Amravati News : जुलै व ऑगस्टमधील सततच्या पावसाने नुकसान झालेल्या जिल्ह्यातील ४१ हजार ९११ नुकसानग्रस्त संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी १३५ कोटी रुपये अनुदानाचा प्रस्ताव आचारसंहितेत अडकला आहे. त्यामुळे या नुकसानग्रस्तांना निवडणुका होईस्तोवर भरपाई मिळणार नसून प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. जिल्हा प्रशासनाने पंचनामे करण्यास व प्रस्ताव पाठविण्यास विलंब केल्याचा रोष शेतकऱ्यांमध्ये आहे.
यंदाच्या खरीप हंगामात जुलै व ऑगस्ट महिन्यांत झालेल्या सततच्या पावसाने अमरावती जिल्ह्यातील ३७ हजार ३९३ हेक्टर क्षेत्रातील संत्रा फळबागा बाधित झाल्या आहेत. त्याचा थेट फटका ४१ हजार ९११ शेतकऱ्यांना बसला आहे.
जिल्हा प्रशासनाने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी १३४.६१ कोटी रुपयांच्या अनुदानाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव शासनदप्तरी असून १५ ऑक्टोबरपासून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने त्यास मंजुरी मिळालेली नाही.
अमरावती जिल्ह्यात ७५ हजार हेक्टर क्षेत्र संत्रा उत्पादनाखाली आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून संत्रा उत्पादकांना नुकसान सहन करावे लागले आहे. यंदाही सततच्या पावसाने नुकसान केले असल्याने फळगळ मोठ्या प्रमाणावर झाली आहे. संयुक्त पंचनाम्यानुसार जिल्ह्यातील ३७ हजार ३९३ हेक्टर क्षेत्रात फळगळ झाली आहे.
संत्रा उत्पादकांचे नुकसान भरून काढण्यासाठी त्यांना अनुदान देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार वरुड तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यास जिल्हा प्रशासनाकडून विलंब झाल्याने प्रस्ताव जाण्यासही उशीर झाला. परिणामी हा प्रस्ताव आता आचारसंहितेच्या कचाट्यात सापडला आहे. निवडणुकीनंतरच प्रस्तावास मंजुरी, वितरणाचे आदेश निघणार आहेत.
असा आहे प्रस्ताव
एकूण बाधित क्षेत्र...३७,३९३ हेक्टर
शेतकरी संख्या......४१,९११
अनुदान मागणी.....१३४.६१ कोटी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.