Solapur News : ऊसदर हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय असतो, यासाठी आष्टी शुगरचा पुढाकार महत्त्वाचा राहिला आहे, योग्य आणि वेळेत दर देणे, ही त्यांची ख्याती आहे. आपल्या कामकाजाने येत्या काळात आष्टी शुगर कारखाना जिल्ह्यात वरच्या क्रमांकावर येईल, असे प्रतिपादन ह. भ. प. जयवंत बोधले महाराज यांनी केले.
आष्टी (ता. मोहोळ) येथील आष्टी शुगर या साखर कारखान्याचा सन २०२४-२५ या गळीत हंगामाचा मोळी पूजन सोहळा बोधले महाराज यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी धनश्री परिवाराचे सर्वेसर्वा प्रा. शिवाजीराव काळुंगे होते. या वेळी चेअरमन शोभाताई काळुंगे, संचालिका स्नेहलताई काळुंगे-मुदगल, अॅड. दीपाली काळुंगे, कार्यकारी संचालक सुयोग गायकवाड, जनरल मॅनेजर भागवत कृष्ण मगर, मुख्य शेती अधिकारी तानाजी कदम, केमिस्ट व्ही. एस. यादव, डेप्युटी चीफ केमिस्ट ए. व्ही. मासाळ आदी उपस्थित होते.
या वेळी बोधले महाराज म्हणाले, की शेतकऱ्यांच्या जीवनातली खरी दिवाळी ही साखर कारखाना सुरू होणे, ही आहे. कारखान्यामुळे आर्थिक सुबत्ता येते. त्यावरच आपलं कुटुंब अवलंबून असते, त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बाब असल्याचे ते म्हणाले.
यावेळी बोलताना प्रा. काळुंगे म्हणाले, आम्ही अनेक साखर कारखान्यांना आर्थिक मदत केली आहे. आष्टी साखर कारखान्याचा मोहोळ, माढा, व पंढरपूर या तालुक्यातील राजकारणाचा काहीही संबंध नसणार आहे. आज पर्यंतचे सर्व कारखाने आम्ही याच पद्धतीने चालविले आहेत. हा कारखाना शेतकऱ्यांचा आहे.
आष्टी कारखान्याला ऊस आणताना तो कुठल्याही काट्यावर वजन करून आणा, शेतकरी १४ ते १५ महिने कष्ट करून ऊस पिकवितात, त्यांना फसवणे कितपत योग्य आहे. मस्टरच्या वेळच्या वेळी पगारी, चोख काटा व योग्य दर ही आमच्या परिवाराची ख्याती आहे.
या त्रिसूत्री वरच गाळप हंगाम यशस्वी करू. चालू गळीत हंगामात पाच लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट असून, त्यासाठी १८ हजार हेक्टर ऊस उपलब्ध असल्याचेही प्रा. काळुंगे यांनी सांगितले. कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा संचालिका डॉ. राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.