Livestock Health Management : पशुधनामध्ये रक्त तपासणीचे महत्त्व

Animal Husbandry : आजार निर्माण करणारे रोगजंतू जनावरांच्या शरीरामधील आंतरिक अवयवांमध्ये आणि रक्तामध्ये विशिष्ट बदल घडवितात. शरीरातील या विशिष्ट बदलांना तसेच रोगजंतूंना ओळखून आजारांचे योग्य निदान हे प्रयोगशाळेतील रक्त तपासणीद्वारे करता येते.
Livestock Health
Livestock Health Agrowon
Published on
Updated on

डॉ. एम व्ही खोडके, डॉ. जी. एम. गादेगावकर

Veterinary Care : व्यावसायिक पशुपालन करताना, कमी खर्चामध्ये अधिक नफा मिळविण्याकडे पशुपालकांचा भर असतो. त्यामुळे जनावरांच्या शारीरिक क्षमतेवर ताण येतो. त्यासाठी जनावरांचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. यामध्ये संतुलित आहार, गोठा स्वच्छता आणि विविध आजारांचे सुयोग्य व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. जनावरांना होणाऱ्या विविध आजारांमुळे दूध उत्पादनात घट येते. काही आजारांमध्ये उपचारांवर खर्च करूनही जनावरे दगावतात. त्यामुळे आर्थिक नुकसान होते.

त्यासाठी योग्य वेळी जनावरांमधील विविध आजारांचे योग्य निदान करून योग्य उपचार आणि प्रतिबंध तसेच जैवसुरक्षेचे काटेकोर पालन आणि लसीकरण अत्यंत गरजेचे आहे. रोगनिदानामध्ये प्रयोगशाळेतील रक्त तपासणीला खूप महत्त्व आहे. आजार निर्माण करणारे रोगजंतू जनावरांच्या शरीरामधील आंतरिक अवयवांमध्ये आणि रक्तामध्ये विशिष्ट बदल घडवितात.

शरीरातील या विशिष्ट बदलांना तसेच रोगजंतूंना ओळखून आजारांचे योग्य निदान हे प्रयोगशाळेतील रक्त तपासणीद्वारे करता येते. रक्तातील विविध घटकांचे मापन व परीक्षण करून विविध आजारांचे निदान करता येते. अचूक निदान झाल्यामुळे आजारी जनावरांवर योग्य उपचार करणे शक्य होते. तसेच कळपातील निरोगी जनावरांना बाधित जनावरामुळे आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधक उपाय करता येतात. आणि उपचारावर विनाकारण होणारा अतिरिक्त खर्चाची बचत होते.

आजारांची बाधा झाल्यावर होणारा उपचारावरील खर्च हा अधिक असतो. लहान पशुपालकांना हा खर्च आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसतो. अशावेळी अयोग्य निदान करून अयोग्य उपचार करणे जनावराच्या आरोग्यासाठी घातक ठरतेच शिवाय आर्थिक नुकसान देखील होते. त्यासाठी आजाराची वेळीच माहिती होण्यासाठी योग्यवेळी योग्य आजाराचे निदान होणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून पुढील संभाव्य नुकसान टाळले जाईल. त्यासाठी रक्ततपासणी अत्यंत महत्त्वाची ठरते.

Livestock Health
Animal Health : पावसाळ्यात जनावरांना होणारे संसर्गजन्य आजार

प्रयोगशाळेत रक्त तपासणी काचपट्टीद्वारे रक्त परीक्षण

या रक्त तपासणीमध्ये रक्ताचा एक थेंब काचपट्टीवर घेऊन त्यात विशिष्ट रंगद्रव्य मिसळून त्या काचपट्टीचे सूक्ष्मदर्शकाखाली परीक्षण केले जाते. यामध्ये तांबड्या पेशींचे प्रमाण, पेशींचे आकारमान व त्यातील हिमोग्लोबिनचे प्रमाण पाहून रक्ताक्षयाचे निदान केले जाऊ शकते. तसेच रक्तातील विविध पांढऱ्या पेशींची टक्केवारी काढून आजारास कारणीभूत रोगजंतूंचा अंदाज बांधता येतो. यामध्ये विषाणूजन्य आजार, ॲलर्जी, परजीवीमुळे होणारे आजार तसेच काही रोगजंतू प्रत्यक्ष रक्तामध्ये बघून आजाराचे अचूक निदान करता येते. या परीक्षणाद्वारे विशेषतः संकरित गाईंमध्ये आढळणारे विविध प्रकारचे गोचीड, ताप उदा. थायलेरिओसिस, बाबेसिओसिस, ॲनाप्लाजमोसिस, घटसर्प इत्यादी रोगांचे अचूक निदान केले जाऊ शकते.

संपूर्ण रक्तपरीक्षण

या रक्त तपासणीमध्ये पशुवैद्यक जनावरांच्या शरीरातील साधारण ८ ते १० मिलि रक्त काढून विविध घटकांचे मापन करून योग्य निदान केले जाते. यात जिवाणूजन्य, विषाणूजन्य आजार, ॲलर्जी किंवा परजीवीमुळे होणारे आजार, रक्ताक्षय तसेच रक्ताचा कर्करोग इत्यादी आजारांचे निदान होऊ शकते.

या परीक्षण पद्धतीमध्ये रक्तातील विविध घटकांचे मापन केले जाते. तांबड्या पेशींची संख्या, त्यांची घनता व हिमोग्लोबिनचे प्रमाण मोजून जनावरास रक्ताक्षय असल्याचे निदान केले जाऊ शकते.

