

Indian Agriculture : लहानपणी आजीने सांगितलेल्या गोष्टीमध्ये एखादा दुष्ट राक्षस अथवा जादूगार नक्की असे. त्याचे प्राण दूरवर ठेवलेल्या पिंजऱ्यामधील एखाद्या पोपटामध्ये असत. त्या राक्षसाला मारायचे असेल, तर त्या पोपटाला मारावे लागे. ही खरेतर काल्पनिक बालकथा. पण निसर्गातही एखाद्या गोष्टीचा जीव कुठेतरी अन्यत्र असू शकतो.
आपल्या गावातून झुळूझुळू वाहणाऱ्या नदीचे प्राण नेमके कोठे असतात, असा प्रश्न जरा स्वतःला विचारून पाहा.
दूरवर कुठेतरी पडलेल्या पावसात, त्याच्या वाहून येणाऱ्या पाण्यामध्ये की जिथे नदी वाहतेय त्या जागेमध्ये की ज्या वरून ती वाहतेय त्या वाळूमध्ये? पाण्याला आपण जीवन मानतो, तिला देवतेचा दर्जा देतो, पण तिचे प्राण आहेत निर्जीव अशा वाळूमध्ये! नदीचा प्राण असलेली वाळूच आपण नदीपात्रातून काढून घेतो. मग नदी हळूहळू मृत होऊ लागते.
नदी आणि वाळू यांचे हे घनिष्ठ संबंध पाच सहा दशकांपर्यंत अबाधित होते. स्वच्छ वाहणारी नदी आणि तिच्या दोन्हीही तीरांवर रुपेरी चमकणारी वाळू हे दृश्य दिसे. या नदीकाठच्या वाळूमध्ये पाण्याचे झरे असत. जेमतेम एक दीड फूट वाळू काढली तरी त्याखाली शाश्वत गोड पाण्याचा छान झरा दिसे. त्यातून जेवढे पाणी तुम्ही काढाल, तेवढेच तिथे काही वेळात जमा होईल.
वरून नदी आटल्यासारखी दिसली तरी अनेक वेळा महिला वर्ग सकाळीच घागरी आणि पाणी भरण्यासाठी लहान वाटी घेऊन झऱ्यावर जात. वाटीने घागर भरून त्या घराकडे परतत कुठेही एका थेंबाचाही ऱ्हास होत नसे. झऱ्यावरील पाण्याचे व्यवस्थापन आणि त्याचे सर्व श्रेय या महिलांना जाते.
पाण्याचे व्यवस्थापन या महिलाच करू शकतात. या पाण्याच्या प्रत्येक थेंबावर सर्वांचाच अधिकार असे. त्यावर कुणी आपली मालकी दर्शवत नव्हते. गावातील या एक दोन झऱ्यांवरच सर्व जण आळीपाळीने पाणी भरत. पाच- सहा दशकांपूर्वीचा ग्रामीण पाणी व्यवस्थापनाचा हा एक आदर्श होता.
काळ बदलला. नदीपात्रावर अतिक्रमण वाढले. नदीमधील वाळू उपसा वाढत पात्र आकसू लागले. नद्या वाहणे तर केव्हाच बंद झाले होते. पण त्या काठावर असलेल्या झऱ्यांनीही प्राण सोडला होता. आपल्या पुराणामध्ये एक गोष्ट आहे. गोमती नदीकाठी धौम्य ऋषींचा एक आश्रम होता.
एके दिवशी ऋषींनी पहाटेच आपल्या एका शिष्यास नदीचे वाहते पाणी घटामध्ये घेऊन येण्यास सांगितले. ‘‘पात्रात प्रवेश करण्यापूर्वी नदीला वाकून नमस्कार कर. मगच घट भरून घे’’ हे सांगण्यास ते विसरले नाहीत. पहाटेच्या वेळी नदीपात्रात स्नान करून घट भरून घेताना तेथील शांततेमुळे त्या शिष्याला क्षणभर झोप म्हणा की समाधी लागली. त्याला परत येण्यास अंमळ उशीरच झाला.
ऋषी त्याला रागावले नाहीत. सकाळच्या सत्रात विशाल वटवृक्षाखाली धौम्य ऋषींनी सर्व शिष्यांना गोमतीची जन्मकहाणी आणि शिष्याच्या समाधीचे कारण यावर एक कथाच सांगितली. उंचावर उगम पावलेली गोमती जन्मापासूनच रागीट होती. खाली येताना मार्गात येणाऱ्या सर्व लहान मोठ्या खडकांना, दगडांना तिने वेगाने झिडकारून स्वतःचा स्वतंत्र वेग घेतला.
