Nashik News : नाशिक जिल्ह्यात उन्हाचा पारा ४० अंशांपर्यंत पोहोचलेला असताना दुसरीकडे, ग्रामीण भागात टंचाईचे संकट गडद होत आहे. मार्चमध्येच जिल्ह्यातील टॅंकरने द्विशतक गाठले आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील १९५ गावे, ४३६ वाड्यांना २०७ टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. पंधरा दिवसांत ५० ने टॅंकरची मागणी वाढली आहे.
गेल्या वर्षी २० एप्रिलपासून जिल्ह्यात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला होता. त्यामुळे पुढील काळात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गावांसाठी आठ, तर टँकरसाठी ६४ अशा ६७ विहिरी प्रशासनाने अधिग्रहीत केल्या आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरीपेक्षा जिल्ह्यात कमी पाऊस झाला. पुरेशा पावसाअभावी बहुतांश धरणांमध्ये समाधानकारक साठा झाला नव्हता. यातच, समन्यायी तत्त्वाच्या आधारे काही धरणांमधून मराठवाड्यासाठी पाणी सोडावे लागले होते. मराठवाडा, अहमदनगर आणि मुंबईच्या काही भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या नाशिक जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.
गेल्या वर्षी पुरेसा पाऊस असल्याने मार्च उलटूनही टॅंकरची मागणी झाली नव्हती. २० एप्रिल २०२३ ला जिल्ह्यात टॅंकर मागणी होऊन १५ गावे-वाड्यांसाठी सात टॅंकर सुरू झाले होते. त्या वेळी केवळ येवला तालुक्यात टॅंकर सुरू होते. यंदा मात्र उलटे चित्र असून, नोव्हेंबर-डिसेंबरपासून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये १७४ गावे व ३८५ वाड्यांवर टंचाईचे संकट होते.
२९ मार्चला हे संकट गडद झाले असून, ६३१ गावे व वाड्यांमध्ये २०७ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातील नांदगाव, येवला, चांदवड, बागलाण, मालेगाव, सिन्नर तालुक्यांना टंचाईची सर्वाधिक झळ बसली आहे. बागलाणमध्ये २९ गावे व तीन वाड्यांना २५, चांदवडला ६८ गावे-वाड्यांसाठी २६, देवळ्यात ५३ गावे-वाड्यांना २५, मालेगाव २५ गावे व ४९ वाड्यांसाठी २४, नांदगाव तालुक्यात ४७ गावे व २२२ वाड्यांसाठी ४९, सिन्नरमध्ये ७६ गावे-वाड्यांसाठी १६ टॅंकर, तर येवला तालुक्यात ४४ गावे व १५ वाड्यांसाठी ४२ टँकर सुरू आहेत. शासकीय ११, तर खासगी १९६ अशा एकूण २०७ टँकरद्वारे दैनंदिन ४३२ टॅंकर फेऱ्यांमार्फत उपरोक्त गावांमध्ये पाणीपुरवठा होत आहे.
६७ विहिरी अधिग्रहित
गावांची तहान भागविण्यासाठी विहिरींचे अधिग्रहण केले जात आहे. गावांसाठी आठ, तर टँकर भरण्यासाठी ६४ अशा एकूण ७२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. सर्वाधिक २५ विहिरी बागलाण तालुक्यात अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. त्यापाठोपाठ देवळा १६, चांदवड २, मालेगाव १८, नांदगाव ४, तर येवला तालुक्यात दोन विहिरींचा समावेश आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.