पांढऱ्या पेशींची एकूण संख्या व विविध पाच प्रकारच्या पांढऱ्या पेशींची टक्केवारी मोजून झालेला आजार हा विषाणू, जिवाणू, परजीवी की ॲलर्जीमुळे झाला आहे याचे निदान करता येते. तसेच संपूर्ण रक्ततपासणीद्वारे आजाराची तीव्रता आणि आजाराचे स्वरूप ओळखता येते.

जनावरांच्या पोटातील टोकदार वस्तू जसे की तार, सुई, खिळा इत्यादी तसेच रक्तातील कर्करोगाचे अचूक निदान संपूर्ण रक्त परीक्षणाद्वारे शक्य आहे.

Livestock Health
Animal Care : पुण्यातील विभागीय पशुधन रोगनिदान प्रयोगशाळेचे नगरला स्थलांतर होणार

रक्तद्रव्याची तपासणी

या तपासणीमध्ये जनावरांच्या मानेतील शिरेमधून रक्त काढले जाते. काढलेले रक्त बाटलीमध्ये गोठू दिले जाते. यामध्ये प्रामुख्याने रक्तातील लोह, तांबे, कॅल्शिअम, फॉस्फरस, सोडिअम इत्यादी क्षारांचे प्रमाण, रक्तातील एकूण प्रथिने, रक्तातील कावीळ, रक्तात जमा होणारे वाईट नत्रजन्य पदार्थ इत्यादी प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. आणि त्यानंतर आजाराचे योग्य निदान केले जाते.

रक्तद्रव्याची तपासणीमध्ये पोषकघटकांच्या कमतरतेमुळे होणारे आजार, यकृताच्या बिघाडामुळे होणारे आजार, मूत्रपिंडाच्या बिघाडामुळे होणारे आजार आणि चयापचयाच्या बिघाडामुळे होणारे आजार इत्यादी आजारांचे निदान अचूकपणे करता येते.

विविध जुनाट आजारांमध्ये शस्त्रक्रियेपूर्वी आणि शस्त्रक्रियेनंतर तसेच जनावरांची शारीरिक स्थिती खराब होत असेल तर रक्तातील विविध घटकांची तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

पाळीव जनावरांचा मानवी समूहाशी थेट संबंध असल्यामुळे दूध, अंडी, मांस इत्यादी पदार्थातून वापरलेल्या औषधाचा अंश मानवी शरीरात जात असल्यामुळे त्यांच्या शरीरात अशा औषधांचे परिणाम दिसून येतात. हे होऊ नये म्हणून पाळीव जनावरांचे योग्य निदान करूनच त्यांच्यावर उपचार करावेत.

अधिक संख्येत जनावरे असणाऱ्या जनावरांच्या ठराविक काळामध्ये त्यांच्या आरोग्य चाचण्या महत्त्वाच्या आहेत. प्रयोगशाळेत टीबी, जेडी, ब्रुसेलोसिस, लेप्टोस्पायरोसिस, व्हायरल डायरिया इत्यादी आजारासाठी चाचण्या केल्या जातात.

ब्रुसेलोसिस

हा जिवाणूपासून होणारा संसर्गजन्य आजार आहे. साधारण ५ ते ७ महिन्यांच्या गाभण काळात गाभण जनावरामध्ये या आजारामुळे गर्भपात होण्याची शक्यता असते. या आजाराचे देखील रक्ततपासणी नंतर निदान केले जाते.

दुग्धज्वर

जनावर व्यायल्यानंतर शरीरात कॅल्शिअमची कमतरता असल्यामुळे हा आजार होतो. यामध्ये आजारी जनावरांच्या पायाचे स्नायू थरथरतात, जनावर पटकन खाली पडते. अशी लक्षणे आढळल्यास प्रयोगशाळेत रक्तजल तपासणी करतात. या चाचणीतून शरीरातील कॅल्शिअमची पातळी समजते.

लाल लघवीचा आजार

जास्त दूध देणाऱ्या म्हशी व्यायल्यानंतर व प्रसूती पश्चात हा आजार होतो. हा आजार, रक्तात फॉस्फरसच्या कमरतेमुळे दिसून येतो. या आजाराचे निदान करण्यासाठी रक्तजलाची चाचणी केली जाते. यकृत आणि मूत्रपिंडातील दोष ओळखण्यासाठी प्रयोगशाळेत एस.जी.पी.टी., एस.जी.ओ.टी., युरिया, क्रियाटिनीन या सारख्या तपासण्या रक्तजल वापरून करतात. रक्तातील कॅल्शिअम, फॉस्फरस आणि मॅग्नेशिअम पातळीमध्ये बदल झाल्यामुळे चयापचयाचे आजार होतात. यासाठी रक्तजल वापरून विविध चाचण्या करून रोगाचे निदान होऊ शकते.

रक्ताचा कर्करोग

रक्ताची चाचणी करून रक्ताचा कर्करोग या आजाराचे निदान करता येते.

रक्ताच्या चाचणीचे फायदे :

जनावराला आजाराची बाधा होण्यामागील विशिष्ट कारण रक्त तपासणी केल्यानंतर समजून येते. जनावराच्या शरीरात नेमक्या कोणत्या रोगजंतूंचा संसर्ग झाला आहे याचे निदान करता येते. जनावरे कोणत्या प्रकारच्या प्रति जैविकाला प्रतिसाद देतात याचेही निदान होऊ शकते. जनावरांच्या शरीरात कोणतीही इजा झाली असता, शरीरातील रक्तामधील घटकामध्ये बदल होतात. हे विशिष्ट बदल ओळखून विविध आजारांचे निदान करणे शक्य असते. या माध्यमातून जनावरांवर औषधांच्या वापरामुळे होणारे वाईट परिणाम व खर्च टाळता येतात.

डॉ. एम. व्ही. खोडके ९८५०७३६६५३

(पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com