

Solapur News : गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यातील २७ टँकर बंद झाले आहेत. सोमवारपर्यंत (ता. २६) जिल्ह्यात ६९ टँकरद्वारे टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा सुरू होता.
आता ४२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. बुधवारीही (ता. २८) जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाऊस सुरू राहिल्याने आणखी टँकरची संख्या घटण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाण्याच्या उपलब्धतेची खातरजमा करून अहवाल देण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी ग्रामसेवकांना दिले आहेत.
त्यानंतर उर्वरित टँकरबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात यंदा मे महिन्यात ६९ टँकरद्वारे ५९ गावे व ५८७ वाड्या- वस्त्यांना पाणीपुरवठा सुरू होता. एक लाख ४५ हजार ९९० इतकी लोकसंख्या तर ६० हजार ९१६ जनावरे बाधित होती.
त्यांना पाणी पुरवण्यासाठी रोज १४९ खेपा मंजूर होत्या. मात्र, रोज १०४ पर्यंत खेपा होत होत्या. यंदा लवकरच १३ मेपासून जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाला सुरवात झाली. त्यानंतर सतत पाऊस पडत राहिला. जिल्ह्याची २८ मे पर्यंतच्या पावसाची सरासरी २५.१ मिलिमीटर आहे.
मात्र, बुधवारपर्यंत जिल्ह्यात २१७ मिलिमीटर पाऊस पडला असून, त्याची टक्केवारी ८६४.५ इतकी आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील टंचाईग्रस्त गावांमधील जलस्रोतांत पाणी उपलब्ध झाल्याने टँकर बंद करण्यात आले आहेत. स्थानिक यंत्रणेने खातरजमा करून अहवाल दिल्यानंतर टँकर बंद करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सांगितले.
यंदा घटली टँकर संख्या
गतवर्षी जूनपर्यंत जिल्ह्यात २१४ टँकरद्वारे टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा सुरू होता. तर उन्हाळ्याच्या सुरवातीलाच एप्रिल महिन्यात २८ टँकरद्वारे २६ गावे व २०४ वाड्या- वस्त्यांना पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, यंदा जलजीवन योजनेच्या एक हजार ९ कामांपैकी बहुतांश कामे मार्गी लागल्याने टंचाई आटोक्यात आली.
दरवर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ्याच्या सुरवातीपासूनच टँकरची मागणी कमी होती. मे महिन्यात ती संख्या ६९ होती. त्यातच पूर्वमोसमी पावसाने लवकरच जोरदार हजेरी लावल्याने ती संख्याही कमी होत आहे.
टंचाई स्थितीची आकडेवारी
एकूण सुरू असलेले टँकर ४२
टंचाईग्रस्त गावे ३६
टंचाईग्रस्त वाड्या ३६१
बाधित लोकसंख्या ९२,३०५
बाधित पशुधन ३८,८४९
मंजूर खेपा ८९
सध्याच्या खेपा ७२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.