
संजय बडे
Millet Production :
बाजरी हे जिरायतीमधील महत्त्वाचे तृणधान्य पीक असले उन्हाळी हंगामात घेताना ओलिताखाली घ्यावे लागते. पोषकता आणि पचनीयतेच्या दृष्टीने सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या या भरडधान्याचा वापर आता वेगाने वाढत आहे. हे एकाच वेळी अन्न, चारा आणि इंधन पुरवणारे पीक असून, शेतकऱ्यांसाठीही फायद्याचे ठरू शकते.
जमीन : उन्हाळी बाजरी लागवडीसाठी जमीन मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी.
पूर्वमशागत : लोखंडी नांगराने जमिनीची १५ सें.मी. खोल नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. पूर्वी घेतलेल्या पिकाची धसकटे व काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी. शेवटच्या कुळवणीच्या आधी हेक्टरी १२ ते १५ बैलगाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत पसरवून टाकावे, म्हणजे ते जमिनीत सम प्रमाणात मिसळले जाते.
हवामान : बाजरी या पिकास उष्ण व कोरडे हवामान (१० ते ४५ अंश सेल्सिअस) मानवते. हे पीक पाण्याचा ताण सहन करू शकते. उन्हाळी हंगामात पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत म्हणजे उगवण ते फुटवे येण्याच्या वेळेस तापमान कमी असल्यामुळे पिकाची वाढ हळूवार होते. त्यामुळे पिकाच्या वाढीसाठी जास्त काळ लागतो, म्हणून उन्हाळी बाजरीचे पीक खरीप बाजरीपेक्षा १० ते १५ दिवसांनी उशिरा काढणीस येते.
पेरणीची वेळ : उन्हाळी बाजरीची पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या तारखेपर्यंत करावी. कारण जानेवारी महिन्यात तापमान १० अंश सेल्सिअस पेक्षा खाली गेल्यास त्याचा उगवणीवर अनिष्ट परिणाम होतो. अधिक थंडीची स्थिती असल्यास थंडी कमी झाल्यावर पेरणी करावी. मात्र उन्हाळी बाजरीची पेरणी १५ फेब्रुवारीनंतर अजिबात करू नये. कारण हे पीक पुढील उष्ण तापमानात सापडते. परिणामी, कणसात दाणे भरतात. उत्पादनात घट येते.
बियाणे प्रमाण : पेरणीसाठी हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे.
बीजप्रक्रिया
अ) अरगट रोगासाठी
बीजप्रक्रिया केलेले प्रमाणित बियाणे उपलब्ध नसल्यास पेरणीपूर्वी बियाण्यास २० टक्के मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी. त्यासाठी १० लिटर पाण्यात २ किलो मीठ विरघळून तयार द्रावणामध्ये बियाणे हलके सोडावे. नंतर पाण्यावर तरंगणारे हलके व बुरशीयुक्त बियाणे बाजूला काढून ते व्यवस्थित नष्ट करावे. तळाला असलेले निरोगी आणि वजनाने जड असलेले बियाणे वेगळे करावे. ते स्वच्छ पाण्याने २ ते ३ वेळा धुऊन घ्यावे. ते सावलीत वाळवून पेरणीसाठी वापरता येते.
ब) गोसावी रोगासाठी
पेरणीपूर्वी बियाण्यास मेटॅलॅक्झिल एम अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) ६ गॅम प्रति किलो बियाण्यास चोळून नंतर पेरणी करावी.
क) नत्राच्या उपलब्धतेसाठी
ॲझोस्पिरीलम २५ गॅम प्रति किलो बियाण्यास चोळून पेरणी करावी. त्यामुळे २० ते २५ टक्के नत्र खतात बचत होते. उत्पादनात जवळपास १० टक्के वाढ होते.
जात : श्रद्धा, सबुरी, शांती, आदिशक्ती, आयसीटीपी - ८२०३ व धनशक्ती या पैकी योग्य जातीची निवड करावी.
पेरणीची पद्धत : पेरणीपूर्वी शेत ओलावून वाफसा आल्यावर पेरणी करावी. जमिनीच्या उतारानुसार ५ ते ७ मीटर लांबीचे व ३ ते ४ मीटर रुंदीचे सपाट वाफे तयार करावेत. पेरणी शक्यतो दोन चाडीच्या तिफणीने करावी. म्हणजे खते आणि बियाणे एकाच वेळी पेरणे शक्य होते. पेरणी ३ ते ४ सें.मी. पेक्षा जास्त खोलीवर करू नये. दोन ओळींतील अंतर ३० सें.मी. व दोन रोपांतील अंतर १० सें.मी. ठेवावे.
रासायनिक खते : हेक्टरी ९० किलो नत्र, ४५ किलो स्फुरद व ४५ किलो पालाश द्यावे. पेरणीवेळी अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश आणि २५ ते ३० दिवसांनी उर्वरित अर्धे नत्र द्यावे.
विरळणी : हेक्टरी रोपांची योग्य संख्या राखण्यासाठी पहिली विरळणी पेरणीनंतर १० दिवसांनी करावी. दुसरी विरळणी पेरणीनंतर २० दिवसांनी करून दोन रोपातील अंतर १० सें.मी. ठेवावे.
