
डाॅ. कैलास कांबळे, डाॅ. विलास साळवे
Agricultural Economic Challenges : आपण कोणत्याही पिकाची शेती करत असलो तरी शेतीमाल वाळविण्याची यंत्रणा आपल्याकडे तयार असली पाहिजे. कारण योग्य आर्द्रतेला शेतीमालाची विक्री केल्यास अधिक दर मिळतो. त्याच प्रमाणे पूर्णपणे सुकवून त्याची भुकटी किंवा पावडर तयार केल्यास त्याची टिकवण क्षमता कैकपटीने वाढते. त्यामुळे बाजारातील आवकीप्रमाणे होणारे दरातील चढ-उताराचा फारसा ताण आपल्यावर राहत नाही. या पद्धतीने सर्व प्रकारच्या भाज्या, फळभाज्या सुकवून ठेवता येतात. उदा. मेथी, पालक, शेपू, कोथिंबीर यासारख्या पालेभाज्या; टोमॅटो, कारले व अन्य फळभाज्या वाळवून त्याचे काप किंवा पावडर तयार करता येते.
व्यवसायही शक्य
घरगुती किंवा व्यावसायिक पद्धतीने निर्जलीकरणाचा प्रकल्प राबवणेही शक्य आहे. त्यातून हंगामात स्वस्त असलेल्या भाज्यांची खरेदी करून त्यापासून निर्जलीकरणानंतर भुकटी, काप तयार करून त्याची विक्री करणे शक्य आहे. मात्र यासाठी योग्य प्रकारची वाळवण यंत्रे घ्यावी लागतील. वाळविलेल्या भाज्या बाजारात ८ ते १० पट जास्त किमतीने विकल्या जातात.
उदा. मेथी ७०० ते ८०० रुपये प्रति किलो, पालक ४०० ते ६०० रुपये प्रति किलो, लिंबू ५०० ते ८०० रुपये प्रति किलो.
प्रश्न : स्थानिक कारागिराकडून पाॅलिटनेल वाळवण यंत्र तयार करून घेता येईल का?
उत्तर ः होय. पाॅलिटनेल वाळवणी यंत्र बांधणी फारसे अवघड नाही. कोणताही ग्रामीण भागातील कारागीर करू शकतो. यामध्ये अर्ध लंबगोल आकाराचा लोखंडी किंवा बांबूचा सांगाडा जमिनीलगत घट्ट बसवून घ्यावा. त्यात ट्रे ठेवण्यासाठी रॅक ठेवावेत. वरील बाजूने पाण्याची वाफ बाहेर जाण्यासाठी एका ठिकाणी चिमणी तयार करावी. आत जाण्यायोग्य जागा ठेवून, दरवाजा तयार करावा. या सांगाड्यावर पाॅलिथीन पेपर क्लिपच्या साह्याने घट्ट बसवून घ्यावे. ही सर्व कामे गावातील वेल्डर किंवा सुतार नक्की करू शकतो.
प्रश्न : पाॅलिटनेल वाळवणी यंत्र बांधणीसाठी खर्च किती येतो?
उत्तर ः पाॅलिटनेल वाळवणी यंत्र हे एक प्रकारे चिमण्या लावलेले छोटे पाॅलिहाउसच असते. त्यामुळे पाॅलिहाउसप्रमाणेच त्यात वापरल्या जाणाऱ्या साधनाप्रमाणे कमी, मध्यम व जास्त खर्च होऊ शकतो. यात वरील बाजूला चिमण्या लावणे आणि आतील बाजूला रॅक लावणे या खर्च अधिक लागतो
सांगाड्यासाठी बांबूंचा वापर एकदम स्वस्तात पडतो. पण त्याची टिकवण क्षमता कमी असते.
लोखंडी पाइप वापरल्यास थोडा जास्त खर्च येत असला तरी बांबूपेक्षा अधिक ताकद मिळेल.
गंजरहित लोखंड (म्हणजे गॅलव्हनाइज्ड आयर्न, जीआय) पाइप वापरल्यास खर्च वाढला तरी १५ ते २५ वर्षांपर्यंत टिकू शकतो.
आतील रॅक व चिमणीसाठी वापरलेल्या साधनाप्रमाणे खर्च कमी अधिक होईल.
प्रश्न : पाॅलिटनेल वाळवणी यंत्र महिलांच्या मसाले, पापड व शेवया निर्मिती उद्योगासाठी वापरता येते का?
उत्तर : होय. पाॅलिटनेल वाळवणी यंत्र शेतीमालाच्या वापरासोबत अन्य कोणत्याही पदार्थांच्या निर्जलीकरणासाठी किंवा वाळविण्यासाठी वापरणे शक्य आहे. अगदी घरगुती किंवा व्यावसायिक सांडगे किंवा बाजरीच्या खारवड्या तयार करून वेगाने वाळविण्यासाठी उपयुक्त आहे.
प्रश्न : वाळवण यंत्राचे अन्य फायदे कोणते?
उत्तर ः आपल्या देशात वर्षातील ८ ते १० महिने चांगला सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. ही सूर्याची ऊर्जा विविध कामांसाठी उपयोगात आणणे शक्य आहे. अगदी पॉलिटनेल किंवा अन्य सौर वाळवण यंत्रे बसवणे शक्य नसले तरी आपल्या सिमेंट काँक्रीटच्या इमारतींच्या छतावर केवळ ताडपत्री वेगाने ओढता येईल, अशी सोय करून ठेवल्यास तिथे पसरूनही धान्यांसारखे विविध पदार्थ वाळवणे शक्य आहे.
