Jowar GI Rating : ‘दगडी ज्वारी’ला भौगोलिक मानांकन

Dagadi Jowar : जालना जिल्ह्यातील मोसंबीला भौगोलिक मानांकन मिळाले होते. आता पुन्हा एकदा दगडी ज्वारीच्या भौगोलिक मानांकनामुळे (जीआय) जालना जिल्हा आणि तेथील शेती पद्धती चर्चेत आली आहे.
Dagadi Jowar
Dagadi JowarAgrowon

Jalna News : आधी मोसंबी आणि आता जालन्याच्या ‘दगडी ज्वारी’ने भौगोलिक मानांकन (जीआय) प्राप्त केले आहे. बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी येथील जय किसान शेतकरी गटाने यासाठी घेतलेला पुढाकार, केलेला पाठपुरावा, प्रयत्न फळाला आला आहे. भारत सरकारच्या चेन्नई येथील ‘भौगोलिक मानांकन रजिस्ट्री कार्यालयाने’ ३० मार्च २०२४ रोजी या ज्वारीच्या जीआयला प्रमाणपत्र प्रदान केले आहे.

जालना जिल्ह्यातील मोसंबीला भौगोलिक मानांकन मिळाले होते. आता पुन्हा एकदा दगडी ज्वारीच्या भौगोलिक मानांकनामुळे (जीआय) जालना जिल्हा आणि तेथील शेती पद्धती चर्चेत आली आहे. मराठवाड्यात रब्बीत ज्वारीचे पीक साधारणपणे सर्वदूर घेतले जाते.

Dagadi Jowar
Jowar Harvesting : ज्वारीची उत्पादकता घटण्याची शक्यता?

जालना जिल्ह्यात रब्बी ज्वारीचे सरासरी क्षेत्र ८६ हजार ९३८ हेक्टर असताना प्रत्यक्षात यंदाच्या रब्बी हंगामात १ लाख ६ हजार ६४० हेक्टर क्षेत्रावर रब्बी ज्वारीची पेरणी झाली होती. यामध्ये पारंपरिक दगडी ज्वारीसह मालदांडी, शाळू तसेच परभणी सुपरमोती, शक्ती, सुपर शक्ती आदी सुधारित व इतर हायब्रीड वाणांचा समावेश असतो. यामध्ये दगडी ज्वारीचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात असते.

जीआय प्राप्त करण्याच्या अनुषंगाने सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळाने बदनापूर, अंबड, जालना, घनसावंगी या चार तालुक्यांत दुधना नदीकाठच्या जवळपास २० ते २२ गावात पारंपरिक दगडी ज्वारी उत्पादक शेतकरी शोधण्यासाठी मदत केली. जिल्ह्यातील मात्रेवाडी येथील जय किसान शेतकरी गटाने देखील यादृष्टीने आवश्यक ती मदत पुरविण्याचे काम केल्याची माहिती संस्थेचे सुहास आजेगावकर यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या नजरेतून गुणवैशिष्ट्ये...

जय किसान शेतकरी गटाचे अध्यक्ष भगवानराव मात्रे म्हणाले, की उगवून येईल एवढी ओल असली, की पुन्हा या ज्वारीला पाणी देण्याची गरज पडत नाही. हवेतील बाष्पावर ही ज्वारी वाढते. या ज्वारीचे कणीस दाणे भरले की दगडासारखे घट्ट बनते म्हणून हिला बोली भाषेत दगडी ज्वारी म्हणतात. पक्ष्यांनाही त्यातील दाणे सहज खाता येत नाहीत. प्रसंगी कणीस खाली पडले तरी त्यातील ज्वारी विखरत नाही. दगडी ज्वारीचे पीक जमिनीवर लोळतही नाही.

Dagadi Jowar
Dadar Jowar : खानदेशात वाढली दादर ज्वारीची आवक

पोषकद्रव्यांनी समृद्ध वाण

छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, अर्थात ‘एमआयटी’च्या सेंटर फॉर ॲनालिटिकल रिसर्च अँड स्टडीज यांच्या अहवालानुसार दगडी ज्वारीच्या १०० ग्राम दाण्यांच्या केलेल्या पृथक्करणात हे दाणे ग्लुटेन फ्री आढळून आले. याशिवाय कर्बोदके, लोह, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, जस्त, सोडिअम आदींही पोषकद्रव्ये आढळून आल्याची माहिती डॉ. दीपक बोरणारे यांनी दिली.

दगडी ज्वारीला भौगोलिक मानांकन देण्यासाठीचा विषय समोर आल्यानंतर या विषयात काम करणाऱ्या जय किसान शेतकरी गटाने तांत्रिक माहिती संकलनासाठी मदत व योग्य समन्वय, सांगड घालण्याचे काम केले.
- तेजल क्षीरसागर, सहायक महाव्यवस्थापक (जिल्हा विकास), जालना
भौगोलिक मानांकनाने दगडी ज्वारीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. आता या ज्वारीचे भेसळ विरहित दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील. शिवाय ग्राहकांनाही ज्वारी पुरविण्याचा प्रयत्न असेल.
- भगवानराव मात्रे, जय किसान शेतकरी गट, मात्रेवाडी, ता. बदनापूर, जि. जालना
महाराष्ट्राची ग्रामीण संस्कृती आणि अर्थकारण याला जोडणारा भौगोलिक मानांकन दगडी ज्वारीला मिळाल्याने जालना जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये आर्थिक आणि सांस्कृतिक प्रगती निश्चित पाहायला मिळेल.
गणेश हिंगमिरे, ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सी, पुणे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com