Fireflies: काजव्यांचे दिसणे...मुळातून विचार करणार का ?

Environmental Biodiversity: काजवे नष्ट होत असल्याबद्दल बोलताना किंवा त्यांच्यासाठी इतरांना जबाबदार मानताना बोलण्याच्या पलीकडे आपण काही कृती करू इच्छितो का आणि त्याची सुरुवात स्वत:पासून करू शकणार का, हे पाहावे लागेल.
Kajwa
KajwaAgrowon
Published on
Updated on

Wildlife Conservation: काजवे नष्ट होत असल्याबद्दल बोलताना किंवा त्यांच्यासाठी इतरांना जबाबदार मानताना बोलण्याच्या पलीकडे आपण काही कृती करू इच्छितो का आणि त्याची सुरुवात स्वत:पासून करू शकणार का, हे पाहावे लागेल. तसे करण्याचे धाडस किती जण दाखवतात? हा कळीचा मुद्दा आहे. त्याची सुरुवात झाली तर काजवेच काय, पण आपल्या अवतीभवती पूर्वी असणारे इतरही अनेक जीव तेव्हासारखेच आताही नांदतील, हे निश्चित. पण आपण मुळातून विचार करणार का आणि त्या दिशेने पाऊल टाकणार का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

पावसाळा तोंडावर आला आणि वादळी पावसाच्या चार-दोन सरी बरसल्या की ‘काही ठिकाणी’ काजवे दिसायला लागतात. वर्षातला आत्ताचाच हा काळ. आता ‘काही ठिकाणी’ म्हणावे लागते, पण हा बदल तसा अलीकडचा. फार मागे जाण्याची आवश्यकता नाही. २५ - ३० वर्षांपूर्वी गावोगावी काजवे दिसायचे, अगदी शहरातही त्यांचे दर्शन घडायचे. पाऊस लागून राहिला तरी ते असायचे आणि जागोजागी दिसायचे. शहरापासून थोडे दूर गेले की विशिष्ट ठिकाणी झाडेच्या झाडे काजव्यांनी ‘लगडलेली’ असायची.

ते सगळीकडेच दिसत असल्यामुळे त्यांचे फारसे अप्रूप नसायचे. आताच्या पिढीला कदाचित हे अविश्वसनीय वाटेल, पण आता चाळीस वर्षांपेक्षा जास्त वयाच्या बहुतांश लोकांनी हा अनुभव नक्की घेतला असेल. पण मागच्या काही दशकांमध्ये आपल्या अवतीभवती असलेले काजवे इतक्या झपाट्याने कमी झाले आहेत की आता ते पाहायचे असतील तर विशिष्ट ठिकाणीच जावे लागते. ती ठिकाणेसुद्धा दूर कुठे तरी असतात. अन्यथा, काजवे दिसण्याची शक्यता नसते.

Kajwa
Kajwa Mahotsav : काजव्यांना नष्ट करणारा महोत्सव

याच सुमारास एकीकडे भंडारदरा धरणाचा परिसर, ताम्हिणी परिसर, अंबा घाट किंवा यासारख्या ठिकाणी काजवे पाहण्याचे आमंत्रण देणारे ‘काजवा महोत्सव’ जाहीर होतात; दुसरीकडे त्याच्या विरोधात भूमिका घेणारी मंडळी काजवे पाहायला जाणाऱ्यांवर टीका करतात. तिथे जाऊन काजव्यांच्या मिलनाच्या क्रियेत त्यांच्यात व्यत्यय आणू नका, त्यांची उरलीसुरली ठिकाणे तरी शिल्लक राहू द्या, असे त्यांचे म्हणणे. त्यांची भावना निश्चितच चांगली असते आणि ती आक्रमकपणे, पोटतिडकीने मांडतातसुद्धा.