तिला अडवू पाहणाऱ्या, मार्गात येणाऱ्या निर्जीव, सजीवांना तिने कवेत घेतले आणि समुद्राकडे धावत सुटली. समुद्रमिलनानंतर तिने मागे वळून पाहिले, तेव्हा प्रचंड हाहाकार दिसला. कितीतरी मृत्यू, उन्मळून पडलेली झाडे, तरंगणारी प्रेते पाहून ती दुःखी झाली. सृष्टीचा निर्माता असलेल्या ब्रह्मदेवाला शरण गेली.
तिने आपली चूक मान्य करत सांगितले, ‘‘खरेतर मला असे उग्र व्हावयाचे नाही. शांत होऊन शांतच वाहायचे आहे. ब्रह्मदेवाने तिची प्रार्थना ऐकली आणि सांगितले, की तिच्या क्रोधाचे मूळ कारण ‘हव्यास’ हेच आहे. समुद्रास भेटणे हा तुझा हव्यास होता, त्या नादामध्ये मार्गात येणाऱ्या कुणाचीही तू तमा केली नाहीस. जिथे हव्यास असतो, तेथे शांतता नसते. तुला जर शांतता, सुख समृद्धी हवी असेल तर उगमापासूनच
सर्व निसर्ग घटकांचा सन्मान कर. त्यांना बरोबर घेऊन प्रेमाने वाटचाल कर. त्यांच्यावर एवढे प्रेम कर, की ते तुझ्या प्रेमामध्ये विरघळून जातील. यातूनच तुझ्या दोन्हीही तीरांवर सुखसमृद्धी निर्माण होईल. खऱ्या अर्थाने तुझ्या जन्माचे सार्थक होईल.’’ गोमतीने ब्रह्मदेवाची आज्ञा पाळली. सर्व निसर्ग घटकांचा उगमापासूनच सन्मान केला.
खडक, दगड, गोट्यांना वाहत्या प्रवाहात प्रेम दिले. त्या प्रेमात ते विरघळून गेले आणि तिथेच वाळूचा जन्म झाला. या वाळूने गौतमीला तिच्या पुढील प्रवासात शांत केले. तिचे पात्र तिच्या मनाप्रमाणेच विशाल केले. वाळू दोन्हीही तीरांवर पसरली गेली. हजारो जिवांना अन्न आणि संरक्षण मिळाले.
प्रवाह शांत झाल्यामुळे मानवी संस्कृती विकसित झाली आणि सुखसमृद्धी निर्माण झाली. लखनौ शहरांमधून वाहणाऱ्या गोमतीकडे पाहून मला ती कथा आठवली. संपूर्ण शहरास एकेकाळी स्वच्छ पिण्याचे पाणी देणाऱ्या या गंगेसारख्याच पवित्र नदीकडे आज बघवत नाही.
पुराणामधल्या कथेतील तपशील बाजूला ठेवून त्यातून नेमके काय सांगितले आहे, हा आशय तपासल्यास त्याची अर्थपूर्णता लक्षात येते. या वाळू जन्माच्या कथेतील आशयही मोठा आहे. वाळू ही वाहत्या नदीचा खरा प्राण आहे. ती नदीवर नियंत्रण ठेवते.
अनेक जलजीवांना अन्नाबरोबरच संरक्षणसुद्धा देते. म्हणूनच जलजीव सृष्टीचा आधार असलेल्या वाळूला कधीही धक्का लावू नये. हे आपल्याला पाच सहा दशकापूर्वीपर्यंत चांगले समजत होते. मात्र आता घरोघरी पाणी नळाने पोचल्याने वाळूचे महत्त्व आपण विसरून गेलो आहोत.
गरजेप्रमाणे धरणातून पाणी सोडले जात असल्यामुळे नदी वाहती ठेवण्याचे श्रम घेण्यास कोणी तयार नाही. उलट वाळू बांधकामासाठी गरजेची व त्यातून गावाला पैसे मिळत असल्याने तिचा उपसा सुरू झाला. हा पैशाचा व्यवहार असल्यामुळे या व्यवसायात आपोआपच गुंडपुंड शिरले.
