Rural Healthcare: ग्रामीण आरोग्योपचारातील खाचखळगे आणि वाट

Women’s health in Villages: गावातील आरोग्यसेवा, विशेषतः स्त्रियांसाठी, अनेकदा उपेक्षित राहते. मात्र, शुभांगीताईंनी या वास्तवाला भिडत महिलांमध्ये आरोग्याविषयी संवाद सुरू करून ग्रामीण भागात एक नवसंजीवनी रुजवली आहे.
Drushti Aryogyakrantichi Book
Drushti Aryogyakrantichi BookAgrowon
Published on
Updated on

Rural Health Challenges: एकंदरीत अहंकारी दांपत्य, ग्रामस्थांची आरोग्याविषयीची उदासीनता आणि उपेक्षा यांमुळे अनेकांगी जटिल समस्यांना सामोरं जात होतं. ते पाहून शुभांगी यांनी स्त्री आरोग्याची दिशा बदलण्यासाठी स्वत: पुढाकार घेत प्रयत्न सुरू केले. त्या दर बुधवारी आसपासच्या गल्ल्यांमध्ये जाऊन बायकांशी बोलू लागल्या.

घरात किंवा घराच्या गच्चीवर बायकांशी चर्चा करू लागल्या. त्यातून बदल घडत गेला. बायका तपासून घेण्यासाठी आवर्जून दवाखान्यात येऊ लागल्या. तपासून इलाज करण्याची कल्पना रुजू लागली,

शुभांगी आणि शशिकांत अहंकारी दांपत्याने १९८२ मध्ये अणदूरमध्ये काम करायला सुरुवात केली. त्या वेळी गावात बालविवाह सर्रास होत असत. (अजूनही सुरू आहेत.) वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षी, सातवी-आठवी पास होणाऱ्या, वयात येणाऱ्या मुलीचं लग्न करायचं नाही तर ‘मग काय करायचं?’ हा प्रश्‍नही पालकांना सतावत असे.

लग्न होऊन नवी नवरी घरी आली, की गोंधळ, जागरण, देवदेव. सत्यनारायण आणि गोडाचे जेवण यात आठ-दहा दिवस जातात. मग सगळं घर सुनेला न्याहाळत असतं. सासू-नणंदा मात्र तिची पाळी कधी चुकते याची वाट बघत असतात. लग्नानंतर पाळी आलीच नाही, तर त्यांच्या मनात संशयपिशाच्च थैमान घालतं.

लवकर मूल झालं नाही तर मांत्रिक, ज्योतिषी, पंचांग आणि नवस असे मार्ग अवलंबले जायचे. (आजही तीच तऱ्हा आहे.) मुलं न होणाऱ्या जोडप्यातील पुरुष तपासणीला क्वचितच तयार होतात. समाज मात्र मूल न होणाऱ्या बाईला वांझ ठरवून तिला अस्पृश्यासारखी वागणूक देतो.

शुभांगी यांना अशा प्रसंगी, ‘प्रत्येक जोडपं आणि त्यांच्या पुनरुत्पादन क्षमता वेगळ्या असतात’ हे स्वतःची लेकरं असणाऱ्या सासवा आणि नणंदा यांना ठामपणे सांगितलं पाहिजे असं वाटायचं. त्या रुग्ण बायकांच्या सासू, नणंदा आणि नवरे यांना एकत्र बोलावून सर्व गोष्टी सचित्र समजावून द्यायच्या.

Drushti Aryogyakrantichi Book
Rural Story: मातीशी एकरूप झालेलं गाव...

एकदा काही मंडळी बॅण्डसह वाजत-गाजत अहंकारींच्या घरासमोरून जात होती. शुभांगींनी कुतूहलानं एका बाईला विचारलं, ‘‘आता तर लग्नसराई नाही. मग ही वरात कुठून आली?’

तिनं सांगितलं, ‘‘हा चोळीचा कार्यक्रम आहे. त्याची अशीच गाजतवाजत मिरवणूक काढतात इकडं.’’

पुरुषानं बाईला गरोदर केलं, याचा पुरुषार्थ मिरविण्याची ही शोभायात्रा!

त्या वाजत-गाजत चाललेल्या मंडळींसह ती पहिलीटकरीण मिळालेला आहेर मिरवत सातव्या महिन्यात माहेरी रवाना झाली होती. पण दुसऱ्याच दिवशी ती मुलगी अहंकारीच्या दवाखान्यात दाखल झाली. तोंडाला फेस आलेला, शुद्ध हरपलेली, सात महिन्यांचं बाळ पोटात असताना तिच्या पायांवर, पोटावर आणि चेहऱ्यावर खूप सूज होती. रक्तदाब वाढलेला होता. सोबतीच्या बायकांची रडारड सुरू झाली. ‘सुज्ञान! सुज्ञान!’ असा तिच्या नावाने टाहो सुरू झाला.