आंतरमशागत ः तणांचा बंदोबस्त करण्यासाठी २ वेळा कोळपणी आणि गरजेनुसार एक ते दोन वेळा खुरपणी करावी. पेरणी केल्यापासून सुरुवातीचे ३० दिवस शेत तणविरहित ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कारण याच कालावधीत तण व पीक यांच्यात हवा, पाणी, अन्नद्रव्ये आणि सूर्यप्रकाश मिळविण्यासाठी स्पर्धा होते.
पाणी व्यवस्थापन : पेरणीनंतर ४ ते ५ दिवसांनी हलके (आंबवणीचे) पाणी द्यावे. त्यानंतर जमिनीच्या मगदुरानुसार व पिकाच्या वाढीच्या संवेदनक्षम अवस्थेत १० ते १२ दिवसांने पाण्याच्या ५ ते ६ पाळ्या द्याव्यात.
पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्यास, पहिले
पाणी : फुटवे येण्याच्या वेळी (पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी)
दुसरे पाणी : पीक पोटरीत असताना (पेरणीनंतर ३५ ते ४५ दिवसांनी)
तिसरे पाणी : दाणे भरतेवेळी (पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी) द्यावे.
उत्पादन : उन्हाळी बाजरीचे पीक ओलिताखाली घेतले जाते. हवामान कोरडे असल्यामुळे धान्याचे हेक्टरी ४० ते ४५ क्विंटल आणि चाऱ्याचे ७ ते ८ टन उत्पादन मिळते.
आहारातील महत्त्व
सध्या शहरीच काय, पण ग्रामीण जीवनशैलीमध्ये गहू आणि बेकरी उत्पादनाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचे विपरीत परिणाम आबालवृद्धांच्या पचन व संबंधित आरोग्यावर होताना दिसतात. (उदा. लहान मुलांमध्ये बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे, महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे इ.) गव्हातील ग्लुटेन या घटकाची ॲलर्जी अनेकांमध्ये दिसून येत आहे. अशा स्थितीमध्ये बाजरीसारखे भरडधान्य महत्त्वाचे ठरते.
विकसनशील देशांमध्ये अन्न, चारा व इंधन पुरविणाऱ्या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होते.
आहाराच्या दृष्टीने बाजरी एक अत्यंत महत्त्वाचे तृणधान्य आहे. बाजरीमध्ये असणाऱ्या पौष्टिक घटकांचा विचार करता ३६० किलो कॅलरी प्रति १०० ग्रॅम धान्य इतकी विपुल ऊर्जा देणारे एकमेव धान्य आहे.
बाजरी धान्यामध्ये प्रथिने १०.६ टक्के, पिष्टमय पदार्थ ७१.६ टक्के, स्निग्ध पदार्थ ५.० टक्के व तंतुमय पदार्थ १.३ टक्का असतात. खनिज पदार्थ : कॅल्शिअम ३८.० मिलिग्रॅम, पोटॅशिअम ३७० मिलिग्रॅम, मॅग्नेशिअम १०६ मिलिग्रॅम, लोह ८ मिलिग्रॅम व जस्त ५ मिलिग्रॅम प्रति १०० ग्रॅम धान्य असे प्रमाण आढळते. तसेच सल्फरयुक्त अमायनो ॲसिड आढळतात. या पोषकतेमुळे लहान मुले व गर्भवती महिलांचे कुपोषण रोखण्याच्या दृष्टीने बाजरी हे अनन्यसाधारण महत्त्वाचे ठरते.
बाजरी प्रामुख्याने भाकरी तयार करण्यासाठी वापरली जाते. मात्र अलीकडे बाजरीचा वापर खिचडी, घाटा, नूडल्स, आंबील, लाह्या व इडली या विविध स्वरूपांत केला जाऊ लागला आहे. शिवाय त्यात ५० टक्क्यांपर्यंत गव्हाचे पीठ मिसळून बिस्किट्सही बनवता येतात. बाजरी धान्यापासून मद्यनिर्मितीही केली जाते.
पशुधन व कुक्कुटपालनामध्ये पशुखाद्य निर्मितीसाठी बाजरीचा चारा उपयुक्त ठरतो. बाजरीचा हिरवा चाराही वापरता येतो. बाजरी चाऱ्यात प्रथिनांचे प्रमाण ८.७ टक्के असून, त्याचे मुरघासही करता येते.
बाजरी पीठ साठवण कालावधी
बाजरीचे धान्य दळल्यानंतर फार काळ ठेवता येत नाही. त्यातील लायपेज नावाच्या घटकामुळे पीठ काही काळातच (आठ ते दहा दिवस) कडू होते. त्यामुळे एकदा तयार करून त्याचा दीर्घकाळ वापर करण्यामध्ये अडचणी येतात. गव्हाच्या पिठाप्रमाणे व्यापारी तत्त्वावर बाजरी पिठांचे उत्पादन आणि विक्री करण्यात अडचणी येतात. यावर पुढील तंत्रज्ञानाने मार्ग काढता येतो. बाजरी धान्य दळण्यापूर्वी ८० अंश सेल्सिअस तापमान असलेल्या गरम पाण्यामध्ये ८० सेकंदांसाठी भिजवून घ्यावी. त्यानंतर ती पाण्याबाहेर काढून वाळवून घ्यावी. त्यानंतर त्याचे दळण केल्यास हे पीठ वापरण्याचा कालावधी २० दिवसांपर्यंत वाढतो.
- संजय बडे, ७८८८२९७८५९, सहायक प्राध्यापक, कृषी विद्या विभाग, दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.