Geopathic Stress : ‘जिओपॅथिक स्ट्रेस’चा मानवी आजाराशी संबंध

Ground Water : जमिनीखाली पाण्याचे वाहते प्रवाह आणि त्यातून निर्माण होणारे स्ट्रेस झोन यावर संशोधन करण्यात आले. त्याचे प्रयोग वचाचण्या घेताना त्याचा आरोग्य आणि आजारांशी संबंध असल्याचे सातत्याने पुढे येत गेले.
Geopathic Stress
Geopathic Stress Agrowon
Published on
Updated on

Ground Water Consurvation : पाणी नव्हे जीवन! - सतीश खाडे - ‘जिओपॅथिक स्ट्रेस’चा मानवी आजाराशी संबंध, लेख १०४ - जिओपॅथिक स्ट्रेस झोन, भाग ३

जमिनीखाली पाण्याचे वाहते प्रवाह आणि त्यातून निर्माण होणारे स्ट्रेस झोन यावर संशोधन करण्यात आले. त्याचे प्रयोग वचाचण्या घेताना त्याचा आरोग्य आणि आजारांशी संबंध असल्याचे सातत्याने पुढे येत गेले.
-

जिओपॅथिक स्ट्रेस झोन संदर्भात प्रा. अविनाश खरात यांचे संशोधन सुरू झाले. त्यांनी स्वतः डाउझिंग शिकून त्याचे प्रयोग सुरू केले. पण संशोधनाच्या दृष्टीने एक किंवा दोन व्यक्तींच्या साह्याने निरीक्षणे नोंदवणे हे कमी पडत होते. हे जाणून त्यांनी महाविद्यालयाची विद्यार्थ्यांची मदत घेण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी सलग चार वर्षे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना खास प्रशिक्षण दिले. त्यांना या अभ्यासाचे व संशोधनाचे महत्त्व पटवून दिले.

Geopathic Stress
Geopathic Stress Zone : जमिनीखालून वाहणाऱ्या पाण्याचा मानवी आजारांशी संबंध

त्यांना प्रकल्प देत वेगवेगळ्या भागांमध्ये डाउझिंग करून त्यांची निरीक्षणे नोंदविण्यास सांगितले. त्यामुळे कॉलेज आवारातील विविध इमारती, मैदान, वसतिगृहांच्या इमारतीबरोबरच पुणे शहर व आसपासच्या भागातील ६०० पेक्षा अधिक घरांमध्ये डाउझिंग करून त्यांची निरीक्षणे नोंदवण्यात आली. या दरम्यान लोकांशी संवाद करून, त्यांचे आजार व आरोग्यविषयक समस्या समजून घेण्यात आले. या समस्यांची सांगड डाउझिंगच्या निरीक्षणांशी घालणे शक्य आहे, याचाही विचार करण्यात आला. पुढे लोकांना या प्रयोगाबाबत समजल्यानंतर लोक स्वतःहूनच बोलावू लागले. यातून मोठ्या प्रमाणात माहिती गोळा झाली.

डाउझिंग करताना सळयाची टोके फिरलेल्या ठिकाणी थोडी चौकशी केली तरी त्या घरातील व्यक्तीला असलेल्या दीर्घ आजाराबाबतची माहिती समजत असे. स्ट्रेस झोनमध्ये राहणाऱ्या लोकांना काही ना काही आजार होते. उदा. कुणाला कॅन्सर, तर कुणाला अस्थमा, उच्चरक्तदाब, हृदयरोग, संधिवात इ. या साऱ्यांच्या नोंदी घेऊन त्याचे विश्‍लेषण करण्यात आले. त्यामुळे या आजारांचा संबंध त्या घरांखालील जमिनीमधून वाहणाऱ्या पाण्यांच्या प्रवाहांशी (म्हणजेच जिओपॅथिक स्ट्रेस झोन) असल्याचे स्पष्ट झाले. आजवर छद्मविज्ञान म्हणून डावलले जाणाऱ्या एका विषयाला प्रा. खरता व त्यांच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयोगांमुळे आकडेवारीसह पुरावे उपलब्ध झाले.

या अभ्यास, सर्व्हेक्षणातील काही खास उदाहरणे...

१. मुलांनी वसतिगृहातील एका रूममधील विशेष निरीक्षण नोंदवले. त्या विशिष्ट रूममधील दोन कॉट पैकी एका विशिष्ट कॉटवर वर्षभर झोपणाऱ्या मुलाचे केस महाविद्यालयीन काळातच पांढरे झाले होते. नेमकी ती कॉट ज्या जागेवर होती, तो जिओपॅथिक स्ट्रेस झोन असल्याचे डाऊझिंग प्रयोगात दिसून आले होते. खरेतर ती वसतिगृहाची खोली असल्याने त्यांनी दरवर्षी त्या खोलीत राहणाऱ्या व त्या कॉटवर झोपणाऱ्या गेल्या दहा वर्षातील मुलांशी संपर्क करून चर्चा केली असता त्यातील प्रत्येक मुलाचे केस महाविद्यालयीन काळातच पांढरे झाले होते.

