Modern Dairy Industry : जगात सर्वाधिक दूध उत्पादनात भारत आघाडीवर असला, तरी प्रति गाय दुग्ध उत्पादनात आपण खूप मागे आहोत. दुग्ध उत्पादन, प्रक्रिया उद्योग आणि व्यवसायाचे स्वरूप या बाबतीत ज्या मोजक्या देशांची नावे घेतली जातात, त्यात डेन्मार्क हा प्रमुख देश आहे. तेथील डेअरी उद्योगातील आधुनिकता आणि व्यावसायिकता पाहण्यासाठी जगभरातून लोक भेट देतात. डेन्मार्क हा डेअरी उद्योगातील तंत्र आणि उत्पादनात अग्रेसर देश आहे.
येथील सौम्य हवामान तसेच वर्षभर समान पद्धतीने पडत असलेला पाऊस अशा नैसर्गिक अनुकूलतेमुळे येथे जातिवंत दुधाळ गाईंचे चांगल्या प्रकारे संगोपन केले जाते. त्यामुळे दूध, लोणी, चीज हे डॅनिश आहाराचा मुख्य भाग आहे. अठराव्या शतकात पशूपालन उद्योगाच्या विकासाला गती मिळाली. लोकसंख्या तसेच राहणीमानाचा दर्जा उंचावणाऱ्या शहरांमधील दुधाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सुरुवातीस आदिवासी भागात दुग्धोत्पादन वाढविण्यात आले. शतकाच्या शेवटी कृषी सुधारणा सुरू झाल्यानंतर शेतकरी त्यामध्ये सहभागी झाले.
सहकारी तत्त्वावर दुग्ध व्यवसाय :
१८८२ मध्ये डेन्मार्कमधील जेटलँड भागातील शेतकऱ्यांच्या गटाने सहकारी तत्त्वावर दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. आधुनिक उपकरणांची खरेदी, कुशल डेअरी व्यावसायिकांची नियुक्ती तसेच उच्च गुणवत्तेच्या उत्पादनांचा पुरवठा यामुळे त्यांना जास्त दर मिळविणे शक्य झाले. शेतकऱ्यांना त्यांच्या दुग्ध पुरवठ्यानुसार नफ्यावर दावा करायचा असल्यास त्या मोबदल्यात त्यांचे संपूर्ण दूध उत्पादन डेअरीला पुरवणे अनिवार्य करण्यात आले. परिणामी, जास्त गाई असलेल्या शेतकऱ्यास जास्त उत्पन्न मिळणार असल्याने स्पर्धात्मक वातावरण तयार झाले.
सहकाराची संकल्पना लवकरच देशभर पसरली. सन १९०० मध्ये डेन्मार्कमध्ये १००० पेक्षा अधिक सहकारी दुग्धशाळा होत्या. कोणत्याही प्रकारच्या केंद्रीय व्यवस्थापन नियंत्रणाशिवाय काही वर्षांतच त्यांनी कृषी उत्पादनात मोठा वाटा उचलण्यात योगदान दिले. डेन्मार्कमध्ये काही खासगी मालकीच्या दुग्धशाळाही आहेत. परंतु जवळपास ९७ टक्के दूध, सहकारी दूध उत्पादक कंपन्यांना पुरवले जाते. दुग्धशाळांमधून देशांतर्गत बाजारपेठेच्या आवश्यकतेपेक्षा जास्त दुग्धोत्पादन तयार केले जाते, म्हणून निर्मितीमधील दोन तृतीयांश दुग्धोत्पादन निर्यात केले जाते. दुग्धोत्पादन निर्यात करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांमध्ये डेन्मार्कचा समावेश आहे.
डेअरी उद्योगसमूहाचा विस्तार :
डेन्मार्कचा कृषी उत्पादन निर्यातीत दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीचा वाटा २० टक्क्यांहून अधिक आहे. डॅनिश डेअरी उद्योगात ‘अर्ला फूड्स’ या आंतरराष्ट्रीय डेअरी समूहासह ३० लहान डेअरी कंपन्या कार्यरत आहेत. एकत्रितपणे डेन्मार्कमधील ६१ उत्पादक कंपन्यांतून ४.७ अब्ज लिटर दुधावर प्रक्रिया केली जाते.
डॅनिश आणि स्वीडिश दूध उत्पादकांच्या सहकारी मालकीचा ‘अर्ला फूड्स’ हा युरोपमधील सर्वांत मोठा डेअरी उद्योगसमूह आहे. हा उद्योग डेन्मार्कमधील ९० टक्के आणि स्वीडनमधील ६० टक्के दुधावर प्रक्रिया करतो. उर्वरित दूध ३० लहान सहकारी व खासगी मालकीच्या डेअरीमध्ये वितरित केले जाते. या लहान दुग्धशाळा सामान्यतः चीज, लोणी आणि दूध प्रक्रिया करतात. त्यांच्या उत्पादनाचा मोठा भाग निर्यातदारांकडून देशाबाहेर पाठविला जातो.
संपूर्ण डॅनिश दूध निर्मितीचे वार्षिक मूल्य १८० कोटी युरो (१६ हजार कोटी रुपये) इतके आहे. देशांतर्गतही मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ उपलब्ध आहे. दूध उत्पादन क्षेत्रांमध्ये प्रचंड संरचनात्मक बदल झाले आहेत. दूध उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञान तसेच संकरित दुधाळ गाईंचे संगोपन केले जाते. देशातील एका अहवालानुसार ४,१०० दूध उत्पादक शेतकऱ्यांकडे प्रत्येकी सरासरी १२७ गाई होत्या. या गाई मुक्तसंचार गोठ्यामध्ये ठेवल्या जातात. डॅनिश उत्पादनाची सर्वांत मोठी बाजारपेठ युरोपीय संघातील देश आहेत.
