Onion Price : नाफेडच्या ट्विटमुळे मुख्यमंत्री तोंडघशी; कांदा खरेदीविषयी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलेली माहिती चुकीची

मुख्यमंत्र्यांची ही आकडेवारी दिशाभूल करणारी आहे. नाफेड तीन दिवसांत २.३८ लाख टन कांदा खरेदी करणे कसे शक्य आहे, असा प्रश्न निर्माण होतो.
Chief Minister Eknath Shinde
Chief Minister Eknath ShindeAgrowon

Onion News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी आज (ता. २८) विभानसभेत नाफेडची कांदा खरेदी (onion) सुरू झाल्याचे सांगितले. तसेच नाफेडने २.३८ लाख टन कांदा खरेदी केल्याचा दावा त्यांनी केला.

परंतु प्रत्यक्षात नाफेडने (Nafed) गेल्या तीन दिवसांत फक्त ६३७.३८ टन लाल कांदा खरेदी केल्याची माहिती पुढे आली आहे. नाफेडनेच तसे ट्विट केले आहे. मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला चुकीची माहिती दिल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यावर या ट्विटमुळे शिक्कामोर्तब झाले आहे.

राज्यात सध्या कांद्याचे दर (onion bajarbhav) पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करावी, तसेच नाफेडने कांद्याची खरेदी करावी, अशी मागणी केली जात आहे.

हा मुद्दा आज विधानसभेतही गाजला. विरोधी पक्षनेते अजित पवार, ज्येष्ठ आमदार छगन भुजबळ, नाना पटोले यांनी हा विषय लावून धरला. दोन्ही बाजूच्या सदस्यांनी कांदा उत्पादकांना दिलासा देण्याची मागणी केली.

त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी नाफेडकडून कांदा खरेदी सुरू असल्याचे सांगितले. त्याला विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला.

त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य योग्य असून वस्तुस्थिती तशी नसल्यास विरोधकांनी हक्कभंग आणावा अशा आक्रमक भाषेत प्रतिवाद केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नाफेडची कांदा खरेदी सुरू असल्याचा पुनरूच्चार केला आणि २.३८ लाख टन कांदा खरेदी केल्याचा खुलासा केला.

मुख्यमंत्र्यांची ही आकडेवारी दिशाभूल करणारी आहे. नाफेड तीन दिवसांत २.३८ लाख टन कांदा खरेदी करणे कसे शक्य आहे, असा प्रश्न निर्माण होतो. वास्तविक मुख्यमंत्र्यांनी कांदा खरेदीचा आकडा सांगताना गल्लत केली आहे.

गेल्या रब्बी हंगामात नाफेडने देशपातळीवर केलेल्या खरेदीचा आकडा मुख्यमंत्र्यांनी यंदाची खरेदी म्हणून सांगितला आहे.

दिवाळीनंतर नाफेडने मोठी खरेदी केलेली नाही. नाफेडने गेल्या हंगामात खरेदी केलेला कांदा रब्बीचा होता. आता बाजारात लेट खरिपाचा आणि लाल कांदा आहे. या कांद्याची खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.

Chief Minister Eknath Shinde
Onion Rate : कांदा करणार सरकारचा 'वांदा'; गळ्यात कांद्याच्या माळा घालून विरोधकांचं आंदोलन

या पार्श्वभूमीवर नाफेडने केलेल्या ट्विटमुळे कांदा खरेदीची स्थिती स्पष्ट झालेली आहे. नाफेडने २७ फेब्रुवारीला नाशिक पट्ट्यातील आठ केंद्रांमधून ४२४.३१ टन लाल कांदा खरेदी केला आहे. त्याचा लाभ ११६ शेतकऱ्यांना झाला आहे.

तर गेल्या तीन दिवसांत मिळून एकूण ६३७.८३ टन कांदा नाफेडकडून खरेदी करण्यात आला. त्याचा फायदा एकूण १६८ शेतकऱ्यांना झाला. खरेदीचा वेग वाढवण्यासाठी आणखी केंद्र उघडली जाणार आहेत, असे या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करण्याबद्दलचा निर्णय सरकार जाहीर करेल, असे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेतील भाषणात सांगितले. त्यामुळे आता शेतकऱ्यांना नेमकी किती रक्कम मिळते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com