ती घटना पाहून शुभांगी यांचं मन अस्वस्थ झालं. ‘कर्ज काढून चोळीचा कार्यक्रम करायचा. मात्र पोरीच्या शारीरिक तपासणीची गरजच वाटत नाही. लोकांकडे, ‘वेळ नाही’ किंवा ‘पैसे नाहीत’ अशा सबबी असतात. अशा प्रसंगी कोणालाही एकाच वेळी संताप आणि कीव येणं स्वाभाविक आहे. त्यांनी सर्वांना दटावून शांत केलं आणि उपचार सुरू केले. काही वेळानं सुज्ञान बाळंत झाली. बाळ कमी वजनाचं, अशक्त होतं. त्यामुळे ते वाचेल, की नाही, ते सांगता येत नव्हतं. पण लोकांना बाळापेक्षा सुज्ञानची काळजी अधिक होती. दुसऱ्या दिवशी सुज्ञान बरी झाली. पोर वाचली, याचा सुज्ञानच्या घरच्यांना केवढा आनंद! बाई वाचली, तर पुढे पोरं होतीलच, हे त्यामागचं कारण.

शुभांगी, पुढे सर्व पहिलिटकरणींना ‘सुज्ञानचं अज्ञान’ ही बोधप्रद गोष्टसांगू लागल्या. बाळंतपणात पायांवरची सूज हा पहिला धोक्याचा इशारा समजला पाहिजे. परंतु गावातील अनुभवी, म्हाताऱ्या बायका म्हणायच्या, ‘गरोदरपणात सर्वांच्याच पायांना सूज येते. त्यासाठी दवाखान्यात कशाला जायचं?’ पण घोट्याच्या वर किंवा नडगी पोटावर सूज असल्यास ती वाढलेल्या रक्तदाबामुळे असू शकते, असं शुभांगी सर्व महिला रुग्णांना सांगू लागल्या.

Drushti Aryogyakrantichi Book
Rural Life Story : अमृतवेळा

काही महिला पाळी आली नाही म्हणून रुग्णालयात येत. शुभांगी त्यांना सांगायच्या, ‘पोटात गर्भ आहे. म्हणून पाळी येत नाहीए. गर्भपात केल्याशिवाय पाळी कशी येणार? गर्भपात गोळ्यांनी होत नाही. (त्या काळी गर्भपाताच्या गोळ्या निघाल्या नव्हत्या.) तो गर्भाशयाची पिशवी साफ करून (क्युरेटिंग) काढावा लागतो.’

पण ते काही बायकांना पटत नसे. त्यांचा गोळ्यांसाठी किंवा इंजेक्शनसाठी आग्रह असायचाच. बरेच जण झाडपाल्याचं औषध, वाटलेल्या लिंबाच्या बिया किंवा पपई खाऊन गर्भपाताचे प्रयोग करायचे. तर कोणी अॅस्पिरिन किंवा क्लोरोक्तीच्या गोळ्या घेऊन गर्भ काढून टाकण्याचे प्रयत्न करत. त्यामुळे डॉक्टरांना रुग्णाची सविस्तर माहिती (केस हिस्टरी) घेणं अवघड होत असे. प्रश्‍नांना सरळ उत्तर मिळत नसे. शुभांगी यांना रुग्णाला बरेच आडवेतिडवे प्रश्‍न विचारल्यावर वास्तव समजायचं. लोकांना तेही जड जायचं, परंतु त्याचा उपयोग होत असे. हळूहळू त्यांना गावागावांतील रुग्णांची बारीकसारीक माहिती तोंडपाठ झाली. त्यांना त्यांची दुःखं समजू लागली.

बायकांच्या बाबतीत उपवास, वार आणि व्रतवैकल्ये भरपूर असतात. घरात सर्वांची जेवण झाल्यावर शेवटी उरलंसुरलं, शिळंपाकं खावं लागे. त्यामुळे गावात रक्तक्षयाचे (अॅनिमिया) रुग्ण घराघरांत असत. ते पाहून शुभांगी आहाराविषयक सल्ले देऊ लागल्या. त्या त्यांना पालेभाज्या, मोड आलेल्या कडधान्यांच्या उसळी, दूध, केळी, घट्ट वरण आणि शेंगदाण्याचे लाडू खाण्याचा आग्रह करू लागल्या. ते ऐकून बायका म्हणत, ‘‘आम्ही सासूरवाशीण! कोण देतंय आम्हाला इतकं सगळं? आमच्याकडे तर चहा, साखरसुद्धा कुलपात ठेवतात.’’ गावातील बायकांना कोणत्या दिव्यातून जावं लागतं, हे शुभांगी यांना दरवेळी नव्याने समजत होतं.

