
Pune News : सततच्या पावसामुळे जून महिन्याचा पंधरवडा उलटूनही राज्यात खरिपाचा अपेक्षित पेरा झालेला नाही. गेल्या आठवड्यात राज्याचा पेरा अवघा पाच टक्के झाला होता. चालू आठवड्यातदेखील पेरणीचा आलेख चढता राहण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे आता पुढील ८-१० दिवस खरीप हंगामाचे भवितव्य ठरविणारे असतील. त्यानंतरदेखील पावसामुळे पेरा लांबल्यास खरीप अन्नधान्य उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, अशी भीती कृषी विभागातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.
यंदा मका, भात, कापूस, सोयाबीन व उसाचे क्षेत्र वाढण्याची अपेक्षा होती. मात्र, सतत पाऊस होत असल्यामुळे सध्या ऊस वगळता इतर पिकाबाबत निश्चित अंदाज सध्यातरी लावता येत नाही. कारण, पावसामुळे गेल्या आठवड्यात राज्याचा पेरा अवघा पाच टक्के झाला होता. चालू आठवड्यातदेखील पेरण्यांमध्ये अपेक्षित प्रगती झालेली नाही. एरवी अगदी २० जूनपर्यंत पेरा झाला तरी अन्नधान्याचे उत्पादन चांगले येते. त्यामुळे आता पुढील प्रत्येक दिवस खरिपाचे भवितव्य ठरविणारा राहील. दुर्दैवाने चालू आठवड्यातदेखील पाऊस असाच सुरू राहिल्यास पेरण्या लांबतील.
राज्यात गेल्या ‘खरीप-२०२४ हंगामा’त अन्नधान्याचे उत्पादन १४६ लाख टनापर्यंत नेण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवले होते. पाऊस बऱ्यापैकी वेळेत झाल्याने गेल्या खरिपातील अन्नधान्य उत्पादन वाढले. अगदी उद्दिष्टापेक्षाही १२८ टक्के म्हणजेच १८७ लाख टनापर्यंत अन्नधान्य उत्पादन झाले होते. मात्र, चालू ‘खरीप-२०२५ हंगामा’ची स्थिती अगदीच उलट दिसते आहे. राज्यात इतका पाऊस बरसतो आहे की पेरा करण्यासाठी शेतकऱ्यांना अवधी मिळेनासा झालेला आहे.
मे मध्ये सरासरीच्या १८६ टक्के आणि आता जूनच्या पंधरवड्यातच सरासरीच्या ७७ टक्के पाऊस राज्यभर झालेला आहे. गेल्या महिन्यात भर उन्हाळ्यात सततच्या पावसामुळे मेअखेरपर्यंत वाफसा नव्हता. त्यामुळे राज्यात धुळपेरा कुठेही झाला नाही. चालू महिन्यातदेखील २-४ दिवस थांबून पुन्हा मुसळधार पाऊस होतो आहे. त्यामुळे या पंधरवड्यातसुद्धा शेतकऱ्यांना पेरा पुन्हापुन्हा लांबणीवर टाकावा लागतो आहे.
उशिराच्या पेऱ्यावर परतीच्या मॉन्सूनचे संकट
कृषी विभागातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, यंदाचा खरीप पेरा १४४ लाख हेक्टरच्या पुढे नेण्याचे उद्दिष्ट आहे. त्यातून २०४ लाख टनापर्यंत अन्नधान्य उत्पादन व्हावे, असे नियोजन चालू आहे. परंतु, सतत होणारा पाऊस आता खरिपात मोठा अडथळा ठरतो आहे. पेरा लांबत जाऊन अगदी २५-३० जूनपर्यंत गेलाच काढणीतील समस्या वाढू शकतील. उशिराचा सर्व पेरा पुढे परतीच्या मॉन्सूनमध्ये सापडेल. त्यातून कापणी किंवा काढणीला आलेली पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वाढते, असे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.