Savitribai Phule: कृतिशील समाजसेविका

Women Education: एक स्त्री शिकली तर ती संपूर्ण कुटुंब संस्कारीत करते. म्हणून जोतीरावांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाड्यात भारतातील पहिली स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंची नेमणूक केली. येथूनच स्त्री शिक्षणाच्या महान पर्वाला सुरुवात झाली.
Savitribai Phule
Savitribai PhuleAgrowon
Published on
Updated on

सौ. सुरेखा बोऱ्हाडे

Female Empowerment: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले म्हणजे स्त्री शिक्षणाची अग्निशलाका! भारतीय प्रबोधन युगातील पहिल्या प्रशिक्षित शिक्षिका, स्त्री मुक्तीच्या उद्‍गात्या, प्रौढ शिक्षणाच्या पुरस्कर्त्या, दलितांच्या कैवारी, स्वतंत्रता- समता चळवळीच्या प्रणेत्या, अर्वाचीन मराठी कवितेच्या जनक असणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे अलौकिक व्यक्तिमत्त्व! सातारा जिल्ह्यातील नायगाव या लहानशा खेड्यात संपन्न अशा शेतकरी कुटुंबात सावित्रीबाईंचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी झाला.

सावित्रीबाई वडिलांप्रमाणेच नेहमी गोरगरिबांच्या साह्याला धावून जाणारी, तीक्ष्ण बुद्धीची आणि जिज्ञासू अशी होती. सावित्रीबाईंचा विवाह वयाच्या नवव्या वर्षी पुणे येथील तेरा वर्षांच्या जोतीराव गोविंदराव फुले यांच्याबरोबर झाला.

सासर घरी येईपर्यंत सावित्रीबाईंना अक्षर ओळख नव्हती. त्या काळी स्त्रियांना शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती. तरीही जोतिबांच्या इच्छेनुसार आणि स्वबुद्धीने १९४७ मध्ये मिचेलबाईंच्या नॉर्मल स्कूलमध्ये प्रशिक्षित शिक्षिकेचा ट्रेनिंग कोर्स पूर्ण केला. सावित्रीबाई प्रशिक्षित शिक्षिका झाल्या.

एक स्त्री शिकली तर ती संपूर्ण कुटूंब संस्कारीत करते. म्हणून जोतीरावांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडे वाड्यात भारतातील पहिली स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंची नेमणूक केली.

येथूनच स्त्री शिक्षणाच्या महान पर्वाला सुरुवात झाली. सुरुवातीला पाच, सहा मुली होत्या; पण सावित्रीबाईंची मुलींच्या शिक्षणाविषयीची कळकळ आणि कार्यनिष्ठा बघून १८५२ पर्यंत पुणे आणि सातारा परिसरात जवळपास १८ शाळा सुरू झाल्या.

Savitribai Phule
Savitribai Phule : कर्तृत्वाने झाली ती सावित्रीची क्रांतिज्योती

संचालक, मुख्याध्यापिका आणि शिक्षिका असे तिहेरी कर्तव्य त्यांनी कर्मनिष्ठतेने पार पाडले. बहुजन समाजातील एक स्त्री शिक्षण घेऊन मुलींना शिकवते, त्यामुळे तत्कालीन सनातनी वर्गाने सावित्रीबाईंना अनेकानेक प्रकारे त्रास दिला.

सर्व त्रासाला त्या धाडसाने सामोऱ्या गेल्या. सरकारी शाळांपेक्षाही जोतीरावांच्या शाळेमधील मुलींची पटसंख्या दहा पटीने मोठी होती, याचे सर्व श्रेय निश्‍चितच सावित्रीबाईंच्या अध्यापन कार्याला जाते. समाजातील उच्च वर्णीयांबरोबरच अस्पृश्य मुलींसाठीही फुले दांपत्यांनी शाळा सुरू केल्या.

