Exercise Importance : शेतकऱ्याच्या तळमळीतून बाळगोपाळांना व्यायामाचे धडे

Farmer Exercise : शेतधुऱ्यावरून भांडणात एकमेकाची डोकी फुटतात. शेतरस्ते अडविले जातात. मात्र गायमुखनगर येथील सुभाष लक्ष्मण चव्हाण या अल्पभूधारक शेतकऱ्याने पाच गुंठे शेतजमिनीवर बाळगोपाळांसाठी व्यायामशाळा उभारली आहे.
Exercise Importance
Exercise ImportanceAgrowon
Published on
Updated on

दिनकर गुल्हाने

Indian Farmer : शेतधुऱ्यावरून भांडणात एकमेकाची डोकी फुटतात. शेतरस्ते अडविले जातात. मात्र गायमुखनगर येथील सुभाष लक्ष्मण चव्हाण या अल्पभूधारक शेतकऱ्याने पाच गुंठे शेतजमिनीवर बाळगोपाळांसाठी व्यायामशाळा उभारली आहे. काळ्या आईवर प्रेम करणारा हा शेतकरी या लाल मातीतून शंभरेक पहिलवानांना व्यायामाचे निःशुल्क धडे देत आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पुसदपासून चार किलोमीटर अंतरावरील गायमुखनगर हे छोटेसे गाव. गावठी दारू भट्ट्यांमुळे गावातील युवा पिढी चुकीच्या मार्गाने गेली होती. मात्र अलीकडे निर्व्यसनी युवा पैलवानांची फौज तयार झाल्याने गावाचे सामाजिक चित्र पालटले आहे. याचे श्रेय येथील शेतकरी सुभाष चव्हाण यांना ग्रामस्थ देतात. सुभाष यांचे चुलते की चुलत बंधू चव्हाण व भाऊ तुकाराम चव्हाण यांना पहिलवानकीचा नाद. लाल मातीत कुस्तीचा डाव मारण्यात त्यांना मोठा आनंद. आजोबांचे स्वप्न साकारण्यासाठी सुभाष चव्हाण यांनीही कासेला लंगोटी बांधला. लहानपणापासूनच कुस्तीचे डाव मारले.

Exercise Importance
Cardio Exercise : कॅलरी बर्न करण्यासाठी खूप प्रभावी कार्डिओ व्यायाम

तेच स्वप्न साकारण्यासाठी त्यांनी आपल्या गावालगतच्या शेतात कुस्तीचा आखाडा मोकळ्या आकाशाखाली सुरू केला. ते स्वतः शाळकरी मुलांना कुस्तीचे धडे देऊ लागले. त्यासाठी त्यांनी पोलिस तसेच अपंग शाळेवरील पर्यवेक्षकाच्या नोकरीवर पाणी सोडले. आणि पूर्णवेळ मुलांना कुस्तीचे धडे द्यायला सुरुवात केली. सुभाष चव्हाण यांना विनायक आणि युवराज ही दोन मुले. विनायक हा राष्ट्रीय पातळीवर कुस्ती खेळला असून, त्याने महाराष्ट्र केसरी किताब देखील जिंकला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून कुस्ती खेळामध्ये विनायकला कलर कोट मिळाला आहे. दुसरा मुलगा युवराजही आखाड्यातच रमतो.

पाच गुंठ्यांत उभारला आखाडा ः

सुभाष चव्हाण यांनी स्वतःच्या पाच एकरांत कापूस, सोयाबीन, तूर या पिकांची लागवड करण्यावर भर दिला. शेतीत अपार कष्ट करत चांगले उत्पादनही मिळवले. त्याचवेळी त्यांनी व्यायामाचा छंदही जोपासला. सततच्या हवामान बदलामुळे पिकांचे उत्पादन घटले होते. मात्र त्यांनी हार मानली नाही. शिवाय पावसाळ्यात शाळकरी मुलांना उघड्यावर शेतीत कुस्तीचे धडे देणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी शेतामध्येच व्यायामशाळा उघडण्याचे ठरविले. पाच गुंठ्यांत ‘मारुती बालगोपाल आखाडा’ शेतात उभारला. या आखाड्याच्या उभारणीसाठी स्वतःकडील बैलजोडी तसेच बकऱ्या अगदी पेरणीच्या तोंडावर विकल्या. एवढेच काय तर पत्नी सौ. माला चव्हाण यांनीही त्यांचे सोन्या-चांदीचे दागिने विकून पती सुभाष यांच्या व्यायामशाळेच्या तळमळीला आर्थिक पाठबळ दिले. त्यातून आलेल्या पैशांतून व्यायामशाळेचे साहित्य सुभाष यांनी खरेदी केले.

