
माधव गाडगीळ
India Environment: जैवविविधता म्हणजे एक कोटी जीव जाती आणि जातीअंतर्गत जनुकीय वैविध्य, केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतके वाघ, हत्ती, रानडुकरे असे पशू नव्हेत असे रिओ- डी- जानेरोच्या १९९२ च्या जागतिक पर्यावरण विषयक शिखर परिषदेने ठासून सांगितले. ही सगळी जैवविविधता आपण कशी राखून ठेवणार? एकेका जीव जातीचा विचार करत या अस्मानी आव्हानाला तोंड देणे अशक्यप्राय आहे. तेव्हा या जीवजातींचे परिसर, त्यांचे अधिवास यांच्यावर लक्ष केंद्रित करून ते काळजीपूर्वक सांभाळायला हवेत. या अधिवासांच्यात सर्वांत अधिक धोक्यात आहे गोडे पाणी.
त्याखाली किनाऱ्याजवळचा सागरी प्रदेश, त्यानंतर माळरान व शेवटी अरण्य असा क्रम लागतो. गोड्या पाण्यातील जीवजातींच्या आकाराचा पल्ला बॅक्टेरिया, छोटे-मोठे झिंगे, मासे, कासवे यांच्यापासून ते वीस फूट लांब, अशा मगरीच्या बहिणी घडीयाळ यांच्यापर्यंत जातो. मासेखाऊ घडीयाळ गंगा व ब्रह्मपुत्रांच्या काही थोड्या उपनद्यांत आढळते. १९४६ मध्ये १० हजार घडीयाळ होते, आज केवळ २५० शिल्लक आहेत. नदीवासी घडीयाळांच्या या दुर्दशेमागे बेहद्द प्रदूषण हे सर्वांत महत्त्वाचे कारण आहे.
हे प्रदूषण केवळ सांडपाण्याचे नाही, तर शिसे, कॅडमियम यांसारख्या अत्यंत घातक धातूंचे प्रमाण सुद्धा अतिशय झपाट्याने वाढले आहे. माती, पाणी, हवा या सगळ्यांचे प्रदूषण आणि अधिवासांत ढवळा-ढवळ ह्या दोनही बाबी जैववैविध्याच्या दृष्टीने पशुपक्ष्यांच्या शिकारीहून कितीतरी पटीने घातक आहेत. पण आज या दोन्ही बाबींना जोराने उत्तेजन दिले जात आहे.
पाण्याचे प्रदूषण चिंताजनक
प्रदूषण नियंत्रण मंडळांसारखी सरकारी यंत्रणा याबाबत केवळ खोटे-नाटे आकडे देण्यात गर्क आहे. मी पश्चिम घाट परिसर तज्ज्ञ गटाच्या वतीने केलेल्या पाहणीमध्ये चिपळूण तालुक्यातील लोटे रासायनिक उद्यम संकुल आणि त्याच्या परिसरातील वशिष्ठी नदी, दाभोळ खाडी या भागाला भेट दिली. माझ्या सोबत शासनाच्या वतीने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे एक अधिकारी होते. आम्ही तिथल्या स्थानिक अभ्यासगटाशी चर्चा केली आणि तिथली सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची सामुदायिक यंत्रणा पाहिली.
शिवाय दाभोळ खाडीच्या भेटीदरम्यान अनेक लोकांशी बोलणी झाली. तेव्हा असे लक्षात आले की शासकीय अधिकाऱ्यांनी मुंबईत माझ्याबरोबर झालेल्या बैठकीत अनेक चुकीच्या गोष्टी सांगितल्या होत्या. एक तर लोटेचा अभ्यासगट पूर्णपणे निष्क्रिय होता.हे नक्की की कारखान्यांतून निर्माण होणाऱ्या हवेच्या व पाण्याच्या भयंकर प्रदूषणावर व्यवस्थित व पुरेशी कारवाई होत नव्हती, आणि जी उपाययोजना राबवली जाते ती दोषपूर्ण होती. आम्ही स्वतः तिथे मोठ्या प्रमाणावर दूषित पाण्याचा विसर्ग ओढ्यात जात असलेला पाहिला.
आता याच ओढ्याचे पाणी कोतवली गाव पिण्यासाठी वापरते. गावचे सरपंच हे सारे भोगून व आता ही परिस्थिती आटोक्यात आणता येणार नाही हे जाणून हेच पाणी पिऊन आत्महत्येच्या प्रयत्नापर्यंत पोहोचले. मग धावपळ करून त्यांना मुंबईच्या इस्पितळात नेण्यात आले. त्यांचा जीव वाचवला एवढेच, परंतु अजूनही तिथे कोतवलीच्या पाण्याच्या प्रदूषणावर कोणतीही परिणामकारक उपाययोजना करण्यात आलेली नव्हती.
