Nature Conservation : कोकणातील अस्वस्थ वर्तमान

Kokan Tourism : माझा मित्र आशुतोष जोशी कोकण किनारपट्टीवर पदयात्रा करतोय. कोकणात कथित विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा, जंगलाचा, शेतजमिनीचा चालू असलेला विध्वंस बघणे, याबाबत स्थानिक लोकांच्या भावना काय आहेत ते समजून घेणे, जनतेमध्ये संभाव्य धोक्यांबाबत जागृती करणे हा त्याच्या पदयात्रेमागचा उद्देश आहे
Kokan Nature
Kokan NatureAgrowon
Published on
Updated on

महारुद्र मंगनाळे

Environmental Awareness : रेवस ते रेडी या कोकण किनारपट्टीवर माझा मित्र आशुतोष जोशी पदयात्रा करतोय. २४ नोव्हेंबर २०२४ रोजी त्याची ही पदयात्रा सुरू झाली. आशुतोष यासंदर्भात पहिल्या दिवसापासून जे काही लिहतोय ते मी वाचतोय. कोणत्याही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणारं आहे हे सगळं. ते प्रत्यक्ष पाहावं म्हणून २५ ते ३० डिसेंबर २०२४ असे पाच दिवस मी आशुतोषच्या या यात्रेत सहभागी झालो. बुरोंडी, कोळथरे, पंचनदी, दाभोळ, गुहागर असा सुमारे ६२ कि.मी.चा तीव्र चढ-उताराचा प्रवास त्याच्यासोबत मी केला. त्याच्याशी, लोकांशी बोललो. यातून जे चित्र डोळ्यासमोर आलं ते बघून मी हादरलो. भविष्यात आजचा सुंदर कोकण पाहायला मिळणार नाही, एका निसर्गरम्य भूभागाला आपण मुकणार आहोत, याची पदोपदी जाणीव होते. आपण याबाबतीत काहीच करू शकत नाही, ही हतबलता अस्वस्थ करते.

मातीशी नाळ जुळलेली माणसं आपली जन्मभूमी सोडत नाहीत. पण सरकारने नियोजनपूर्वक अशी परिस्थिती निर्माण केलीय, की इथून बाहेर पडण्याशिवाय त्यांच्यासमोर दुसरा पर्यायच उरलेला नाही. कोकणात विकासाच्या नावाखाली निसर्गाचं, पर्यावरणाचं, आदिवासींचं वाटोळं करणारे कोण आहेत, हे सगळ्यांना दिसतंय. सरकार आणि उद्योगपती, ही नावं फक्त वेगळी आहेत. वास्तवात दोघेही एकच आहेत, फक्त मुखवटे वेगळे आहेत. दोघांनाही स्वतःचा विकास करायचाय. नाव फक्त जनतेचं. स्थानिक गरीब, आदिवासी लोकांशी या विकासाचा काहीच संबंध नाही. त्यांची संमतीही कोणी घेतली नाही. काही ठिकाणी त्यांना चांगल्या नोकरीची, कायमस्वरूपी उत्पन्नाची स्वप्नं दाखविण्यात आली. प्रत्यक्षात मिळाल्या त्या सुरक्षारक्षकांच्या रोजंदारीवरील नोकऱ्या. जे इथल्या जमिनीचे मालक होते त्या भाबड्या लोकांना नोकर बनवलं गेलंय.

Kokan Nature
Nature Conservation : अन्नसुरक्षेसाठी करा निसर्ग संवर्धन

इथल्या निसर्गाला बरबाद करून मूठभर शहरी बांडगुळांना मौजमजा करण्यासाठी शहरं उभारायची जोरात तयारी सुरू आहे. जणू काही प्रति स्वर्गच निर्माण करायचाय. यासाठी अनेक डोंगर सपाट केले जात आहेत. हजारो वर्षांपासून वाढलेल्या झाडांची बेसुमार कत्तल सुरू आहे. यालाच त्यांनी पर्यटन विकास असं गोंडस नाव दिलंय. कधी कधी वाटतं, हे खरंच याच देशाचे लोक आहेत का? ईस्ट इंडिया कंपनी यापेक्षा काय वेगळी होती? लोक सांगतात, की हा डोंगर या पुढाऱ्याचा; तो डोंगर आणि बाजूची जमीन त्या पुढाऱ्याची...कोणा उद्योगपतीची २०० एकर, कोणाची ५०० एकर जमीन... या स्पर्धेत कोणीच मागे नाही. हिंदी सिनेमातील नट-नट्यांनीही इथं जमिनी घेऊन ठेवल्यात.