मात्र सरळ सूर्यप्रकाशामध्ये वाळविताना पदार्थांचे रंग कमी होण्यासारख्या काही समस्या उद्भवू शकतात. मात्र पदार्थ वाळत घातल्यामुळे प्रखर सूर्यप्रकाश व रात्रीची अचानक थंडी यामुळे होणारे छताचे प्रसरण व आकुंचन टळते. अशा आकुंचन प्रसरणामुळे छताला केसाएवढ्या भेगा पडून छत गळण्याचे प्रकार घडतात. त्याला आळा बसू शकतो. वर वाळवण यंत्रणा उभी असल्यामुळे छत तापत नाही. परिणामी, खाली घरात फॅन, कुलर किंवा एअर कंडिशनर चालविण्याचा खर्च कमी होतो किंवा वाचतो.
महिलांना गृह उद्योग चालविण्यासाठी, उन्हाळी पदार्थ वाळविण्यासाठी, अगदी पावसाळ्यात कपडे सुकविण्यासाठीही पॉलिटनेल वापरता येते.
हळद उत्पादक शिजविलेली हळद कमी
वेळेत वाळवू शकतात. शेतात वाळविताना
त्यात काडीकचरा मिसळला जाण्याचा धोका राहतो.
आल्यापासून सुंठ तयार करता येते.
द्राक्षापासून बेदाणे निर्मिती शक्य होते.
वाळविण्याच्या प्रक्रियेसाठी वीजबिल येत नाही.
शेतीमालातील जलांश कमी होतो. म्हणजेच त्याचे वजन, आकार कमी होतो. पॅकेजिंग व हाताळणी सोपी आणि स्वस्त होते.
साठवण करण्यासाठी शीतकरण यंत्रणेची गरज लागत नाही.
शेतीमाल वाळविण्याचे अर्थशास्त्र
शेतकऱ्यांनी शेतमाल विकताना म्हणजे साधारण ऑक्टोबर किंवा एप्रिल - मे महिन्यात धान्यातील जलांश हा किमान पातळीवर असतो. त्याचा बाजारभाव जुलै ते सप्टेंबर महिन्यातील बाजारभावाच्या तुलनेत २०० ते ४०० रुपये प्रति क्विंटल इतका जास्त असतो. म्हणजेच प्रति किलोग्रॅम २ ते ४ रुपये. महाराष्ट्रातील ४३ हजार गावांनी मिळून प्रति गाव ५००० टन वार्षिक धान्य विक्री केली तर त्या गावात तितकाच फायदा येईल. आपल्या गावात सामूहिक साठवणगृह किंवा गोदाम बांधून किंवा भाडेतत्त्वावर साठवण करता येईल. त्याची जुलै ते सप्टेंबर या महिन्यात विक्री केल्यास येणारा फायदा व त्याचा ढोबळ हिशेब तक्त्यात दर्शविला आहे.
तक्ता : शेतीमाल वाळवून साठवून विक्री करण्याचे अर्थशास्त्र
(खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामातील सर्व पिके गृहीत धरून ढोबळमानाने.)
महाराष्ट्रातील एकूण मोठी गावे ४३,००
होणारे फायदे एक गाव महाराष्ट्र
वाळवून साठविलेले एकूण धान्य (टन) १००० ४३,००,०००
वाळविण्यासाठी लागणारी वाळवणी यंत्रे प्रति २० टनांस एक यंत्र या प्रमाणे यंत्रांची संख्या ५० २,१५,०००
एका यंत्राचा खर्च रु. २ लाख या प्रमाणे, रु. कोटी १ ४३००
एका गावात एक मोठे गोदाम / साठवण गृह बांधणी खर्च रु. ५० लाख या प्रमाणे रु. कोटी ०.५० २१५००
एकूण खर्च रु. कोटी १.५ २५८००
एकूण ग्रामीण भागात होणारे फायदे
एक यंत्र बसविताना निर्माण होणारा रोजगार २५ मनुष्य दिवस प्रति यंत्र या प्रमाणे १२५० ५३,७५,०००
उभारणी, दुरुस्ती व देखभालीसाठी तयार होणारे नवे व्यावसायिक यंत्र संख्येच्या १० टक्के या प्रमाणे ५ २१,५००
उप उत्पादनांचा वापर करणारे व्यवसाय किमान २ प्रति गाव २ ८६०००
साठवणीनंतर विकताना शेतकऱ्यांना रु. १०० प्रति क्विंटल नफा मिळाल्यास एकूण मिळू शकणारा नफा. (रु. लाखांत.) ५ २१,५०००
एकूण गावांमध्ये दरवर्षी मिळणारा निव्वळ लाभ (रु. कोटी) १ २१५०
केवळ आपल्या गावातील धान्य व शेतीमाल योग्य प्रकारे वाळविल्यास त्यातून गावपातळीवर होणारा फायदा एक कोटी इतका होऊ शकतो.
- डाॅ. कैलास कांबळे, ९४०४७८५८८४
(सहयोगी प्राध्यापक, कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, राहुरी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.