२. एका प्रयोगादरम्यान रक्तदाबाचा अजिबात त्रास नसलेल्या एका तरुण मुलाला खरात सरांनी जिओपॅथिक स्ट्रेस झोनचा प्रभाव असलेल्या खोलीतील कॉटवर २४ तास संपूर्ण वेळ घालण्यास सांगितले. त्या चोवीस तासांत ठरावीक अंतराने त्याच्या रक्तदाब व हृदयाचे ठोके आधुनिक वैद्यक यंत्राने मोजण्यात आले. या सर्व नोंदी प्रयोगाबाबत काही न सांगता एका तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवल्या. त्या डाॅक्टरांनी चक्क त्या मुलाला गंभीर स्वरूपाचा हृदयरोग असल्याचे निदान केले. या नोंदीवरून तर त्वरित ओपन हार्ट सर्जरी करण्याची गरज असल्याचे त्यांचे निदान होते. पण जेव्हा प्रत्यक्षात या नोंदी एका निरोगी मुलाच्या आहेत आणि केवळ तो जिओपॅथिक स्ट्रेस झोनमध्ये २४ तास राहिल्यामुळे आलेल्या आहेत, हे सांगितल्यावर डॉक्टरांनाही आश्‍चर्याचा मोठा धक्का बसला. ते स्वतः पुण्यातील नामवंत हॉस्पिटलमधील नामवंत हृदय तज्ज्ञ आहेत. त्यांना या विषयावर अधिक अभ्यास करण्याची गरज लक्षात आली. म्हणूनच त्यांनी त्यांच्या ८० हृदयरोगग्रस्त रुग्णांची यादी दिली. त्या रुग्णांची परवानगी घेऊन, त्यांच्या घर व परिसरातील स्ट्रेस झोन आहेत का, हे तपासण्यास सांगितले. यातील काही रुग्णांनी व नातेवाइकांनी परवानगी दिली, तर काहींनी नाकारली. ज्यांनी परवानगी दिली होती, तिथे तपासणी केली असता बहुतेकांच्या घरामध्ये अशा प्रकारचा स्ट्रेस झोन सापडला.

३. पुणे येथील ओंकारेश्‍वर मंदिराजवळच एका वाड्यात एका खोलीत एक कुटुंब राहत होते. त्यांच्या घरातील तीन पिढ्यांतील पुरुष खूप कमी वयातच वारले. त्यांच्या पत्नी आजही तिथे राहत होत्या. त्यांनाही ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. खरात सरांनी तिथे निरीक्षणे घेतली असता त्यांच्या बेडरूमधून स्ट्रेस झोन जात होता. त्यात योगायोगाची बाब म्हणजे पुरुष मंडळी ज्या बाजूला झोपत त्या जागी स्ट्रेसझोन अधिक सशक्त असल्याचे स्पष्ट झाले. या स्ट्रेसझोनमुळेच त्यांचे आजार व आरोग्य यांच्या समस्या उद्‍भवल्या असे म्हणण्यास वाव असल्याचा निष्कर्ष खरात यांनी काढला.

४. प्रा. अविनाश खरात सरांच्या दिर्घ परिचयाच्या एक स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. त्यांच्याकडे वंधत्वावर उपचार घेणाऱ्या काही दांपत्यामध्ये वरकरणी तरी कोणताही दोष सापडत नव्हता. त्यामुळे स्ट्रेस झोन आणि वंध्यत्व यात काही संबंध आहे का, या तपासणी करण्यासंदर्भात त्यांनी सूचवले. ज्या दांपत्यांनी परवानगी दिली, त्यांच्या घरांमध्ये डाउझिंग करण्यात आले. या सर्व चाचण्यामध्ये त्यांच्या बेडरूममध्ये जिओपॅथिक स्ट्रेसझोन असल्याचे स्पष्ट झाले. या दांपत्यांना केवळ त्यांची झोपण्याची खोली काही काळासाठी बदलून बघण्याचा सल्ला देण्यात आला. त्या दाम्पत्यांनी त्याचे पालन केल्यानंतर काही काळातच त्यांना अपेक्षित ‘गुड न्यूज’ मिळाली.
५. पुणे येथील कॅम्प परिसरातील बेसमेंट मध्ये एका प्रसिद्ध पुस्तक विक्रेत्याचे दुकान होते. त्या काळात तो खरात सरांना विविध विषयांची अभ्यासाची पुस्तके देशविदेशातून मागवून देत असे. त्याला त्याच्या जागेसंबंधी काही शंका व तक्रारी होत्या. त्याच्या आग्रहावरून सरांनी स्ट्रेस झोनची चाचणी केली असता तिथेही स्ट्रेस झोन असल्याचे सापडले. असे अनेक अनुभव खरात यांच्या पीएचडी प्रबंधामध्ये नोंदविलेले आहेत.
-