डोंगर विकत घ्यायचे, त्यावरची सगळी झाडं तोडून जमीन सपाट करायची, चारही बाजूंनी मजबूत कुंपण घालायचं, मध्ये पाच-पन्नास झाडं लावायची, सुरक्षारक्षक उभे करायचे... ही यांची विकासाची व्याख्या! कवडीमोल किमतीने घेतलेल्या या जमिनी पुन्हा करोडोंचा नफा मिळवून विकायच्या. म्हणजेच हा केवळ धंदा आहे. अफाट पैसा मिळवायचाय सर्वांना. त्यांना या मातीशी काहीही देणंघेणं नाही. सगळा कथित विकास चालू आहे तो स्थानिक लोकांचा बळी देऊन. ते स्वत: बोलू शकत नाहीत. त्यांच्यासाठी बोलणारा कोणी नाही. सगळे मूक साक्षीदार बनलेत. सरकार आणि उद्योगपती या दोघांची ताकद अफाट आहे. या विनाशाविरुद्ध कोणी तोंड उघडू नये, अशी व्यवस्था त्यांनी केलीय. या भयावह संकटाचं गांभीर्य ना कोकणच्या लोकांना आहे ना देशातील इतर लोकांना. अनेकांना तर कोकण हा वेगळा देशच वाटत असावा. माध्यमांसाठी तर हा विषयच नाही.

गेल्या अनेक वर्षांत कोकणात रोजगार निर्माण होईल, असे उद्योग उभारले गेले नाहीत. शेतीच्या तुकड्यावर पोट भरणं शक्य नसल्याने, रोजगारासाठी तरुण मुंबईला गेले. फारशी चांगली परिस्थिती नसतानाही नाइलाजाने तिकडेच स्थाईक झाले. साहजिकच गावं ओस पडली. गावात ज्येष्ठ नागरिकच राहिले. गावात धड शाळा नाहीत, आरोग्यविषयक सुविधा नाहीत, पिण्याचं पाणीसुद्धा नाही. अशा स्थितीत लोक शहरातून परत येणार कसे? ही परिस्थिती जाणीवपूर्वक निर्माण केली गेली. गावातला दलाल हाताशी धरून कवडीमोलाने जमिनी विकत घेतल्या. कधी जमीन वनविभाग राखीव करणार असल्याची भीती घातली तर कधी कसली लालच दाखवली. एकंदर कोकणातील जमिनी कोणाच्या ना कोणाच्या घशात गेल्या आहेत.

Kokan Nature
Nature Tourism : जंगल सफारी, खाडी पर्यटनातून आर्थिक समृद्धी

निसर्गपूरक पर्यटन उभारण्याची दृष्टी सरकारने दाखवली असती तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती. कोकण म्हणजे जैवविविधतेने नटलेला प्रदेश. निसर्गानं एवढं भरभरून दिलंय, की इथं गाव पातळीवरील पर्यटनाला मोठी संधी आहे. फळांवर प्रक्रिया करणारे अनेक लघुउद्योग उभारले जाऊ शकतात. पण राजकीय इच्छाशक्ती नेमकी उलट आहे. त्यांना सगळा कोकण मूठभर लोकांच्या घशात घालायचाय!

‘गाव पर्यटना’ला वाव

दोन वर्षांपूर्वी आशुतोष आणि मी पहिल्यांदा व्हिएतनामला आणि नंतर नेपाळला गेलो होतो. दोन्ही ठिकाणी तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळ घालवला. तिथे गावागावांत अनेकांच्या घरी पर्यटक म्हणून राहण्याची, जेवणाची सुविधा आहे. गावात आजूबाजूच्या डोंगरांवर पायी फिरण्याच्या सुविधा आहेत. ऐतिहासिक, प्राचीन गोष्टी सुस्थितीत सांभाळल्या आहेत. त्यामुळं पर्यटकांचा सतत ओघ सुरू असतो. यातून त्या त्या गावातील स्थानिकांना रोजगार मिळतोय. आज पर्यटनावरच ते लोक मजेत जगत आहेत. यातून गावं तर स्वावलंबी झालीच; शिवाय त्या देशांच्या गंगाजळीत मोठी भर पडतेय. अशा पद्धतीच्या ‘गाव पर्यटना’ला कोकणात मोठा वाव आहे. मात्र या पद्धतीने कोणी विचारच केला नाही. इथं मूठभर लोकांना ओरबाडण्याची संधी म्हणजे विकास, असं मानलं गेलंय. निसर्गाचा जो प्रचंड ऱ्हास चालू आहे, त्याचे गंभीर परिणाम कोकणाला, महाराष्ट्राला भोगावे लागणार आहेत.