पण या प्रश्नाकडे आणि अशा अनेक मुद्द्यांकडे मुळातून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. लोक केवळ काजवे पाहायला गेले नाही म्हणून ते टिकणार आहेत का? तेवढ्याने त्यांचे संवर्धन शक्य आहे का? मुळात आपल्या अवतीभवती, गावांमध्ये - शहरांमध्ये माणसाच्या वस्तीजवळही वावरणारे काजवे अचानक गायब का झाले? याचा नेमकेपणाने विचार झाला तर काजव्यांच्या संवर्धनाचे मार्ग याच्या पलीकडे कुठे तरी आहेत, याची कल्पना येईल. आणि जास्तीत जास्त मंडळींची इच्छाशक्ती असेल तर त्या दिशेने प्रयत्नही करता येतील.

काजवा हा एक प्रकारचा कीटक; ‘बीटल’ या प्रकारात मोडणारा. त्याच्या राहण्याच्या जागा अर्थात वसतिस्थाने म्हणजे आर्द्र, दलदलीच्या, पाणथळ जागा. ज्या ठिकाणी पालापाचोळा किंवा निसर्गात असणारा तत्सम जैविक कचरा असेल ती त्याची आवडती ठिकाणे. त्यामुळेच नैसर्गिक ओढे-नाले, पांदी, नदीकाठ, तिथल्या दलदली, अशा ठिकाणची झाडे, आर्द्र-अंधाऱ्या जागा, पाणी असलेल्या शेतजमिनी या ठिकाणी ते मुबलक प्रमाणात असतं. या जागी माणसांची वर्दळही असायची. पण माणसामुळे काजवे तिथून दूर जायचे नाहीत. मग आताच नेमके काय घडले?... याचे उत्तर आपल्या गेल्या काही दशकांमधील बदललेल्या जीवनशैलीत आणि आपण कमालीच्या बदलून टाकलेल्या भवतालात शोधावे लागेल.

आता शहरे असोत वा गावे, आपल्या आसपास किती पाणथळ जागा शिल्लक आहेत? आपण किती नैसर्गिक ओढे-नाले-तळी बुजवली आहेत किंवा त्यांच्यावर कशी आणि किती अतिक्रमणे केली आहेत, याचा हिशेब मांडावा लागेल. हे थेट पाणी पुरवणारे आणि उपयुक्त ठरणारे नैसर्गिक पाणवठे टिकवले जात नसतील, तर मग नुसते साचून राहिलेले पाणी असलेल्या डबक्यांसारख्या पाणथळ जागा कशी राखल्या जातील? या सर्व पाणथळी आपण केव्हाच बुजवून टाकल्या आहेत, नष्ट केल्या आहेत. असे करण्यामागे वेगवेगळी कारणे दिली जातात. याचा परिणाम म्हणून आपल्या अवतीभवती अशी एक तरी पाणथळ जागा शिल्लक आहे का?

Kajwa
Biodiversity Conservation: सर्वांच्या आसमंतात नांदावी जीवसंपदा

याच्याही पुढचे म्हणजे निसर्गात कानाकोपऱ्यात घरे, वस्त्या केल्या जात आहेत. जैविक विविधतेने समृद्ध असलेल्या अनेक ठिकाणांवर वेगवेगळे प्रकल्प येत आहेत, मग तो नवीन महाबळेश्वर प्रकल्प असो वा अन्य कोणता प्रकल्प. अशा गोष्टींद्वारे तिथल्या जिवांची नैसर्गिक वसतिस्थाने बिघडवली जात आहेत. हे सारे होत असताना काजव्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या पाणथळ जागा कशा टिकतील? आणि त्यातूनही ज्या मोजक्या सुटतील, त्यापैकी किती प्रदूषणापासून मुक्त आहेत, याचा शोध घ्यावा लागेल. तसे केले तर काजवे का कमी झाले आहेत याचे उत्तर आपोआपच मिळेल.

