Goat And Sheep Market : महाराष्‍ट्रासह परराज्यातही प्रसिद्ध पेठ वडगावचा शेळी मेंढी बाजार

Peth Vadgaon Goat Sheep Market : पेठवडगाव (जि. कोल्हापूर) येथील जनावरांचा व प्रामुख्याने शेळ्या-मेंढ्यांचा दर सोमवारी भरणारा बाजार प्रसिद्ध आहे. अनेक वर्षांची परंपरा जपलेल्या या बाजारात विविध जातींच्या, जातिवंत व खात्रीशीर जनावरांची विविधता पाहण्यास मिळते.
Goat And Sheep Market
Goat And Sheep MarketAgrowon
Published on
Updated on

राजकुमार चौगुले

Goat And Sheep Rearing : पेठवडगाव (जि. कोल्हापूर) येथील जनावरांचा व प्रामुख्याने शेळ्या-मेंढ्यांचा दर सोमवारी भरणारा बाजार प्रसिद्ध आहे. अनेक वर्षांची परंपरा जपलेल्या या बाजारात विविध जातींच्या, जातिवंत व खात्रीशीर जनावरांची विविधता पाहण्यास मिळते. स्थानिक जिल्ह्यांसह परराज्यातूनही शेतकरी व व्यापारी आवर्जून हजेरी व गर्दी येथे नेहमीच पाहण्यास मिळते.

कोल्हापूर शहरापासून सुमारे पंधरा किलोमीटवर पेठवडगाव (ता. हातकणंगले) शहर आहे.
येथील पेठवडगाव शेती उत्पन्न बाजार समितीतर्फे दर सोमवारी जनावरांचा बाजार भरतो. सन १९७८ मध्ये सुरवात झालेल्या या बाजाराने तेव्हापासून आपला बाज ठेवताना दुष्‍काळी व बागायती भागाला जोडण्याचे काम केले आहे. शेतकऱ्यांचा या बाजाराशी स्नेह निर्माण झाला आहे. गाय, म्हैस, बैल आदी जनावरे येथे विक्रीस येतातच. पण खात्रीशीर शेळ्या- मेंढ्यांचा स्वतंत्र बाजार आहे. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सोलापूर, सातारा आदी जिल्ह्यांसह कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा या राज्यातील शेतकरी, व्यापारी येथे आवर्जून हजेरी लावत असतात. बाजारसमितीचे अध्यक्ष म्हणून सुरेश पाटील यांच्याकडे जबाबदारी आहे.

बाजाराचे स्वरूप

सकाळी सहालाच बाजार सुरू होतो. तो साडेअकरा पर्यंत चालतो. साहजिकच भल्या पहाटेच झुंजूमुंजू वातावरणात बाजारसमितीची यंत्रणा कामाला लागलेली असते. बाजारात वेळेवर पोचण्यासाठी भल्या पहाटेच वाहने विविध ठिकाणाहून निघालेली असतात. वाहनात खालील भागात शेळ्‍या- मेंढ्या तर वरच्या भागात फळ्‍यांवर शेतकऱ्यांना बसण्याची सोय केलेली असते. बाजार समितीत प्रति जनावर
तीन रुपये प्रवेशशुल्क असते. सहा ते साडेअकरा या थोड्या कालावधीत खरेदी विक्री करणाऱ्यांची एकच झुंबड उडते. एकेक व्यापारी शेकड्याने शेळ्या- मेंढ्या घेऊन येतो. सोबत मटण विक्रेतेही असतात.

मागणी, विक्री, उलाढाल

दिवाळीनंतर मे महिन्यापर्यंत विविध भागात जत्रा- यात्रा, जुलैमध्ये आखाडी काळ असतो.
असा सर्व कालखंड बाजारासाठी महत्त्वाचे आणि सर्वाधिक गर्दीचे असतात. वजन आणि नग अशा दोन्ही पद्धतीने विक्री होते. जाणकार वा कुशल ग्राहक शेतकरी शेळी, मेंढी उचलून वजनाचा अंदाज घेतात. प्रति शेळी वा मेंढीस पाचहजारांपासून ते २० ते २५ हजार रुपयांपर्यंत दर मिळतो. वजनावर हा दर प्रति किलो ५०० ते ५५० रुपयांपर्यंत असतो. वर्षाला येथे चार ते पाच कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होते. गेल्यावर्षी सुमारे दोन लाख १८ हजार रुपयांचे उत्पन्न बाजार समितीला मिळाले. गेल्या महिनाभरात अनेक गावांतील यात्रांमुळे बाजारपेठेत तेजी अनुभवायला मिळाली. ईदच्या दरम्यान शेळ्या- मेंढ्यांची उच्चांकी ३२०५ आवक झाली. पैकी पाच तासात तब्बल १००७ जनावरांची
विक्री झाली. दहा जुलैच्या बाजारात २५८० पर्यंत आवक तर १२०४ संख्येने विक्री झाली. प्रति बकऱ्‍याची किंमत ५ ते २५ हजार
रुपयांच्या आसपास असते. बाजार समितीकडून
दहा हजार रुपयांच्या शेळी-मेंढीसाठी १०५ रुपये सेस आकारला जातो. यातील १०० रुपये बाजार समितीला मिळतात. पाच रुपये शासनास कर दिला जातो.