निराश्रितांना आश्रय

सावित्रीबाईंच्या हाताखाली शिकून अनेक विद्यार्थिनी तयार झाल्या. दिव्याने दिवा पेटवावा तसे अनेक सावित्रीच्या ज्योती तयार झाल्या. जोतिबांबरोबरच या सर्व कार्यात सावित्रीबाईंची दूरदृष्टी मोठी होती. अस्पृश्यता, जातिभेद नाहीसा व्हावा यासाठीही सावित्रीबाईंनी शिक्षण प्रसाराच्या कार्याबरोबरच कळकळीने सामाजिक कार्य केले. निराश्रित विधवा, असाह्य स्त्रियांसाठी विधवा आश्रम सुरू केले.

त्याचप्रमाणे फसवल्या गेलेल्या विधवा स्त्रियांसाठी त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. या गृहाला जोडून सूतिका गृह आणि अनाथ बालकाश्रम स्थापन करून समाजाकडून फसवल्या गेलेल्या विधवांची बाळंतपणे सावित्रीबाईंनी आईच्या मायेने केली.

अनेक नवजात मुलांचे संगोपन केले. विधवांचे पुनर्विविवाह घडवून आणले‌. विधवांची केशवपन करण्याची अमानुष प्रथा बंद व्हावी यासाठी जोतिबा-सावित्रींनी न्हाव्यांचा यशस्वी संप घडवून आणला. 

Savitribai Phule
Savitribai Phule : सावित्रीबाईंच्या शिक्षण कार्यास अभिवादन हीच खरी आदरांजली

भुकेल्यांना घास

जोतिबा - सावित्रीबाईंनी विचारपूर्वक विधवा काशीबाईच्या यशवंत या मुलास दत्तक घेतले. पुढे त्यांनी त्याला चांगले शिक्षित करून डॉक्टर बनवले. प्रत्येक कार्यात जोतीरावही त्यांचा सल्ला घेत असत. जोतीरावांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या कार्यातही त्यांनी भरीव योगदान दिले. सत्यशोधक समाजाच्या विचार प्रसारासाठी त्यांनी खेडोपाडी जाऊन भाषणे दिली.

भयंकर दुष्काळाच्या काळात इतर स्त्री सहकाऱ्यांबरोबर त्या रोज दोन हजार भाकरी थापून भुकेल्यांना खाऊ घालत असत. सावित्रीबाई या कृतिशील समाजसेविका होत्या. त्याबरोबरच त्या एक स्वतंत्र प्रतिभा संपन्न अशा साहित्यिक होत्या. त्यांनी ‘काव्य फुले’ हा कवितासंग्रह आणि ‘बावन्नकशी सुबोध रत्नाकर’ हे दीर्घ काव्य लिहिले.

२८ नोव्हेंबर १८९० रोजी जोतीरावांनी या इहलोकीची यात्रा संपवली. नातेवाइकांनी त्यांचा पुत्र यशवंत यांस शेवटचे अंतिम संस्काराचे विधी करण्यास नकार देऊन गोंधळ घातला. तेव्हा आपले दुःख बाजूला सारून सावित्रीबाईं स्वतः यशवंताचा हात धरून प्रेतयात्रेपुढे टिटवे घेऊन चालू लागल्या. जोतिबांच्या पार्थिवाला त्यांनी अग्नी दिला. भारताच्या इतिहासातील ही एकमेव आणि अभूतपूर्व घटना म्हणता येईल.

महात्मा जोतीराव फुले यांनी राष्ट्र विकासाचा उदात्त आणि अतिभव्य हेतू डोळ्यासमोर ठेवून जे कार्य उभारले होते ते  सावित्रीबाईंनी पुढे नेटाने चालू ठेवले. १९९७ मध्ये पुण्यामध्ये प्लेगची भयंकर साथ पसरली. डॉ. यशवंत बरोबर त्या स्वतः रुग्णसेवेत मग्न झाल्या. एका रुग्णाला आपल्या पाठीवर घेऊन त्या दवाखान्यात जाताना या रोगाची लागण होऊन त्यांनी या जगाचा निरोप घेतला. सतत पन्नास वर्षे लोकसेवेचे व्रत स्वीकारून चालणारी ही माय माउली १० मार्च १८९७ रोजी काळाच्या उदरात विसावली. सावित्रीबाई आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वामुळे आणि प्रभावी कर्तृत्वामुळे भारतीय मानव विकासाच्या इतिहासातील सुवर्णपान ठरल्या.

९१५८७७४२४४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com