लोटेमधील रासायनिक प्रदूषणामुळे दाभोळ खाडीतील माश्यांची संख्या घटते आहे आणि मत्स्य उद्योगातील रोजगारही घटतो आहे. रासायनिक उद्योगात ११ हजार लोकांना रोजगार मिळाला आहे, तर मच्छीमार समाजातील लोकांच्या सांगण्याप्रमाणे त्यांच्यातील २० हजार लोकांचा रोजगार बुडाला आहे. प्रदूषणामुळे केवळ मच्छीमारच नाही तर कोतवलीसारख्या अनेक गावांतील शेतकरी आणि आसपासचे पशुपालकही पीडित आहेत. २०२० मध्ये जेव्हा मोठा पूर आला तेव्हा वशिष्ठीचे पाणी आसपासच्या शेतांत पसरले आणि तिथे चरणाऱ्या म्हशी गतप्राण झाल्या. माझ्यासोबतच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना विचारले की काय हो इथे प्रदूषण चालू आहे का? ते मान डोलवत म्हणाले छे, हो अजिबातच नाही. आमचे आकडे बघा, इथे काहीही प्रदूषण नाही. साहजिकच इथली पीडित जनता या विरुद्ध निदर्शने करते.
रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्याही निदर्शनात काहीही हिंसा झालेली नव्हती, तरीही लोकांना नको असलेले प्रदूषक उद्योग त्यांच्यावर लादण्यासाठी सातत्याने पोलिसी बडगा उगारण्यात येतो. मी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात गोळा केलेल्या माहितीप्रमाणे २८ ऑगस्ट २००७ ते २७ ऑक्टोबर २००९ या कालावधीत १९१ दिवस म्हणजे सरासरीने प्रत्येक चौथ्या दिवशी शांततापूर्ण व समर्थनीय निषेध अशा प्रकारे पोलिसांचा गैरवापर करत दडपला होता.
जैवविविधतेचे जतन आणि संवर्धन याला अनेक पैलू आहेत. इथे केवळ एका सर्वांत भयग्रस्त अधिवासाबद्दल काही उदाहरणे दिली. दिवसेंदिवस देशातील परिस्थिती आणखीच बिघडत आहे. प्रदूषणाबद्दलचे नियम अधिकाधिक ढिले करून वाटेल तसे प्रदूषण करायला उत्तेजन देण्यात येत आहे. हे कोणासाठी? या मागे केवळ धनांध आणि सत्तांध मंडळींचा स्वार्थ आहे.
सुदैवाने भारतातील लोकशाही पूर्णपणे शाबूत आहे तेव्हा याबाबत एकच परिणामकारी मार्ग आहे. तो म्हणजे लोकांनीच संघटित होऊन एक परिवर्तन घडवून आणावे आणि ‘सर्वांच्या आसमंतात नांदते जीवसंपदा’ अशी परिस्थिती निर्माण करावी. यासाठी आजचा काळ अत्यंत अनुकूल आहे. माहिती आणि संचार तंत्रज्ञानाच्या होणाऱ्या प्रगतीमुळे आता लोकांना केवळ आपल्या मातृभाषेचा वापर करत सर्व विषयांवर उत्तमोत्तम माहिती उपलब्ध होऊ शकते. गडचिरोली जिल्ह्यातील रात्यांपासून दूर अशा नक्षलग्रस्त गावांच्यात राहणाऱ्या गोंड आदिवासींच्या हाती सुद्धा आज स्मार्टफोन पोहोचलेले आहेत.
वनोपज गोळा करून विकणे हा त्यांच्या उपजीविकेचा महत्त्वाचा भाग आहे. आता त्या वनोपजांची मराठी नावे वापरून विचारले की चॅटजीपीटी ही सुविधा त्यांना जवळच्या हैदराबादच्या बाजारपेठेत तेलुगूत कोणत्या नावाने, किती भावात, कुठे कुठे हे वनोपज विकता येतात, ही माहिती झटदिशी पुरवते. गुगल मीटसारखी सुविधा वापरून ही आदिवासी मंडळी देशभराच्या इतर अशाच आदिवासी गटांबरोबर संपर्कात राहू शकतात. त्यासाठी मराठीचे चांगले भाषांतर कुठल्याही दुसऱ्या भारतीय भाषेत करणे शक्य झाले आहे. तेव्हा आजवर पर्यावरणाची नासाडी मुकाट्याने सोसत राहणारी मंडळी आता ताठ मानेने दुष्ट हितसंबंधांवर मात करून भारतभूला पुनश्च सुजल, सुफल बनवतील, याची मला पक्की खात्री आहे.
madhav.gadgil@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ आहेत.)