काजवा हा एक प्रकारचा कीटक आहे. आपण डास, झुरळे किंवा इतर कीटक मारण्यासाठी, त्यांना दूर घालवण्यासाठी बरेच घातक उपाय करत असतो. त्याचा परिणाम काजव्यांवर होणार की नाही? इतकेच नव्हे तर शेती, उद्योग किंवा इतरही अनेक गोष्टींसाठी काजवा कशा प्रकारची आणि किती प्रमाणात कीटकनाशके वापरली जातात, हे आपल्याला माहीतच आहे. त्याच्याही पलीकडे आपल्या रोजच्या जगण्यात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आसपासच्या जिवांना मारक ठरणारी किती प्रकारची घातक रसायने वापरतो याची यादी केली तरी या प्रश्नाचा उलगडा होईल.

तुम्हाला घर - बाथरूम साफ करण्यासाठी फिनेलसारखे घातक रसायन पाहिजे, कार्यालयात - मोटारीत चांगल्या वासासाठी फ्रेशनर हवे, अंगावर सुगंधासाठी वेगवेगळ्या क्रिम किंवा स्प्रे लागतात. याच्याही पुढे जाऊन घरात एखादी माशी, डास, झुरळ किंवा पाल आलेली चालत नाही, तर मग आपल्या अवतीभवती -कीटक असणारे- काजवे राहावेत अशी अपेक्षा करून तरी कसे चालेल? आणि जे तुमच्या अवतीभवती नाही तेच इतरही ठिकाणी घडणार, मग तो दूरवरचा भाग असला तरी आपली जीवनशैली, जगण्याची पद्धत आज न उद्या तिथपर्यंत पोहोचणार आणि आज ना उद्या हे लोण तिथेही पसरणार.

याचा अर्थ स्पष्ट आहे, आपले जगणे इतक्या प्रकारे बदलले आहे की त्याच्यामुळे अवतीभवती काजव्यासारख्या जिवांना स्थानच उरलेले नाही. आपल्या अवतीभवतीचे काजवे नष्ट होण्यामागे ही प्रमुख कारणे आहेत. त्यात बदल झाल्याशिवाय, ते जाणीवपूर्वक केल्याशिवाय काजवे दिसणे अशक्य आहे. पण आपण या मुख्य कारणाला भिडतो का? ते करण्याऐवजी आणि मूळ आव्हानाला भिडण्याऐवजी आपण वरवरच्या गोष्टींवर बोलत राहतो. त्यातून फार काही हशील होणार नाही. पूर्वी माणसाच्या अवतीभवती काजवे होतेच. तरीसुद्धा माणसाच्या अस्तित्वामुळे त्यांच्या जीवनचक्रात व्यत्यय येत नव्हता. मग आता असे काय बदलले की हे सारे घडू लागले आहे? आपल्या जगण्याच्या पद्धतीत झालेले बदल याला कारणीभूत आहेत. त्यांच्यावर काम केल्याशिवाय ही समस्या सोडवता येणार नाही.

तसे करायचे असेल म्हणजेच मुख्य कारणाला भिडायचे असेल तर या परिस्थितीची जबाबदारी स्वत:वर घ्यावी लागेल आणि त्यानुसार स्वत:च्या जगण्यामध्ये बदल करावे लागतील. म्हणूनच काजवे नष्ट होत असल्याबद्दल बोलताना किंवा त्यांच्यासाठी इतरांना जबाबदार मानताना बोलण्याच्या पलीकडे आपण काही कृती करू इच्छितो का आणि त्याची सुरुवात स्वत:पासून करू शकणार का, हे पाहावे लागेल. तसे करण्याचे धाडस किती जण दाखवतात? हा कळीचा मुद्दा आहे. त्याची सुरुवात झाली तर काजवेच काय, पण आपल्या अवतीभवती पूर्वी असणारे इतरही अनेक जीव तेव्हासारखेच आताही नांदतील, हे निश्चित. पण आपण मुळातून विचार करणार का आणि त्या दिशेने पाऊल टाकणार का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

- अभिजित घोरपडे

९८२२८४०४३६

abhighorpade@gmail.com

(लेखक वरिष्ठ पत्रकार असून ‘भवताल’ या पर्यावरण विषयक मंचाचे संस्थापक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com