.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Nagar News : नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध भंडारदरा धरणाला क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचे नाव देण्यात आले आहे. राज्य शासनाने नामांतराचा निर्णय बुधवारी (ता. ४) मंजूर केला आहे. त्यामुळे या भागातील आदिवासी समाजात आनंद व्यक्त केला जात आहे.
अकोले तालुक्यातील देवगाव येथे जन्मलेल्या राघोजी भांगरे यांनी स्वातंत्र्यासाठी मोठा संघर्ष केला आहे. संघर्षाचा वारसा पित्याकडून मिळाला होता. तरुण वयात परिसरातील आदिवासी तरुणांना संघटित करून त्यांनी इंग्रजांविरोधात बंड पुकारले. तत्कालीन इंग्रज सरकारने राघोजींना पकडण्यासाठी चार हजार रुपयांचे इनाम लावले होते.
सावकारशाही विरोधात लढ्यात नगर, नाशिक, ठाणे व पुणे जिल्ह्यांतील जुलमी सावकारांविरोधात छापे टाकून गहाणखते जाळून टाकली. जानेवारी १९४८ मध्ये त्यांना पकडून इंग्रज सरकारने एकतर्फी खटला चालविण्यात येऊन फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. २ मे १९४८ रोजी ठाणे मध्यवर्ती कारागृहात राघोजी यांना फाशी देण्यात आली होती.
राघोजी भांगरे यांचा आदिवासी समाजात मोठा आदर आहे. आदिवासींसाठी डोंगर, दऱ्याखोऱ्यात लढणाऱ्या क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे नाव अकोले तालुक्यातील भंडारदरा येथील प्रसिद्ध धरणाला द्यावे, अशी मागणी अनेक दिवसांपासून सुरू होती. राज्य शासनाने ही मागणी मान्य केली आहे. नामांतराबाबतचा शासन आदेश जलसंपदा विभाग बुधवारी (ता. ४) जारी केला. यामुळे जनतेची अनेक दिवसांची मागणी मान्य झाली आहे.
प्रवरा नदीवरील २७० फूट उंचीच्या धरणाचे बांधकाम १९१० ते १९२६ या दरम्यान झाले आहे. १० डिसेंबर १९२६ रोजी तत्कालीन मुंबईचे गव्हर्नर लेसस्ली विल्सन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या धरणाला विल्सन यांचे, तर भिंती मागील जलाशयाला तत्कालीन मुख्य अभियंता आर्थर हिल यांचे नाव देण्यात आले होते.
तेव्हापासून हे धरण ‘विल्सन डॅम’, तर मागील जलाशय लेक आर्थर हिल म्हणून कागदोपत्री ओळखले जात होते. आता हे धरण ‘आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय’ या नावाने ओळखळे जाईल. निसर्गरम्य असलेल्या अकोल्याच्या पश्चिम भागातील आणि या धरणाच्या परिसरातील कळसूबाई, हरिचंद्रगड, घाटघर, रतनवाडी, साम्रददरीला भेट देण्यासाठी राज्यभरातून लोक येतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.