गरोदरपणा आणि बाळंतपण ही सहन, नैसर्गिक बाब म्हणून पाहिली जायची. बायकांना मायांग (योनी) तपासण्याची गरज सांगितली, की त्या कावऱ्याबावऱ्या होत. त्या विचारत, ‘‘हे काय भलतंच? आम्ही बाळंतीणसुद्धा एकट्यानं होतो आणि तुम्ही असं म्हणता? आम्ही आजवर कधी असं तपासून घेतलं नाही.’’

त्यावर शुभांगी सांगत, ‘‘खोकला आला तर छाती तपासतात. पोट दुखल्यास पोट तपासावं लागतं. जिथं दुखतं तो अवयव नको का तपासायला?’’ त्यावर काही जणी न तपासताच दवाखान्यातून निघून जायच्या. काही म्हणायच्या, ‘‘नको गं बाई असलं! होईल काही दिवसांत दुखणं कमी.”

एकंदरीत अहंकारी दांपत्य, ग्रामस्थांची आरोग्याविषयीची उदासीनता आणि उपेक्षा यांमुळे अनेकांगी जटिल समस्यांना सामोरं जात होतं. ते पाहून शुभांगी यांनी स्त्री आरोग्याची दिशा बदलण्यासाठी स्वत: पुढाकार घेत प्रयत्न सुरू केले. त्या दर बुधवारी आसपासच्या गल्ल्यांमध्ये जाऊन बायकांशी बोलू लागल्या. घरात किंवा घराच्या गच्चीवर बायकांशी चर्चा करू लागल्या. त्यातून बदल घडत गेला. बायका तपासून घेण्यासाठी आवर्जून दवाखान्यात येऊ लागल्या. तपासून इलाज करण्याची कल्पना रुजू लागली, पांढरा पदर, लाल पदर, चुकलेली पाळी, ओटीपोटदुखी यासाठी बायका आल्या, की शुभांगी यांना त्यांचा ‘इतिहास’ समजू लागला.

गावातला औषधविक्रेता अहंकारी दांपत्य गावात येण्यापूर्वी, दुकान बंद ठेवून शेतावर काम करायला जायचा. आता अहंकारी यांच्या प्रिस्क्रिप्शन्समुळे ते दुकान चालू लागलं.

बरेच तोतया डॉक्टर (आर. एम. पी.) गावोगाव हिंडून भरपूर कमाई करत. ते रुग्ण शहरात पाठवून त्या कामाचं ‘कमिशन’ घेत. अहंकारी दांपत्याने आरोग्य क्षेत्रातील तशा बाजाराला कधीच पाठीशी घातलं नाही. तसंच त्यांच्या दडपणाला ते बधले नाहीत. तेव्हा तोतया डॉक्टरांची ती टोळी अहंकारी दांपत्याविषयी वेगवेगळ्या अफवा पसरवायची. शासकीय डॉक्टरांना खासगी कमाई करून देणारे रुग्णही कमी झाले होते. त्यामुळे तेदेखील त्या कटात सामील व्हायचे. अहंकारी दांपत्याला त्या सर्वांचा त्रास सहन करावा लागत असे. मात्र त्या दोघांनी त्यांचा ‘एकला मार्ग’ सुरूच ठेवला. ते दोघे सचोटीनं रुग्णांवर उपचार करायचे.

रुग्णांना हॉस्पिटल किंवा इतर डॉक्टर सुचवायचे, तेव्हा त्यांची आर्थिक लुबाडणूक होऊ नये याची ते काळजी घेत असत. त्यांच्या या विचार आणि कृतीमुळे ‘कट प्रॅक्टिस’ करणाऱ्या इतर डॉक्टरांचा ‘धंदा’ बसू लागला. त्यामुळे शशिकांत आणि शुभांगी यांना अधूनमधून धमक्या येऊ लागल्या. काही जणांना, ‘कधीतरी हा डॉक्टर कशात तरी अडकेल, तेव्हा बघून घेऊ’ अशी आस होती. तरीही अहंकारी दांपत्य, त्या विरोधकांच्या अडचणीच्या प्रसंगी सर्व काही विसरून, काही झालंच नाही अशा रीतीने उपचार करत.

(‘साधना प्रकाशना’कडून प्रकाशित होत असलेल्या ‘शशिकांत अहंकारी : दृष्टी आरोग्यक्रांतीची’मधील काही अंश.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com