विकासाच्या नावाखाली कोकणचा मोठ्या प्रमाणात विनाश झालेला आहे. यापुढे तरी तो थांबेल का, याचं उत्तर नाही असंच आहे. कारण सरकारची सगळी धोरणं या विनाशाला पूरक अशीच आहेत. मात्र या विनाशाची थोडीशी जाणीव लोकांना होतेय. आपला समृद्ध वारसा टिकून राहावा, यासाठी काही तरुण प्रामाणिकपणे धडपडताहेत. त्यांची मातीशी नाळ अद्यापही जुळलेली आहे. काही प्रमाणात का होईना कोकण वाचविण्याचं काम स्थानिक तरुणच करू शकतात. यादृष्टीने काही आशादायक बाबी घडताहेत. पंचनदीचा तरुण शेतकरी मयूरेश मोडक हे एक उदाहरण. मयूरेशने पुण्यातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. नोकरीची संधी असतानाही तो गावी परत आला.

पंचनदीच्या धरणाचं पाणी जिथं थांबतं तिथं त्याच्या वडिलांची अडीच एकर जमीन आहे. इथं त्यानं निसर्गपूरक पर्यटन सुरू केलंय. पर्यटकांची राहण्याची सोय करायची, कोकणी जेवण द्यायचं, डोंगरातील पायवाटांनी त्यांना जंगलात फिरवायचं, या भागातील खास दुर्मीळ झाडं त्यांना दाखवायची, तळ्याच्या पाण्याच्या शेजारी शेकोटी पेटवून पर्यटकांना निसर्गातील शांतता अनुभवायला द्यायची... असा त्याचा शिरस्ता. गेल्या दोन वर्षांत अनेक परदेशी पर्यटक इथं येऊन गेलेत. त्यांना ही कल्पना आवडली. पंचनदी गाव उंचावर आहे. त्याच्या शेतापर्यंत तीव्र उतार आहे. कसरत करीत दुचाकीवर ते सामानाची ने-आण करतात. मयूरेशच्या वडिलांचा या उपक्रमाला पूर्ण पाठिंबा आहे. मयूरेशचं सगळं काम पूर्ण होईल तेव्हा इतरांसमोर पर्यटनाचं एक मॉडेल उभं राहील.

या प्रवासात आम्ही रानवी या गावी सरपंच दिनेश बारगुडे यांच्या घरी मुक्काम केला. हे जुन्या गावांसारखं अस्सल कोकणी गाव. निसर्गसौंदर्याने नटलेलं. एका बाजूला कंपनी. अलीकडं मोठा डोंगर. त्यालगत छोटासा सुंदर समुद्रकिनारा. प्रचंड मोठ्या दगडांनी व्यापलेला. किनाऱ्यावरील मातीही या दगडांपासून बनलेली. या किनाऱ्यापर्यंत जाण्यासाठीचा रस्ता जंगलातून जातो. तो ट्रेकिंगसाठी छान आहे. हे गाव पर्यटनासाठी अतिशय योग्य आहे. योगायोगाने या गावातील शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी विकलेल्या नाहीत. आशुतोष या गावातील लोकांशी निसर्गपूरक पर्यटनाविषयी बोलला. इथं पर्यटनातून कसा रोजगार तयार होईल, ते त्यानं सांगितलं. इथल्या ग्रामस्थांचा सकारात्मक प्रतिसाद मिळालाय. ग्रामस्थांनी ठरवलं तर हेही एक मॉडेल ठरू शकतं.

आशुतोष जोशी हा एक आशेचा किरण आहे. इंग्लंडमध्ये शिक्षण घेतल्यानंतर तो तिथंच स्थिरावला असता. मात्र कोकणच्या मातीशी जुळलेली नाळ त्याला शांत बसू देत नव्हती. कोकणच्या विध्वंसावर कोणीच बोलायला तयार नाही. त्यातून त्यानं ही कष्टदायक पदयात्रा सुरू केलीय. लोकांना भविष्यातील धोक्यांबाबत तो जागृत करतोय. शिवाय समविचारी लोकांना संघटित करण्याचा प्रयत्न करतोय. केवळ एवढं करून भागणार नाही, याची त्याला जाणीव आहे. गुहागरमधील नरवण या त्याच्या गावी तो निसर्गपूरक पर्यटनाचं मॉडेल उभं करू इच्छितोय. त्यासाठी त्याची धडपड चालू आहे. अंधार दाटत असला तरी या काही पणत्याच भविष्यात समाजाला योग्य मार्ग दाखवू शकतील!

(लेखक लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार व शेतकरी आहेत.) ९०९६१३९६६६, ९४२२४६९३३९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com