आखाड्यातील सोईसुविधा ः

दोन वर्षांपूर्वी व्यायामशाळेचे शेड उभारले. पहिलवानांच्या अंघोळीसाठी गरम पाण्याची तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. व्यायामासाठी आवश्यक साहित्याची खरेदी केली. लोखंडी डंबेल्स खरेदी करणे शक्य नसल्याने सिमेंटचे डंबेल्स स्वतः तयार केले. पैलवानांच्या तंदुरुस्तीची काळजी घेतली. या व्यायामशाळेत गायमुख गावासह आजूबाजूच्या मधुकरनगर, सावंगी, आरेगाव, विटाळा, मोहा, काटखेडा, शिवानगर व पुसद येथील किमान शंभर पैलवान सरावासाठी येतात. यातील बरेचसे शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत.

सकाळी सहा ते नऊ व संध्याकाळी पाच ते आठ या दरम्यान या १५ बाय ३० फूट आकाराच्या आखाड्यात त्यांना व्यायामाचे धडे दिले जातात. यासाठी वस्ताद नितीन आडे यांना सोबत घेतले आहे. या आखाड्यावर विश्‍वास ठेवत आरेगाव येथील शेतकरी चंदू पवार त्यांची पाचव्या इयत्तेतील मुलगी स्वातीला दररोज व्यायाम शाळेत आणतात. आता पालकही बलसंवर्धनासाठी शेतकरी सुभाष चव्हाण यांना साथ देत आहेत.

तळमळीतून घडले पहिलवान ः

पहिलवान घडविण्याच्या ध्येयाने वेडा झालेला हा शेतकरी शिकाऊ पहिलवानांची काळजी घेतो. आर्थिक स्थितीमुळे सकस आहार देऊ शकत नाही, मात्र कुस्तीचे बारकावे आखाड्यातील पहिलवानांना शिकवीत आहे. त्यांचा कुस्तीतील बांगडी डाव आवडीचा आहे. त्यांनी पहिलवानांना धोबीपछाड, कलारजंग, बॅक थ्रो, निकाल, एक चाक, गर्दन धाक, मोळी, झोळी, खिसा, लपेट आधी कुस्त्यांचे डाव शिकविले आहेत.

आखाड्यातील मनोज पंडित पवार कुस्तीतील विदर्भ केसरी असून सध्या दौंड येथे पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत आहे. मोलमजुरी करणाऱ्या जितेश राजू आडे याने कुस्तीतील प्रावीण्य शिकत कुमार विदर्भ केसरी हा बहुमान पटकावला आहे. हर्षदीप श्‍याम राठोड हा १७ वर्षीय युवक घरामध्ये आई-वडिलांसह कुणाशीही बोलत नव्हता. मात्र एककल्ली स्वभावाचा हर्षदीप आता व्यायामशाळेत सर्वांमध्ये मिळून मिसळून राहतो आहे. त्याने कोल्हापूर येथील शालेय महाराष्ट्र केसरी हा बहुमान पटकावला आहे. शेतकरी सुभाष चव्हाण यांच्या तळमळीतून पैलवान घडत आहेत. आखाड्यातील सौरभ आडे, बंटी राठोड, सचिन कैलास चव्हाण, शुभम राठोड, विशाल चव्हाण, सचिन सुभाष चव्हाण, ऐश्‍वर्या सुरेश राठोड, आश्‍विनी कैलास चव्हाण, अरमान जाधव, सुनील सुभाष चव्हाण, सुमीत बाबूलाल चव्हाण, राजकुमार आडे फिटनेस सांभाळत विविध सरकारी विभागात नोकरी करत आहेत.

संपर्क ः सुभाष चव्हाण 7887532062

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com