Goat And Sheep Market
Goat-Sheep Farming Project : शेळी-मेंढी समूह प्रकल्पासाठी पारनेरमधील ढवळपुरीची निवड

बाजारातील सुविधा

-पश्चिम महाराष्ट्रातील नावाजलेला बाजार अशी ओळख असल्याने येथे अनेकदा चोरी केलेली जनावरे विक्रीस येतात. अत्यंत कमी दराने विक्री करुण पलायनाचा प्रयत्न होतो. अशा प्रकारांवर बाजार प्रशासनाची करडी नजर असते. जागरूक ग्राहकाने तक्रार केल्यास प्रशासनाच्या वतीने गुन्हा नोंदवला जातो. ज्यांची शेळी- मेंढी चोरीस गेली आहे त्या मालकानेच ती ओळखून चोरी उघडकीस आणल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
-बाजाराचा कालावधी सकाळचा व कमी कालावधीतील असल्याने दूरच्या अंतरावरील लोकांना वेळेवर पोचणे अनेकवेळा शक्य होत नाही. अशावेळी सोलापूर, पंढरपूर, नगर भागातील शेतकरी, व्यापारी आदल्या दिवशी म्हणजे रविवारी मुक्‍कामी येतात. त्यांच्या निवासाची निःशुल्क सोय बाजारसमितीने केली आहे.
-आवारात खाद्याचे स्‍टॉल्‍स अल्प भाडेशुल्कात बाजार समितीच्या परवानगीने उभारण्यात येतात.
-जनावरांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शनासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची उपलब्धता प्रशासनाच्या वतीने करण्यात येते.

Goat And Sheep Market
Madgayal Sheep Rearing : मांस उत्पादनासाठी माडग्याळ मेंढी

या शेळ्या- मेंढ्यांची मागणी

बाजारात उस्मानाबादी शेळ्यांची आवक तुलनेत अधिक असते. या शेळ्यांना शेतकऱ्यांसह
मटण विक्रेत्यांकडूनही मागणी असते. प्रति शेळी सातहजार ते २० हजार रुपयापर्यंत किंमत असते. सोलापूर, सांगली भागातून माडग्याळ तर कोल्हापूरच्या पश्चिम भागातून डेक्कन जातीच्या मेंढ्या विक्रीस येतात. माडग्याळच्या मेंढीस नगास आकारमाना नुसार दहहजारांपासून ते ५० हजार रुपयापर्यंतही किंमत मिळते. उत्तर भारतातील ‘ब्रीड’ असलेल्या बीटल्स, सिरोही आदी शेळ्या विशेष करून ‘गोट फार्म’ मधून येतात. आकर्षक दिसण्यामुळे त्यांना ईदच्‍या मार्केटसाठी अधिक मागणी असते. ‘उस्मानाबादी’ पेक्षा त्यांची किंमत पंधरा ते वीस टक्यांनी अधिक असते. कोल्हापूरच्या पश्चिम भागातून कोकण कन्‍या या अति पावसात तग धरुन असणाऱ्या शेळीची मागणी असते. ५०० ते ६०० रुपये प्रति किलो दरम्‍यान त्यांची विक्री होते. नामवंत जातींच्या जनावरांचे संगोपन करणारेही बाजारात नियमितपणे दिसतात.


केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर परराज्यातील शेतकरी, विक्रेत्यांसाठी आमची बाजारसमिती महत्त्वपूर्ण ठरली आहे. प्रत्येक बाजारात मागणीचा अंदाज घेऊन पुढील बाजारात तशी उपलब्धता करण्याचा प्रयत्न असतो.
जितेंद्र शिंदे, सचिव
पेठवडगाव शेती उत्पन्न बाजार समिती
८१४९८४४५३९

अनेक वर्षांपासून या बाजारात शेळ्या- मेंढ्या विक्रीसाठी घेऊन येतो. प्रत्येक बाजारात किमान पाच मेंढ्यांची विक्री केल्याशिवाय घरी जात नाही. घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्यामध्ये या बाजाराचा वाटा महत्त्वाचा ठरला आहे.
सुनील चोपडे,
लाटवडे, जि. कोल्‍हापूर

वीस वर्षांपासून शेळ्या- मेंढ्या खरेदी विक्री व्यवसायात आहे. नगर भागातून त्या आणतो.
आखाड काळात अन्य कालावधीपेक्षा सुमारे पंधरा ते वीस टक्क्यांनी विक्रीत वाढ झाली.
कृष्‍णात माने, चरेगाव जि. सातारा

राज्यातील विविध भागातील शेळ्या- मेंढ्या इथे उपलब्ध होतात. अनेक शेतकऱ्यांसोबत
स्नेह तयार झाल्याने दरांपेक्षा जोपासलेली विश्‍वासार्हता महत्त्वाची ठरली आहे. अर्थप्राप्‍तीही चांगली होते.
अमीर गंजेली,
दानोळी, जि. कोल्हापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com