त्यातून वाळूमाफिया तयार झाले. त्यांनी नदीच्या पात्रातच आपले ठाण मांडले. पण त्यामुळे नदी थांबली ती कायमचीच. नदी थांबल्याचे दुःख कोण करतो? कारण ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ हीच जगाची रीत.
वाळू कशी महत्त्वाची?
हिमालयाचा बर्फाच्छादित प्रदेश, तिबेटचे पठार येथून उगम पावलेल्या नद्यांना वर्षभर शाश्वत पाण्याचा स्रोत असतो म्हणूनच त्या बारमाही वाहत असतात. पण सह्याद्रीच्या रांगा म्हणजेच पश्चिम घाटामधून उगम पावणाऱ्या सर्व नद्यांचे बारमाही वाहणे हे त्यांच्यामधील वाळूवर अवलंबून आहे.
केरळ, कर्नाटक, मध्य प्रदेशमधील मोठमोठ्या नद्या ज्या वर्षभर वाहत दिसतात, त्या फक्त त्यांच्या पात्रामधील वाळूमुळे. पावसाळ्यात झालेल्या तुफान वृष्टीमध्ये नदीपात्र दुथडी भरून वाहू लागते, यालाच आपण नदीचा पूर म्हणतो. सतत पडणाऱ्या पावसामुळे नदीपात्रामधील पाण्याचे प्रमाण एका मर्यादेबाहेर वाढते. त्यातच वरून मुसळधार पाऊस सुरू असतो, तेव्हा नदीला पूर येतो.
या पुराचे पाणी मातकट असते. जेव्हा पावसाळा संपून हिवाळा, उन्हाळा सुरू होतो, तेव्हा नदी पात्रात मुरलेल्या पावसाचे पाणी पात्रामधील वाळूच्या सूक्ष्म कणांच्या साह्याने केशिका क्रियेच्या तत्त्वानुसार पृष्ठावर येते आणि वाहू लागते. ही क्रिया पुढील पावसाळा सुरू होईपर्यंत अखंड सुरू असते.
गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध भूपृष्ठावर येणारे हे पाणीच नदीला जिवंत ठेवते. हे सर्व साध्य होते ते वाळूच्या सूक्ष्म कणांमुळे, म्हणूनच वाळूला नदीचा प्राण म्हणतात. जेव्हा नदी पात्रामधील वाळूचा उपसा होतो, तेव्हा वाळूची स्पंजाप्रमाणे कार्य करण्याची क्षमताच नष्ट होते. पाणी भूगर्भात मुरत नाही आणि पुराच्या माध्यमातून वाहून जाते.
नदीला येणारा असा पूर जास्त धोकादायक असतो. कारण या पुराला शांत करण्यासाठी तेथे वाळूच नसते. कोकणामधील सर्व नद्या आज याचमुळे पावसाळ्यात उग्र झाल्या आहेत. दोन्हीही किनाऱ्यांवर पसरलेली वाळू नदीचा कोप नियंत्रणात ठेवते. या वाळूमुळे स्थावर मालमत्ता सुरक्षित राहते. त्याच बरोबर प्राणहानीसुद्धा होत नाही.
वाळू निर्माण होण्याच्या प्रक्रियेस शेकडो वर्षे लागतात. ही प्रक्रिया नेहमी उगमापासूनच सुरू होते. नदीपात्रामधील वाळू उपसल्यावर त्या जागी पुन्हा तशीच वाळू निर्माण होणे, तेवढे शक्य नसते. कारण वाळू तयार होण्यासाठी नदीचा प्रवाह वेगवान हवा.
वाळूउपशामुळे पात्रात अनेक लहान मोठे खड्डे तयार होतात. त्यात पाण्याच्या प्रवाहाचा वेग थांबतो. अशा वेळी नदीचे रूपांतर डबक्यांमध्ये होते. अशा अनेक नद्या आज आपणास पाहावयास मिळतात.
त्यातच अशा नद्यांमध्ये गावाचे, शहरांचे घरगुती सांडपाणी अथवा औद्योगिक क्षेत्रातील रसायनयुक्त सांडपाणी प्रवेश करते. तुम्हाला नदीतून पाणी वाहताना दिसले तरी ते पाणी निसर्गनिर्मित नसते. ती असते मानवाच्या प्रदूषणाची करणी...
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.