
Nashik News : आदिवासी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर खावटी योजना लागू करण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी अकरा दिवसांपूर्वी नंदुरबार येथून निघालेला सत्यशोधक शेतकरी सभेचा मोर्चा सोमवारी (ता.१८) स्थगित झाला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी रविवारी झालेल्या चर्चेनंतर ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी(ता.१८) रोजी रात्री १२ ला नाशिकमध्ये मोर्चेकऱ्यांची भेट घेतली.त्यांना लेखी आश्वासनांचे चारपानी पत्र दिल्यानंतर मोर्चेकऱ्यांचे समाधान झाले. तत्पूर्वी स्थानिक प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली.
या बैठकीला जिल्हाधिकारी जलज शर्मा, नंदुरबारचे जिल्हाधिकारी मनीषा खत्री,धुळ्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांसह आदिवासी विकास विभाग, वन विभाग व पोलिस अधिकारी उपस्थित होते.
आदिवासी बांधवांसह शेतकरी व कष्टकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी ७ डिसेंबरला नंदुरबार येथून पाच हजार आदिवासी बांधव बिऱ्हाड मोर्चा घेऊन मुंबईकडे निघाले. अकरा दिवसांत २७५ किलोमीटरचा टप्पा पार करून हे मोर्चेकरी नाशिकमध्ये धडकल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चेकऱ्यांना चर्चेसाठी नागपूरला बोलवले.
रविवारी (ता.१७) उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार लेखी आश्वासन घेऊन मंत्री महाजन रात्री नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी मोर्चेकऱ्यांना आश्वासनांची लेखी प्रत दिली. मात्र,स्थानिक प्रश्नांबाबत अधिकारी अंमलबजावणी करत नसल्याने त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात २ जानेवारीला, तर नंदुरबारला ४ जानेवारी व नाशिकला ५ जानेवारीला जिल्हाधिकाऱ्यांची पुन्हा बैठक होणार आहे.
संपूर्ण प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याने बिऱ्हाड मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय किशोर ढमाले यांनी जाहीर केला.नंदुरबार व धुळे येथून आलेल्या मोर्चेकऱ्यांना घरी जाण्यासाठी प्रशासनाने बसची व्यवस्था केल्याचे ढमाले यांनी सांगितले. यावेळी सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा नंदुरबारचे करणसिंग केकणी, रंजित गावित, दिलीप गावित, आर. टी. गावित, यशवंत माळचे, लीलाबाई वळवी, शीतल गावित उपस्थित होते.
नंदुरबार येथून निघालेला मोर्चा सोमवारी शहरात दाखल झाला. आडगाव येथून मोर्चाला सकाळी सुरवात झाली. आडगाव नाका, निमाणी, पंचवटी कारंजा, अशोक स्तंभ, सीबीएसमार्गे इदगाह मैदानावर मोर्चेकरी थांबले. दहा हजारांवर मोर्चेकरी रस्त्यावर उतरल्याने सर्वत्र लाल झेंडे दिसून आले. मोर्चेकऱ्यांची संख्या लक्षणिय असली तरी शिस्तबद्धपणाने शहरातून मार्गक्रमण केल्यामुळे बेशस्तीपणे चालणाऱ्यांची घुसखोरी होऊ दिली नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.