टीका टिप्पणी आणि संशोधनाला वेग
जिओपॅथिक स्ट्रेस संदर्भातील या संशोधनाची केवळ तत्कालीन पुणे विद्यापीठातच, नव्हे तर त्या बाहेरही मोठी चर्चा झाली. सुरुवातीला काही नामवंत व्यक्ती व शास्त्रज्ञांनी पुणे विद्यापीठ अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या संशोधनाला प्रोत्साहन देत असल्याची टिप्पणी केली. त्यामुळे नाराज न होता, हिंमत न हारता प्रा. खरात यांनी त्याला अन्य मूलभूत शास्त्रातील उदा. भौतिकशास्त्र, वैद्यकशास्त्र, विद्युत विज्ञान, पर्यावरण शास्त्र या व अशा अनेक विज्ञान शाखांतील संदर्भांचा अभ्यास करत आपले संशोधन सहा सात वर्ष सुरूच ठेवले. पुढे शोध प्रबंधामध्ये आवश्यक तिथे वेगवेगळ्या शास्त्रातील संदर्भ दिल्यावर बहुतेक तज्ज्ञांची खात्री पटू लागली. खात्री झाल्यावर पूर्वी टीका करणाऱ्यापैकी काही नामवंतांनी स्वतः त्यांचे तोंड भरून कौतुक केले.
त्यांच्या प्रयत्न आणि चिकाटीमुळे पुढे याच संशोधनावर आधारित पुण्यातीलच १० प्राध्यापकांनी संशोधन केले. त्यात विविध टप्पे गाठत पीएच. डी. मिळवली. काही पेटंट्स नावावर केली. त्यांचे हे सारे संशोधन जगातील नामवंत संशोधनपत्रिकांमध्येही प्रसिद्ध झाले आहेत. आता या सर्व संशोधकांनी मिळून ‘डाउझिंग सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेची स्थापना केली आहे. त्यामुळे या विषयात संशोधन करू पाहणाऱ्या पुढील पिढीलाही संशोधनपर व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

प्रा. डाॅ. खरात सरांच्या मार्गदर्शनाखाली पुढील बाबींवर संशोधन झाले आहे.
१.‘जिओपॅथिक स्ट्रेस’चा मानवी शरीराच्या तापमानावर व त्वचेच्या प्रतिसादावर होणारा परिणाम
२. ‘जिओपॅथिक स्ट्रेस’चा मानवी हृदयाचे ठोके व रक्तदाबावर होणारा परिणाम
३. ‘जिओपॅथिक स्ट्रेस’चा मज्जासंस्थेवर होणारा परिणाम.
४. रस्त्यावरील अपघात आणि जिओ स्ट्रेस संबंध.
५. ‘जिओपॅथिक स्ट्रेस’चा रस्त्यांच्या काँक्रीटवर होणारा विपरीत परिणाम.
६. रस्ते, इमारती आणि सर्व प्रकारच्या बांधकामाच्या पायात महत्त्वाचा घटक असणाऱ्या मातीच्या गुणधर्मात ‘जिओपॅथिक स्ट्रेस’मुळे होणारे बदल.
७. ‘जिओपॅथिक स्ट्रेस’ मोजण्याच्या आधुनिक पद्धतीची निर्मिती.
८. ‘जिओपॅथिक स्ट्रेस’ मोजण्याची अत्याधुनिक साधने.
९. अत्याधुनिक साधनाद्वारे जमिनीतील पाण्यासंबंधीची इत्थंभूत माहिती देण्याची पद्धती.
१०. ‘जिओपॅथिक स्ट्रेस’चा परिणाम कमी करणे व तो स्ट्रेस इतरत्र वळविण्यासाठीच्या शास्त्रशुद्ध उपाय योजना.
११. ‘जिओपॅथिक स्ट्रेस’चे मोजमाप त्यावरील उपाय योजना, यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर.
या विषयी पुढील काही भागांमध्ये माहिती घेऊ.

संपर्क ः सतीश खाडे, ९८२३०३०२१८,
(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)


ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com