दुग्धजन्य पदार्थांची उलाढाल :
डेन्मार्क हा ४२,००० चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आणि ५८ लाख लोकसंख्या असलेला देश निर्यातीत अग्रेसर आहे. लोकसंख्या अत्यंत कमी तसेच गरजेपेक्षा अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्यामुळे इतर देशांना ७५ टक्के अन्नधान्याची निर्यात केली जाते. यात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहे.
डेन्मार्कमध्ये सुप्रसिद्ध बटर ब्रँड १९०१ मध्ये तयार झाला. बटरच्या विक्रीला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने देशातील दुग्धशाळांनी गुणवत्ता व नियंत्रण यंत्रणा प्रस्थापित केली. नंतर डॅनिश बटरची निर्यात वाढली. काही काळाने बटर उत्पादनाची जागा चीजने घेतली.
निम्म्याहून अधिक डॅनिश दुधापासून चीज बनवले जाते. त्या खालोखाल दुधाची पावडर, पिण्याचे द्रवरूप दुग्धजन्य पदार्थ आणि लोणी निर्यात केले जाते. आज डॅनिश दुग्धशाळा एकूण १५० देशांमध्ये दुग्धजन्य पदार्थ निर्यात करतात. ही उत्पादने उच्च दर्जा आणि अन्न सुरक्षिततेसाठी ओळखली जातात.
डॅनिश दुग्धशाळेतील गाई दरवर्षी ५.६० अब्ज लिटर दूध देतात. दुग्धोत्पादनाचे लोकसंख्येशी प्रमाण प्रतिव्यक्ती तब्बल १००० लिटर आहे. डॅनिश डेअरी फार्ममध्ये सरासरी २१० ते २५० गाई आहेत. वार्षिक ५.६० अब्ज लिटर दूध उत्पादन आणि २१.१ अब्ज निर्यात उत्पन्न हे आकडे डेअरी उद्योग किती मोठा आहे याची ग्वाही देतात.
डॅनिश डेअरी मंडळ :
युरोपीय महासंघ आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटनांच्या संबंधात व्यावसायिक आणि राजकीय हितसंबंधांचे रक्षण करणे हे डॅनिश डेअरी मंडळाचे मुख्य कार्य आणि जबाबदारी आहे.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अधिकारी आणि संस्थांशी सहकार्य.
सार्वजनिक प्राधिकरणाच्या दिशेने थेट वाटाघाटी आणि सल्लामसलतीच्या अधिकारांचा वापर.
संप्रेषण आणि प्रतिमा निर्मिती प्रक्रिया.
शालेय दूध आणि पोषणासह दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या संयुक्त विक्रीस प्रोत्साहन.
उत्पादनविषयक, पर्यावरणविषयक आणि गुणवत्ताविषयक कायद्यांच्या पालनावर देखरेख.
डेअरी उद्योग संशोधन आणि विकास समन्वय.
दूध आकारणी निधी आणि डेअरी रॅशनलायझेशन फंडाचे प्रशासन.
उद्योगविषयक आकडेवारी तयार करणे.
संचालक मंडळ:
डॅनिश डेअरी मंडळाच्या संचालक मंडळात एकूण सहा सदस्य असतात. व्यवस्थापनाचे परिवेक्षण, धोरणात्मक निर्णय आणि मार्गदर्शक नेतृत्व या मंडळाकडे असते.
मंडळाच्या अनेक समित्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर या मंडळाचे प्रतिनिधी आहेत.
डॅनिश डेअरी मंडळ ही व्यापारी संघटना आहे. एक ज्ञानाधिष्ठित संस्था असून उद्योगाचा विकास करण्यासाठी व्यावसायिक कौशल्ये, सल्लामसलत तसेच क्षमतावृद्धीसाठी महत्त्वाचे साधन आहे.
डॅनिश डेअरी मंडळातर्फे डॅनिशन स्कूल मिल्क योजना (शालेय दुग्ध आहार योजना) हाताळली जाते. तसेच ट्रेडमार्क फाउंडेशन, आर्थिक व प्रशासकीय व्यवस्थापन सांभाळते. हे मंडळ डेन्मार्क शासनाच्या कृषी आणि अन्न परिषदेचा एक भाग आहे. सहकारी आणि खासगी डेअरी उद्योगातील सदस्यांमध्ये समन्वय साधला जातो. राजधानी कोपनहेगन तसेच आर्हस, ब्रुसेल्स येथे मंडळाची कार्यालये आहेत.
हे मंडळ दोन गटांत विभागलेले असून दोन्ही गटांचे सदस्य मंडळाचे प्रतिनिधित्व करतात. पहिल्या गटात सहकारी आणि खासगी दुग्ध व्यावसायिकांचा म्हणजे दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन, वितरण व प्रक्रिया करणाऱ्या व्यावसायिकांचा समावेश होतो. दुसऱ्या गटात दुग्धजन्य पदार्थांची निर्यात आणि आयात करणाऱ्या व्यापारी कंपन्यांचा समावेश होतो. मर्यादित कर्मचारी असलेल्या छोट्या दुग्ध व्यावसायिकांपासून शेकडो कर्मचारी असणाऱ्या मोठया कंपन्या या मंडळाच्या सदस्य आहेत.
डॉ. राजेंद्र सरकाळे, ९८५०५८६२२०
(लेखक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.