पुंजका आमच्यासमोर आला. तिथे काही मच्छीमार राहतात असं आमच्या दुभाष्यानं आम्हाला सांगितलं, “त्यातल्या काहींनी तर कधी गोरा माणूस पाहिलेलाच नाही. आणि ते ५०० वर्षांपूर्वी जसे राहत होते तसेच आजही राहतात, तेच अन्न वर्षांनुवर्षे खातात, आणि तेच ५०० वर्षांपूर्वीचं मासेमारीचं तंत्र वापरतात. त्यांनी त्यांचे रीतीरिवाज, पूजापाठ आणि संस्कृती जिवंत ठेवली आहे.”

The Motorcycle Diaries
Indian Agriculture : सामान्य शेतकऱ्यांनी गुंफली यशमाला

चे गव्हेराच्या मृत्यूनंतर किती तरी दिवसांनी ही डायरी पुस्तकरूपात प्रसिद्ध केली गेली. मधुश्री पब्लिकेशननं हे पुस्तक मराठीत आणलं आहे. डायरी आहे त्या स्वरूपात प्रसिद्ध केल्यामुळं तिच्याच तुटकपणा आला आहे. काही गोष्टींचे संदर्भ लागत नाहीत. बरीच वाक्यं असंबद्ध वाटतात. त्यामुळं वारंवार रसभंग होतो. दैनंदिनी लिहिताना बऱ्याचदा काही गोष्टी गृहीत धरलेल्या असतात. ती प्रसिद्ध करताना या रिकाम्या जागा भराव्या लागतात, अन्यथा वाचकांपुढं सर्वसमावेशक चित्र उभं राहत नाही.

कदाचित चे गव्हेरानं तिच्यावर काही संस्कार केले असते, तर ती अधिक वाचनीय झाली असती. ते न झाल्यानं त्याला समजून घेण्यासाठी इंटरनेटवर मुशाफिरी करावी लागते किंवा यू-ट्यूबवर उपलब्ध असलेला ‘द मोटारसायकल डायरीज’ हा चित्रपट पाहावा लागतो. सन २००४ मध्ये हा स्पॅनिश चित्रपट आला आणि तो गाजलाही! तो पुस्तकापेक्षा अधिक सरस आहे. चे गव्हेरा आणि अल्बर्टो ग्रानाडो यांच्यातील खेळकरपणाचा सही आविष्कार त्यात पाहायला मिळतो.

गेल गार्सिया बर्नाल या दक्षिण अमेरिकन अभिनेत्यानं चे गव्हेराची भूमिका त्याच्यातील पूर्ण ऊर्जेनिशी साकारली आहे. दिग्दर्शक वॉल्टर सालेस यांचं दिग्दर्शन लाभलेल्या या चित्रपटाला एका आॅस्कर पुरस्कारावर आपली नाममुद्रा उमटवता आली. इतरही अनेक मानाचे पुरस्कार त्यानं पटकावले. विशेष म्हणजे एकविसाव्या. शतकाच्या प्रारंभीही दक्षिण अमेरिकेतील देशांची स्थिती ५० वर्षांपूर्वीसारखीच होती, असं दिग्दर्शक वॉल्टर सालेस यांनी आपल्या चित्रीकरणाच्या अनुभवांबद्दल नोंदवून ठेवलं आहे.

या प्रवासानं भारल्या गेलेल्या, राजकीय व्यवस्थेविषयी भ्रमनिरास झालेल्या चे गव्हेराचं पुढं काय झालं हा इतिहास आहे. फिडेल कॅस्ट्रोच्या खांद्याला खांदा लावून त्यानं क्यूबाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. गनिमी लढ्यातला माहीर योद्धा म्हणून त्याला आजही ओळखलं जातं. त्याविषयी त्यानं पुस्तकही लिहिलं. जिवश्‍च कंठश्‍च मित्रांची ही जोडी जगभर प्रसिद्धी पावली. स्वातंत्र्यानंतर कॅस्ट्रोच्या आग्रहानुसार चे गव्हेरा क्यूबाचा गृहमंत्री झाला. तिथल्या केंद्रीय बँकेचं प्रमुखपदही त्यानं सांभाळलं. क्यूबाच्या आरोग्य व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणण्याचं श्रेय त्यालाच दिलं जातं. आजही ही यंत्रणा जगातील अव्वल आरोग्य व्यवस्था म्हणून ओळखली जाते.

प्रशासकीय व्यवस्थेत चे गव्हेराचा जीव फारसा रमला नाही. दक्षिण अमेरिकेतील अन्य देशांच्या स्वातंत्र्यलढ्यांचं आवतन त्याला खुणावत होतं. तो गोपनीय पद्धतीनं बोलिव्हियात पोहोचला. अमेरिकेची सीआयए ही क्रूर गुप्तचर यंत्रणा त्याच्या मागावर होतीच. बोलिव्हियन शिपायांना पुढं करून त्यांनी गव्हेराला पकडलं. दुसऱ्याच दिवशी, म्हणजे ९ आॅक्टोबर १९६७ रोजी त्याला गोळ्या घालून ठार करण्यात आलं. तिथंच त्याचा मृतदेह गाडला गेला. तब्बल ३० वर्षांनंतर त्याच्या मृतदेहाचे अवशेष शोधून सन १९९७ मध्ये ते क्यूबाला नेण्यात आले.

कॅस्ट्रोनं तिथं आपल्या मित्राचं उचित स्मारक उभारलं. जगभरातल्या स्वातंत्र्य, समता, बंधुतेची आस असणाऱ्या तरुणाईचं ते प्रेरणास्थळ बनलं आहे. अनेक देशांतील तरुण, तरुणी आजही चे गव्हेराचं लष्करी वेशातलं चित्र असलेले टी शर्टस्, हॅटस् परिधान करण्यात गौरव मानतात. चे गव्हेरा मरण्यापूर्वी आपल्या मारेकऱ्यांना म्हणाला होता, ‘मला गोळ्या घालू नका. मी चे गव्हेरा आहे. मला मारण्यापेक्षा मी जिवंत असणंच तुमच्यासाठी जास्त मोलाचं आहे.’ पण भित्र्या हुकूमशहांची गोळी निधड्या छातीच्या योद्ध्याला कधी जीवनदान देण्याचं औदार्य दाखवू शकत नाही.

चे गव्हेरा बंडखोर होता. लोककल्याणासाठी त्याचा जीव तीळतीळ तुटत होता. प्रवासातून घडलेला, बदललेला हा तरुण जगाच्या इतिहासाच्या बदलाचा प्रेरक ठरला. प्रत्येक जण क्रांती करू शकत नाही, मात्र स्वतःचा छोटासा भवताल बदलण्याचं सामर्थ्य प्रत्येकाला अंगीकारता येऊ शकतं. त्यासाठी आत्ममग्नतेच्या कोषाबाहेर पडावं लागतं. लोकहो, पावलाला पाऊल जोडलं की प्रवास सुरू होतो. एक पाऊल उचला आणि त्याला दुसऱ्याची जोड द्या. हे अफाट जग आणि त्यातला अमर्याद निसर्ग तुमची वाट पाहतो आहे. प्रवास ही अज्ञाताकडून ज्ञाताकडं नेणारी वाट आहे. ती तुम्हाला समृद्ध करून सोडल्याशिवाय राहणार नाही. मग, वाट कसली पाहताय? चलो, निकल पडो!

..........

(लेखक ‘सकाळ ॲग्रोवन’चे संपादक संचालक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com